
PM Narendra Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते मुंबईकरांसाठी दोन महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत. यामध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे आणि मुंबईतील पहिली पूर्णपणे भूमिगत असलेली मेट्रो एक्वा लाईन-३ च्या अंतिम टप्प्याचा समावेश आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे मुंबई महानगर प्रदेशातील कनेक्टिव्हिटी आणि वाहतुकीत मोठा बदल होणार आहे.
मुंबई मेट्रो लाईन-३ चा अंतिम टप्पा आजपासून मुंबईकरांसाठी खुला होणार आहे. हा टप्पा आचार्य अत्रे चौक ते कफ परेड असा आहे. या भागाचे लोकार्पण झाल्यानंतर मेट्रो-३ गोरेगाव आरे ते कफ परेड असा संपूर्ण प्रवास मुंबईकरांना थेट करता येणार आहे. यापूर्वी मेट्रो-३ दोन टप्प्यांत म्हणजे आरे ते बीकेसी (BKC) आणि बीकेसी ते आचार्य अत्रे चौक (वरळी नाका) अशी सुरु होती. आज अंतिम टप्प्याचे लोकार्पण होत आहे. आता संपूर्ण ३३.५ किलोमीटर लांबीची ही भूमिगत मेट्रो मार्गिका पूर्णपणे मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. यात विज्ञान केंद्र (नेहरू सेंटर) ते कफ परेड पर्यंतच्या ११ स्थानकांचा समावेश आहे.
या संपूर्ण मेट्रो मार्गामुळे दररोज १३ लाख प्रवाशांना फायदा होण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबईतील कफ परेड, फोर्ट, नरिमन पॉइंट यांसारख्या महत्त्वाच्या व्यावसायिक आणि शासकीय केंद्रांना थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीपासून मोठा दिलासा मिळेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे (Phase 1) देखील उद्घाटन करण्यात येणार आहे. हा टप्पा सुमारे १९,६५० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. हे विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर वर्षाला ९० दशलक्ष प्रवासी हाताळू शकेल. मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवाशांसाठी हे दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी होईल.
पंतप्रधानांच्या या महत्त्वाच्या कार्यक्रमाला ठाकरे गटाचे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार अरविंद सावंत यांना निमंत्रण देण्यात आले आहे. मेट्रो-३ च्या अंतिम टप्प्यातील अनेक स्थानके त्यांच्या मतदारसंघामध्ये येत असल्यामुळे त्यांना हे निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, खासदार अरविंद सावंत यांनी या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. निमंत्रण पत्रिकेत त्यांचे नाव नसल्यामुळे त्यांनी ही भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यात याव्यतिरिक्त मुंबई वन नावाच्या एका एकात्मिक कॉमन मोबिलिटी ॲपचे आणि शॉर्ट-टर्म एम्प्लॉयबिलिटी प्रोग्राम (STEP) चे देखील लोकार्पण होणार आहे. तसेच उद्या (९ ऑक्टोबर) ते ब्रिटीश पंतप्रधान सर किअर स्टारमर यांची मुंबईत भेट घेणार आहेत.