Navi Mumbai Airport : मोदींची एक बैठक अन् क्षणात संपले 8 अडथळे, देवेंद्र फडणवीसांनी सांगितली इनसाईड स्टोरी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. १९,६५० कोटी खर्चून बांधलेले हे विमानतळ मुंबईसाठी दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, ज्यामुळे CSMIA वरील ताण कमी होईल.

Navi Mumbai Airport : मोदींची एक बैठक अन् क्षणात संपले 8 अडथळे, देवेंद्र फडणवीसांनी सांगितली इनसाईड स्टोरी
| Updated on: Oct 08, 2025 | 4:30 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपासून दोन दिवस मुंबई दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबईतील नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. हा टप्पा सुमारे १९,६५० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवाशांसाठी हे दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई विमानतळाच्या निर्मितीमागील एक इनसाईड स्टोरी सांगितली.

आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा आहे आणि मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये जे बोलले जाते, त्याचे प्रत्यक्ष लोकार्पण होत आहे, ही आनंदाची बाब आहे. हे विमानतळ नव भारताचे प्रतीक आहे. ९० च्या दशकात विमानतळाची संकल्पना होती, पण काम फक्त एका बोर्डापर्यंत मर्यादित होते. मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर आम्ही त्यांना या प्रकल्पाचा आढावा घेण्याची विनंती केली. तेव्हा मोदींनी ‘प्रगती’ (PRAGATI) अंतर्गत हा प्रकल्प घेतला, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मोदींच्या एका बैठकीमुळे पूर्ण

या प्रकल्पाच्या ८ एनओसी (NOCs) अडकल्या होत्या. पंतप्रधान मोदींनी पहिल्याच बैठकीत त्यापैकी सात एनओसी मिळवून दिल्या आणि १५ व्या दिवशी आठवी एनओसीही प्राप्त झाली. जे काम गेल्या १० वर्षांत झाले नाही, ते मोदींच्या एका बैठकीमुळे पूर्ण झाले. हा एअरपोर्ट एक इंजिनिअरिंग मार्बल आहे, कारण यासाठी मोठा पहाड (टेकडी) हटवावा लागला आणि नदीचा प्रवाहही बदलावा लागला. त्यातून सुंदर एअरपोर्ट सुरू झाला. हा भारताच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. हा एक एअरपोर्ट आहे, त्यातून एक टक्का महाराष्ट्राचा जीडीपी वाढणार आहे. वॉटर टॅक्सी इथे असेल. त्यातून गेटवेला जाता येणार आहे, अशीही माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.

प्रत्येक क्षणाला केंद्र सरकार सोबत

यावेळी फडणवीसांनी मुंबईतील पायाभूत सुविधांच्या कामांचाही उल्लेख केला. ४० किलोमीटरची अंडरग्राऊंड मेट्रोही तयार होत आहे. देशातील सर्वात मोठी अंडरग्राऊंड मेट्रो मुंबईत होत आहे. उत्तर आणि दक्षिण मुंबईला जोडणारी ही मेट्रो आहे. अनेक अडथळे आले. त्याची शर्यत पार करत आम्ही काम केलं. कारण प्रत्येकवेळी मोदी आमच्या पाठी होते. प्रत्येक क्षणाला केंद्र सरकार सोबत होतं. त्यामुळे सर्व अडथळे दूर करता आलं, असेही फडणवीसांनी म्हटले.