
Mumbai Municipal Corporation Election: मुंबई महापालिकेसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. तर राष्ट्रवादीला सोबत घेण्याची तयारी सुरू आहे. दुसरीकडे काँग्रेसने मुंबईत स्वबळाचा नारा दिला आहे. महाविकास आघाडीसोबत न जाता एकला चलो रेचा निर्णय घेतला आहे. पण त्यांना वंचित बहुजन आघाडीसोबत हवी आहे. त्यावर चर्चा सुरू असतानाच आता वंचितकडून दिलेल्या प्रस्तावामुळे काँग्रेस पेचात अडकली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ताणल्यामुळे काँग्रेसचे टेन्शन वाढले आहे. मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेसला एकट्यानेच लढवावी लागते की काय असा प्रश्न विचारला जातोय.
मुंबई महापालिकेत हव्यात फिफ्टी फिफ्टी जागा
मुंबई महापालिका निवडणुकीत 50-50 जागा वाटपावर ठाम असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे. तर आम्ही राज्यभर डेडलाईन देऊ शकत नाही, तर मुंबईबाबतही स्पष्टता नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
आघाडी जाहीर करण्याबाबत विचारलं असता ‘थांबा’ असं सांगितलं जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र जाणार नाहीत, हे माहिती असल्याने आता आम्हालाच कुणासोबत जायचं याचा निर्णय घ्यावा लागणार आहे, असंही आंबेडकर म्हणाले आहे. तर मुंबईत काँग्रेससोबत अद्याप जागा वाटपावर चर्चा सुरू झालेली नाही. मात्र, जागा वाटपात 50 टक्के हिस्सा मिळालाच पाहिजे, या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत, असं त्यांनी जाहीर केलं आहे. कारण, महापालिकेत आमचं अस्तित्व आणि ताकद आम्ही दाखवून दिली आहे, तसेच, मुंबईत 200 जागांवर लढण्यासाठी आमची पूर्ण तयारी असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
नवरदेव तयार, मुली पाहण्याचा कार्यक्रम सुरू
त्यांनी यावेळी राजकीय उपमा देत म्हटलं की, नवरदेव तयार आहे, मुली पाहण्याचाही कार्यक्रम सुरू आहे. सध्या फक्त चहापाण्याच्या चर्चा सुरू आहेत. तर मुलगी पसंत पडली, की लग्न लावू, अशी मिश्किल टिप्पणी करत त्यांनी आघाडीच्या चर्चांवर भाष्य केल आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आघाडीसाठी काँग्रेसची वंचित बरोबर चर्चा सुरू आहे.
चर्चेची एक फेरी
मुंबई महानगर पालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी बरोबर आघाडी करण्यासाठी काँग्रेस पक्षाची बोलणी सुरू आहेत. मुंबई काँग्रेस कडून आज अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव यु. बी. व्यंकटेश, सचिन सावंत व माजी मंत्री आमदार अस्लम शेख यांनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी रविवारी चर्चा केली. आघाडीसाठी दोन्ही पक्ष लवकरच चर्चा करणार आहेत अशी माहिती मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी दिली आहे.
मुंबई काँग्रेसने वंचितसोबत आघाडी करण्यासाठी तीन सदस्यांची समिती स्थापन केली असून या समितीत आमदार अमीन पटेल, माजी आमदार मधु चव्हाण, व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आणि मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांचा समावेश आहे. आजची चर्चा सकारात्मक झाली असून लवकरच पुन्हा चर्चा केली जाईल, असेही सुरेशचंद्र राजहंस यांनी सांगितले आहे.दोन तीन दिवसात वर्षा गायकवाड ह्या एका कमिटी बनवून प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलती. प्रकाश आंबेडकर सकारात्मक आहे, असेही यु. बी. व्यंकटेश म्हणाले.