सलमान खानच्या घराजवळील सार्वजनिक शौचालय बीएमसीने अचानक हटवलं

सलमान खानच्या घराजवळील सार्वजनिक शौचालय बीएमसीने अचानक हटवलं

मुंबई : अभिनेता सलमान खानच्या घराजवळील सार्वजनिक शौचालय अचानकपणे हटवले गेले आहे. सलमानचे वडील सलीम खान यांच्या दबावामुळे हे शौचालय हटवण्यात आल्याचा आरोप बांद्रा बँडस्टँड रेसिडेंट्स ट्रस्टच्या (BBRT) सदस्यांनी केला आहे. लवकरात लवकर हे शौचालय पुन्हा बसवण्यात यावं अशी मागणी स्थानिकांनी टीव्ही 9 मराठीच्या माध्यमातून केली आहे.

मुंबईच्या बँडस्टँडवर लोकांची सदैव वर्दळ असते, दूरदूरहून पर्यटक याठिकाणी येत असतात. त्यांची आणि विशेषत: महिलांची गैरसोय लक्षात घेऊन 2017 मध्ये बँडस्टँडवर हे सार्वजनिक शौचालय बसवण्यात आलं होतं . सुरवातीला सलमान खानचे वडिल सलीम खान आणि वहिदा रहमान यांनी या शौचालयाला विरोध केला होता. खरं तर या सार्वजनिक शौचालयाचं मेन्टेनंन्स बांद्रा बँडस्टँड रेसिडेंट्स ट्रस्ट करते. मात्र महापालिकेने गुरुवारी अचानक हे सार्वजनिक शौचालय हटवलं. बांद्रा बँडस्टँड रेसिडेंट्स ट्रस्टला पुर्वसूचना ही दिली गेली नाही.

हे सार्वजनिक शौचालय का हटवण्यात आलं, या बाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बांद्रा बँडस्टँड रेसिडेंट्स ट्रस्टचे ट्रस्टी बेनेडिक स्वारस यांनी विचारणा केली असता, महापालिकेवर दबाव होता, असे उत्तर त्यांना देण्यात आले. महापालिकेवर सलीम खान यांचा दबाव होता, असा आरोप स्वारस यांनी केला.

हे सार्वजनिक शौचालय महापालिकेने हटवल्याची माहिती स्थानिक नगर सेवक आसिफ झकारिया यांनाही नव्हती. त्यांनी वॉर्ड ऑफिसमध्ये चौकशी केली. तेव्हा महाराष्ट्र सागरी मंडळाकडून बँडस्टँडवर काही कामं केली जाणार आहेत, त्यामुळे हे शौचालय हटवण्यात आल्याचं झकारिया यांना सांगण्यात आलं.

पर्यटकांच्या सोयीसाठी तयार करण्यात आलेलं हे शौचालय विकास कामांच्या नावाखाली जाणूनबूजून येथून हटवण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.