पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट, एकनाथ शिंदेंसोबत बावड्याचा फोटो; संजय राऊत यांच्या ट्विटने खळबळ
ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी संशयित आरोपी निखिल पवार उर्फ बावड्याचा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा फोटो ट्विट केला आहे. या फोटोवरून राऊत यांनी शिंदे गटावर 'राजकीय षडयंत्रा'चा आरोप करत, बावड्या कुणाचा माणूस होता हे स्पष्ट होत असल्याचं म्हटलं आहे.

ठाण्यातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी निखिल पवार उर्फ बावड्या याचा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा एक फोटो ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. बावड्या कुणाचा माणूस आहे? कुणाचा आदेश पाळत होता? हे स्पष्ट होत आहे, असं संजय राऊत यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, या ट्विटवर शिंदे गटाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि निखिल पवार याचा फोटो ट्विट केला आहे. त्यावर त्यांनी कमेंटही केली आहे. पूर्णेकर हत्या: Updates… मॅडम मीनाक्षी शिंदे, निखिल पवार उर्फ बावड्या याला पोलिसांनी अटक केली आहे. तो कोणाचे आदेश पाळत होता? तो कोणाचा माणूस होता? हे या फोटोत स्पष्ट दिसत आहे, असं संजय राऊत यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
पूर्णेकर हत्या: Updates मॅडम मीनाक्षी शिंदे, निखिल पवार उर्फ बावड्या याला पोलिसांनी अटक केली आहे, तो कोणाचे आदेश पाळत होता? तो कोणाचा माणूस होता? हे या फोटोत स्पष्ट दिसत आहे ।@Dev_Fadnavis @AmitShah @PMOIndia pic.twitter.com/ZyidATBo3U
— Sanjay Raut (@rautsanjay61) October 2, 2026
या मागे मिंधे गट
दरम्यान, राऊत यांनी आज मीडियाशी संवाद साधताना या प्रकरणावरून शिंदे गटावर हल्ला केला आहे. निखिल पवार नावाच्या आरोपीला पोलिसांनी पकडलं. एकनाथ शिंदेंनी जवळ जवळ त्याच्या गळ्यात हात घातला आहे. पूर्णेकरांचा खून मिंधे परिवारांनीच केला ना? तुम्ही माझं ट्विट पाहिलं नाही का? कालच मी ट्विट केलंय. पाहा तुम्ही. हा शार्पशूटर हा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या XXXला XXX लावून बसला आहे. या मागे राजकीय षडयंत्र आहे. यामागे मिंधे गट आहे, असा आरोप राऊत यांनी केला आहे.
त्यांना एआयए माहीत आहे का?
ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी काल संजय राऊतांवर टीका केली होती. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. मी मिनाक्षी शिंदेंवर आरोप केले नाही. एफआयआरमध्ये त्यांचे नाव आहे. राम पूर्णेकर यांनी जे काही पाहिलं, त्या आधारावर मी बोललो आहे, असं राऊत म्हणाले. तसेच ती क्लिप महापालिका निवडणुकीतील आहे. तेव्हा एआय जनरेटेड असं काही नव्हतं. ती क्लिप आता आली का? महापालिकेवेळी का बोलल्या नाही? मिंधे गटाला एआय म्हणजे माहीत आहे का? असा हल्लाच त्यांनी चढवला.
गणेशजी, लढ्यात उतरा
यावेळी त्यांनी पुन्हा एकदा भाजप नेते गणेश नाईक आणि संजय केळकर यांना आवाहन केलं आहे. नुसत्या भावना पोहोचून चालणार नाही गणेशजी. तुम्ही जुने जाणते लोकप्रिय नेते आहात. तुम्ही आमचे जुने सहकारी आहात. तुम्ही या लढ्यात उतरलं पाहिजे. ठाण्याचं बीड, शिकागो होत आहे. माफियागिरी सुरू आहे. नाईकांनी ठाण्याचं नेतृत्व करावं. संजय केळकरांनी पुढे यावं. नाही तर ठाण्यातील संस्कृती नष्ट होईल, असं राऊत म्हणाले.
सुषमा अंधारेंनी दाखवले फोटो
दरम्यान, सुषमा अंधारे यांनीही आज ठाण्यात येऊन पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी संशयित आरोपीचा एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा फोटो मीडियाला दाखवला. आम्ही पूर्णेकर कुटुंबीयांसोबत ठामपणे उभे आहोत. पूर्णेकर यांच्या जाण्याने आमच्या पक्षाचं अतोनात नुकसान झालं आहे.दोन आरोपींना अटक झाली आहे. अजून एका आरोपीला अटक झाली नाही. मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांना अटक झाली नाही, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
