नवी मुंबई सिडको ‘स्वप्नपूर्ती’ची पहिल्याच पावसात ‘जलपूर्ती’, गुडघ्याभर पाण्यात सापांचा वावर

| Updated on: Jul 05, 2020 | 4:26 PM

सिडकोने खारघरमध्ये गरिबांसाठी उभारलेल्या 'स्वप्नपूर्ती' या सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाला पहिल्याच पावसाचा फटका बसला आहे (Rain water enter in CIDCO society New Mumbai).

नवी मुंबई सिडको स्वप्नपूर्तीची पहिल्याच पावसात जलपूर्ती, गुडघ्याभर पाण्यात सापांचा वावर
Follow us on

नवी मुंबई : सिडकोने खारघरमध्ये गरिबांसाठी उभारलेल्या ‘स्वप्नपूर्ती’ या सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाला पहिल्याच पावसाचा फटका बसला आहे. सिडकोच्या ढिसाळ नियोजनामुळे स्वप्नपूर्ती सोसायटीत गुडघाभर पाणी साठले आहे. या पाण्यात काही नागरिकांनी सापसुद्धा फिरताना पाहिले. त्यामुळे चिंता वाढली आहे (Rain water enter in CIDCO society New Mumbai).

विशेष म्हणजे नागरिकांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांना एक दिवसाआधीच पाणी साठल्याची तक्रार केली. मात्र, तरीही लक्ष न दिल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून स्वप्नपूर्ती सोसायटीतील रहिवाशी भीतीच्या सावटाखाली आहेत (Rain water enter in CIDCO society New Mumbai).

खारघर सेक्टर 36 येथे सिडको निर्मित ‘स्वप्नपूर्ती’ सोसायटीत गेल्या दोन वर्षांपासून पाणी साठण्याचा प्रकार घडत आहे. सिडकोने स्वप्नपूर्ती सोसायटी तयार करताना आजूबाजूच्या बिल्डरांना पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याबाबत नियोजन करण्याचे आदेश दिले नाहीत. त्यामुळे या बांधकामांवर पडणारे पावसाचे पाणी सोसायटीच्या पाठीमागे खोलगट भागात गोळा होतं. या ठिकाणी स्वप्नपूर्ती सोसायटीची संरक्षण भिंत आहे.

हेही वाचा : ‘आत्मनिर्भर’च्या नावाखाली भाजपकडून कोकणवासियांची दिशाभूल : अनिल परब

खोलगट भागात साठलेल्या पाण्याला बाहेर पडण्यास वाट नसल्यामुळे हे पाणी थेट संरक्षण भिंतीच्या खालून सोसायटीत घुसत आहे. रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सोसायटीतील एल 30 क्रमाकांच्या इमारतीपासून अर्ध्या सोसायटीत गुडघाभर पाणी साठले आहे. अक्षरशः एखाद्या नदीतुन वाहणाऱ्या पाण्याप्रमाणे इमारतींखाली साठलेले पाणी प्रवेशद्वाराच्या दिशेने वेगात वाहत आहे.

पावसाच्या संतत धारेमुळे पाण्याची पातळी वाढतच चालली आहे. इमारतींखाली उभी असलेली वाहनांची चाके पाण्यात बुडाली आहेत. सोसायटीतील काही सतर्क रहिवाशांनी एक दिवस आधीच सिडकोच्या अभियंत्यांना संपर्क करुन परिस्थिती कानावर घातली. मात्र अभियंत्यांनी नेहमीप्रमाणे नागरिकांच्या तक्रारीकडे कानाडोळा केला. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे रात्री स्वप्नपूर्ती सोसायटीला तळ्याचे रुप प्राप्त झाले.

सोसायटीत आलेल्या पाण्यामुळे काही नागरिकांनी सापसुद्धा फिरताना पाहिले. त्यामुळे साठलेल्या पाण्यामुळे अधिकच धोका वाढला आहे. याबाबत तात्काळ समस्या सोडवण्याचे आदेश दिले असल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.

स्वप्नपूर्ती सोसायटीच्या पाठीमागील शेत जमिनीत नामांकित बिल्डरांच्या टोलेजंग इमारतींचे बांधकाम सुरु आहे. बांधकाम करताना विकासकांनी पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था न केल्यामुळे वाहत्या पाण्याला जाण्यासाठी वाट राहिली नाही. याठिकाणी नाला तयार करण्याचे शहाणपण अद्याप सिडकोला सुचलेले नाही. त्यामुळे दर पावसाळ्यात रहिवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.