
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांची धामधूम सध्या सुरु आहे. मुंबई महानगरपालिकेची मुदत २०२२ मध्येच संपली होती. मात्र त्यानंतर तब्बल चार वर्षे उलटूनही निवडणुका का घेतल्या गेल्या नाहीत, यावरुन सध्या राजकारण तापले आहे. २०२४ आणि २०२५ या दोन वर्षांच्या काळात निवडणुका वारंवार पुढे ढकलण्यामागे सत्ताधाऱ्यांचे एक मोठे नियोजन होते, असा खळबळजनक दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. जानेवारी २०२६ मध्ये होणाऱ्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत गंभीर आरोप केले.
खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीत अनेक आरोप केले आहेत. यावेळी राज ठाकरे यांनी मुलाखतीत स्पष्टपणे म्हटले. २०२२ मध्ये उद्धव ठाकरेंचे सरकार गेल्यानंतर महापालिका विसर्जित झाली, तरीही आज २०२६ उजाडले तरी निवडणुका का रखडल्या? या चार वर्षांत नेमकं काय शिजत होतं? असा सवाल राज ठाकरेंनी केला. हा विलंब केवळ तांत्रिक नव्हता, तर मुंबईवर ताबा मिळवण्यासाठी आखलेला एक मोठा आराखडा होता. २०२४ ते २०२५ या काळात पडद्यामागे घडलेल्या घडामोडी आणि निवडणुका पुढे ढकलण्यामागचे खरे कारण काय होते, याचा सविस्तर गौप्यस्फोट आपण येत्या काही भाषणांतून करणार आहे, असे राज ठाकरे यांनी जाहीर केले.
मराठी माणसाच्या सहीनेच मराठी माणसाचे डेथ वॉरंट काढले जात आहे असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. यावर राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. सध्या सत्तेत बसवलेली माणसे ही केवळ स्वाक्षरी करण्यासाठी आहेत. मुंबईला भाजपच्या माध्यमातून अदानींच्या घशात घालण्याचे प्रयत्न सुरू असून, आपल्याच मराठी लोकांना आपण काय घोडचुका करतोय हे कालांतराने समजेल, असा इशाराही राज ठाकरेंनी केला.
राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत सत्ताधाऱ्यांच्या मानसिकतेवर प्रहार केला. त्यांनी स्वित्झर्लंडचे उदाहरण देत सांगितले की, एखाद्या शहरात जन्माला आल्याशिवाय तिथल्या नस ना नस समजत नाही. बाहेरून येऊन जेव्हा एखादा मंत्री मुंबई पाहतो, तेव्हा त्याला येथील रस्ते, पाणी आणि वीज पाहून वाटते की इथे काहीच समस्या नाहीत. कारण तो इथल्या परिस्थितीची तुलना त्याच्या भागातील भीषण लोडशेडिंग आणि कच्च्या रस्त्यांशी करतो. पण मुंबईची गरज आणि इथल्या जगण्याचा संघर्ष वेगळा आहे, जो या बाहेरच्या लोकांना कधीच कळणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले.