बाळासाहेबांच्या फोटोसमोर भेट, राज ठाकरेंशी 20 मिनिटे चर्चा, उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया काय?

उद्धव ठाकरे यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांनी 'मातोश्री'ला भेट दिली. या भेटीने ठाकरे बंधूंमधील दुरावा कमी झाल्याचे दिसून आले. दोघांनी एकत्र वेळ घालवला आणि फोटो काढले. उद्धव ठाकरे यांनी या भेटीबद्दल आनंद व्यक्त केला. ही भेट मराठी प्रश्नावर एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर झाली. यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह पसरला आहे.

बाळासाहेबांच्या फोटोसमोर भेट, राज ठाकरेंशी 20 मिनिटे चर्चा, उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया काय?
raj thackeray uddhav thackeray (2)
| Updated on: Jul 27, 2025 | 1:30 PM

शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त आज ‘मातोश्री’वर उत्साहाचे वातावरण होते. राज्यभरातील हजारो शिवसैनिकांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. मात्र, आजच्या दिवस खऱ्या अर्थाने लक्षवेधी ठरला तो क्षण म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ भेटीचा. राज ठाकरे यांनी सकाळी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. यानंतर त्यांनी दिलेली प्रतिक्रियाही फार बोलकी होती.

उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

राज ठाकरे यांनी सकाळी ११.३० वाजता ‘शिवतीर्थ’हून निघत दुपारी १२ वाजता ‘मातोश्री’ गाठले. राज ठाकरे यांचे स्वागत करण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः खासदार संजय राऊत यांच्यासोबत बाहेर आले. या क्षणी दोघांच्याही चेहऱ्यावर स्मितहास्य दिसत होते. यावेळी उमटलेले स्मितहास्य उपस्थितांसाठी खास होते. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना लाल गुलाबाचा पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सदिच्छा व्यक्त केल्या. त्यानंतर दोघांनी एकत्र फोटो काढले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे दिसून येत होता.

या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना अवघे दहा मिनिटे थांबण्याची विनंती केली. ते राज ठाकरे यांना घेऊन आत गेले. मिळालेल्या माहितीनुसार, त्या दोघांमध्ये अनौपचारिक चर्चा झाली. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोसमोर फोटो काढला. ते दोघेही २० मिनिट चर्चा करत होते. यानंतर राज ठाकरे ‘शिवतीर्थ’कडे रवाना झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली. “मला खूप आनंद झाला,” असे राज ठाकरेंनी म्हटले. या प्रतिक्रियेतून राज ठाकरे यांच्या भेटीमुळे त्यांना झालेल्या भावनिक समाधान झाल्याचे पाहायला मिळत आहे.

राज ठाकरे-उद्धव ठाकरेंचा दुरावा संपला

गेल्या काही वर्षांपासून ठाकरे बंधूंमधील संबंध ताणले होते. मात्र मराठीच्या मुद्द्यावर या दोघांमधील दुरावा कमी झाला. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या मराठी विजयी मेळाव्यासाठी राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र आले होते. यानंतर आजच्या भेटीने त्यांच्यातील कौटुंबिक जिव्हाळा पाहायला मिळाला.

दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त आज ‘मातोश्री’ निवासस्थानी जल्लोषाचे वातावरण आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मुंबईसह राज्यभरातून हजारो शिवसैनिक मोठ्या उत्साहात दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे स्वतः प्रत्येक शिवसैनिकाला भेटत असल्याने कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ‘मातोश्री’ला फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली असून, ठिकठिकाणी शुभेच्छांचे बॅनर लावण्यात आले आहेत, जे कार्यकर्त्यांमधील उत्साह द्विगुणित करत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले शिवसैनिक मुंबईत दाखल झाल्याने मातोश्रीबाहेर कार्यकर्त्यांची अलोट गर्दी उसळली आहे. या विशेष दिवसाच्या निमित्ताने सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे.