हिंदू खाटीक समाजातील सर्व जातींना एकाच प्रवर्गातून आरक्षण व सवलती द्या; धनंजय मुंडे यांची केंद्राकडे मागणी

हिंदू खाटीक समाजात लाड खाटीक, धनगर खाटीक, कलाल खाटीक, मराठा खाटीक अशी विविध नावे विभागानुसार पडलेली आहेत, हा समाज अनुसूचित जातीच्या सवलतीपासून त्यामुळे वंचित आहे.

हिंदू खाटीक समाजातील सर्व जातींना एकाच प्रवर्गातून आरक्षण व सवलती द्या; धनंजय मुंडे यांची केंद्राकडे मागणी
हिंदू खाटीक समाजातील सर्व जातींना एकाच प्रवर्गातून आरक्षण व सवलती द्या; धनंजय मुंडे यांची केंद्राकडे मागणी
| Updated on: May 18, 2022 | 11:32 PM

मुंबई: राज्यात हिंदू खाटीक (Hindu Khatik) समाजाला वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावे आहेत, हिंदू खाटीक, कलाल खाटीक, धनगर खाटीक अशी नावे विभागनिहाय वेगळी आहेत तसेच काही भागात अनुसूचित जातीशिवाय (Scheduled Castes) ओबीसी व अन्य पोट प्रवर्गातून आरक्षण (Reservation) दिलेले आहे. हिंदू खाटीक प्रवर्गातील सर्व नावे एकाच प्रवर्गातील असल्याचे ग्राह्य धरून त्यांना अनुसूचित जातीप्रमाणे सर्व सवलती लागू कराव्यात, यासाठी राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागामार्फत केंद्र सरकारला परिपूर्ण प्रस्ताव शिफारशींसह पाठविण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आज झालेल्या बैठकीत दिली.

महाराष्ट्र राज्य हिंदू खाटीक मागासवर्गीय सामाजिक संघटनेच्या विनंतीवरून मंत्रालयात यासंदर्भात धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली.

या बैठकीस मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, तसेच संघटनेचे अध्यक्ष अॅड. व्यंकट बेदरे, विनोद गायकवाड, कॅ. निलेश पेंढारी, सुधीर निकम, दिलीप भोपळे, अमित कोटींगरे, सम्राट खराटे आदी उपस्थित होते.

एकच प्रवर्ग म्हणून विचार व्हावा

हिंदू खाटीक समाजात लाड खाटीक, धनगर खाटीक, कलाल खाटीक, मराठा खाटीक अशी विविध नावे विभागानुसार पडलेली आहेत, हा समाज अनुसूचित जातीच्या सवलतीपासून त्यामुळे वंचित आहे. या सर्व नावांचा एकच प्रवर्ग म्हणून विचार व्हावा व त्यांना अनुसूचित जातीच्या सवलती मिळाव्यात या प्रमुख मागण्यांसह अन्य काही मागण्यांचे निवेदन धनंजय मुंडे यांना देण्यात आले होते. त्यानंतर मुंडे यांनी बार्टी मार्फत समाजाच्या सद्यस्थितीचा अभ्यास करण्याचे निर्देश दिले होते.

सदर त्रुटींची 15 दिवसांच्या आत पूर्तता

बार्टीने सादर केलेल्या अभ्यास अहवालात काही त्रुटी असल्याचे ना. मुंडे यांनी नमूद करत सदर त्रुटींची 15 दिवसांच्या आत पूर्तता करून सुधारित अहवाल दाखल करण्याचे निर्देश त्यांनी बार्टीला दिले आहेत.

अनेक वर्षांपासूनच्या मागण्या मार्गी

बार्टीकडून हा सुधारित अहवाल प्राप्त होताच परिपूर्ण प्रस्ताव राज्य शासनाच्या शिफारशीसह केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केले. हिंदू खाटीक समाजाच्या अनेक वर्षांपासूनच्या मागण्या मार्गी लागल्याने संघटनेच्या वतीने अध्यक्ष ऍड. व्यंकट बेदरे यांनी धनंजय मुंडे यांचे आभार मानले.