
मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं ही मराठा बांधव आणि मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केली आहे. त्यासाठी मुंबईत भगवे वादळ आले आहे. हजारो मराठा आंदोलक राज्यभरातून मुंबईत हजर झाले आहेत. या आंदोलकांना पाहून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ‘सरकार एवढे निष्ठुर झाले तर लोकशाहीलाच काय तर माणुसकीला सुद्धा अर्थ राहणार नाही’ असे म्हटले आहे.
काय आहे रोहित पवार यांची पोस्ट?
रोहित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया एक्स अकाऊंटवर पोस्ट करत म्हटले की, ‘मुंबई शहरातील पाणपोया बंद, रेल्वे स्थानकावरील तसेच इतर ठिकाणावरील सार्वजनिक स्वच्छतागृहांना काही ठिकाणी लॉक करण्यात आले आहेत तर काही ठिकाणी पाणी बंद करण्यात आले आहे. पिण्याचे पाणी देखील उपलब्ध केले जात नसल्याचे तसेच सामाजिक संघटना पाठवत असलेली मदत देखील ब्लॉक करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे समजत आहे. खाऊगल्ल्या, टपऱ्या, हॉटेल्स देखील बंद ठेवण्याचे अलिखित आदेश आहेत. शांतेतेच्या मार्गाने आंदोलन करणारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आंदोलक माणसं आहेत याचा सरकारला विसर पडला की काय?’
वाचा: आंदोलकांची गैरसोय कशी होईल याचे नियोजन; रोहित पवारांचे गंभीर आरोप
मुंबई शहरातील पाणपोया बंद, रेल्वे स्थानकावरील तसेच इतर ठिकाणावरील सार्वजनिक स्वच्छतागृहांना काही ठिकाणी लॉक करण्यात आले आहेत तर काही ठिकाणी पाणी बंद करण्यात आले आहे. पिण्याचे पाणी देखील उपलब्ध केले जात नसल्याचे तसेच सामाजिक संघटना पाठवत असलेली मदत देखील ब्लॉक करण्याचे प्रयत्न… pic.twitter.com/o2Aj5Ry3LG
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 30, 2025
पुढे ते म्हणावे, ‘सरकार एवढे निष्ठुर झाले तर लोकशाहीलाच काय तर माणुसकीला सुद्धा अर्थ राहणार नाही. सरकारने त्वरित मूलभूत सुविधा द्याव्यात आणि आंदोलकांशी संवाद सुरू ठेवावा. संवाद ठेवल्यास संवेदनशीलता आणि सामंजस्य दाखवण्यास आंदोलक देखील सकारात्मक प्रतिसाद देतील आणि तोडगा निघेल.’ सध्या सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे.
आधीही पोस्ट करत सरकारवर निशाणा साधला
काल देखील रोहित पवार यांनी पोस्ट शेअर करत मराठा आंदोलकांची गैरसोय होत असल्याचे म्हटले होते. आंदोलनस्थळी आंदोलकांना सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतात आणि हेच लोकशाहीचे खरे तत्व आहे, परंतु राज्य सरकार आंदोलकांची गैरसोय कशी होईल याचे नियोजन करत असेल तर ते हुकुमशाहीचे लक्षण म्हणावे लागेल असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले होते. त्यानंतर आता पुन्हा त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.