
सध्या राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. महाराष्ट्रातील २७ महापालिकांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. आज महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता मराठी अस्मिता आणि महापौर पदावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबईचा पुढचा महापौर हा मराठीच असेल आणि तो ठाकरेंच्या विचारांचाच असेल, असा निर्धार व्यक्त केला आहे. यावेळी संदीप देशपांडे यांनी प्रचारादरम्यान भाजपवर परप्रांतीय महापौर बसवण्याचा घाट घातल्याचा खळबळजनक आरोप केला.
मनसेने वॉर्ड क्रमांक १९२ मधून यशवंत किल्लेदार यांना तिकीट दिले आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अनेक कार्यकर्ते-पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संदीप देशपांडे यांनी भाजपवर टीका केली. मराठी माणसाची ही एकजूट पाहून विरोधकांच्या पोटात गोळा आला आहे. महापालिकेत भ्रष्टाचाराचा डोंगर उभा करणाऱ्यांना आता घरचा रस्ता दाखवण्याची वेळ आली आहे, असे संदीप देशपांडे म्हणाले.
भाजप आमदार अमित साटम यांनी मनसे आणि ठाकरे गटावर मामू अशी टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना देशपांडे यांनी नवीन शब्द वापरत भाजपचा समाचार घेतला. अमित साटम आणि त्यांचे सहकारी हे पमू लोक आहेत. त्यांना मुंबईच्या विकासापेक्षा परप्रांतीयांच्या मतांचे राजकारण महत्त्वाचे वाटते. भाजपची रणनीती पाहिली तर मुंबईत परप्रांतीय महापौर करण्यासाठी ते हालचाली करत आहेत, पण आम्ही ते कधीही होऊ देणार नाही,” असे संदीप देशपांडे यांनी ठणकावून सांगितले.
महानगरपालिकेच्या आगामी गणितांवर भाष्य करताना संदीप देशपांडे यांनी मोठा दावा केला. यावेळी माहीम विधानसभा क्षेत्रातून ठाकरे बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विचारांचे ६ नगरसेवक निवडून येतील. मुंबईची सत्ता कोणाच्या हातात द्यायची हे आता मुंबईकर मराठी माणसाने ठरवले आहे. मुंबईचा महापौर मराठीच होणार, हे आता सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान आगामी महानगरपालिका निवडणुका केवळ सत्तेचे समीकरण नसून, ती महाराष्ट्राच्या अस्मितेची आणि वर्चस्वाची लढाई ठरत आहे. मुंबईसह २७ महत्त्वाच्या महापालिकांच्या या रणधुमाळीत युती, आघाडी आणि पक्षांतर्गत नाराजी पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे प्रत्येक प्रभागात उमेदवारी अर्जांच्या शेवटच्या दिवशी झालेली गर्दी आणि नेत्यांमधील शाब्दिक युद्ध पाहता, ही निवडणूक येणाऱ्या काळातील राज्याची राजकीय दिशा ठरवणार असल्याचे बोललं जात आहे.