संजय राऊत थेट राष्ट्रवादीला भिकारी म्हणाले; अचानक हल्ला का?
अर्थमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या मागणीवरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादीवर तीव्र टीका केली आहे. राऊत यांनी राष्ट्रवादीला थेट 'भिकारी' संबोधलं. या टीकेमुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यावर राष्ट्रवादीतून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीने पुन्हा एकदा अर्थमंत्रीपद मिळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन अर्थमंत्रीपदाची मागणी केल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढवला आहे. राऊत यांनी थेट राष्ट्रवादीला भिकारीच म्हटलं आहे. राऊत यांच्या या विधानाने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यावर आता राष्ट्रवादीतून काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
खासदार संजय राऊत मीडियाशी संवाद साधत होते. अर्थ खातं हा लहान विषय आहे. आमच्या सारख्यांना वाटायचं की अजित पवारांना मुख्यमंत्रीपद मिळायला हवं होतं. आताच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा ते अधिक सक्षम होते. ते सर्वाधिक अनुभवी होते. आता तुम्हाला जाऊन याचका सारखं दारात उभं राहावं लागतं भिकाऱ्यासारखं. स्वाभिमान नावाची काही गोष्ट ठेवा. अजितदादांचा रुबाब होता, नाव होतं, असा हल्लाच संजय राऊत यांनी चढवला आहे.
स्वाभिमान दाखवा
अजितदादांमधील स्वाभिमान जागा झाला होता. ते सरकारमधून बाहेर पडण्याच्या तयारीत होते. त्यांनी चर्चा सुरू केल्या होत्या. भाजपचे लोकं फसवे आहेत. ढोंगी आहेत, शब्दाला जागत नाहीत. जवळ घेऊन दगलबाजी करतात, हे त्यांचं म्हणणं होतं. हे त्यांच्या लोकांना माहीत होतं. तेव्हा अर्थ खातं मागणार, अमूक मागणार ही लाचारी बंद करा. या भंपक लोकांबरोबर राहण्यापेक्षा दादांचा स्वाभिमान दाखवा कुठे तरी, असा घणाघातही संजय राऊत यांनी चढवला.
म्हणून त्यांना 500 कोटी
दरम्यान, यावेळी त्यांनी 500 कोटींच्या मुद्द्यावरूनही प्रतिक्रिया व्यक्त केली. खासदार श्रीकांत शिंदे यांनी 500 कोटी कसे दिसतात? याचा विचार मी करतोय, असं म्हटलं होतं. त्यावरून राऊत यांनी खोचक टोला लगावला. त्यांनी 5-5 हजार कोटी पाहिले. 10 हजार कोटी पाहिले आहेत. त्यामुळे त्यांना 500 कोटी लहान रक्कम आहे. आम्हाला 50 हजार रुपये मोठी रक्कम वाटते. त्यांना 500 कोटी किरकोळ वाटतात. त्यांनी अलिकडच्या काळात 5 हजार, 10 हजार कोटी पाहिले आहेत. दिल्लीलाही पोहोचवले आहेत. इथेही उधळले आहेत. त्यामुळे ते बरोबर बोलत आहेत. त्यांना 500 कोटी रुपये कसे दिसतात ते त्यांना माहीत नाही, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला.