नार्वेकर… मी अजून काहीच उघडं केलं नाही, संजय राऊत यांनी स्वीकारलं विधानसभा अध्यक्षांचं चॅलेंज

संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर अलिबागमधील आदिवासींच्या जमिनी हडपल्याचा गंभीर आरोप केला आहे. यावर नार्वेकरांनी मानहानीची नोटीस बजावण्याचा इशारा दिला, जो राऊतांनी स्वीकारला आहे. राऊत म्हणाले, ‘मी अजून काहीच उघडं केलं नाही.’ त्यांनी नार्वेकरांना 20 आदिवासी कुटुंबांचे म्हणणे ऐकण्याचे आवाहन केले.

नार्वेकर... मी अजून काहीच उघडं केलं नाही, संजय राऊत यांनी स्वीकारलं विधानसभा अध्यक्षांचं चॅलेंज
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 24, 2026 | 12:00 PM

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आदिवासींच्या जमिनी हडपल्याचा आरोप केला होता. या आरोपाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रत्युत्तर देतानाच राऊतांविरोधात मानहानीची नोटीस बजावणार असल्याचा इशारा दिला होता. राऊत यांनी नार्वेकर यांचं हे आव्हान स्वीकारलं आहे. मला नोटीस पाठवाच. नोटीस पाठवणं गरजेचं आहे, असं सांगतानाच नार्वेकर, मी अजून काहीच उघडं केलं नाही, असा सूचक इशाराच संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना दिला आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मला शंभर टक्के नोटीस पाठवली पाहिजे. विधानसभा अध्यक्षांनी नोटीस पाठवणं गरजेचं आहे. त्यांच्याशी माझं वैयक्तिक भांडण नाही. त्यांनी जमीन घ्यावी, डोंगर घ्यावा, तळं घ्यावं, समुद्र घ्यावा. जो तो आपल्या ऐपतीप्रमाणे घेत असतो. नार्वेकरांशी भांडण नाही. त्यांचे आणि माझे संबंध जवळचे आहेत. पण 20 आदिवासींचा आक्रोश त्यांनी ऐकला पाहिजे. 20 आदिवासींची घरे बुलडोझर लावून उद्ध्वस्त करण्यात आली. त्यांच्याकडे कुळ कायद्यानुसार कागदपत्र आहेत. सरकारी योजनेतून त्यांची घरे बांधली होती. तुम्ही विधानसभेचे अध्यक्ष आहात. संवैधानिक पदावर आहात. याचं भान ठेवलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.

Loading...

म्हणजे विषय संपेल

अलिबागमधील आदिवासींनी काल प्रतिक्रिया दिली होती. आमच्या जमिनी हडप केल्या नाहीत, असा दावा या आदिवासींनी केला होता. त्याकडेही राऊत यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर, पैसे देऊन आमदार विकत घेतले जातात. खासदार विकत घेतले जातात. पैसे देऊन न्याय विकत मिळतो. तेव्हा तुमच्या बाजूने बोलायला काय जातं? पण ज्या 20 आदिवासींची घरे उद्ध्वस्त केली त्यांच्याशी बोला. विधानसभा अध्यक्षांनी या आदिवासींना आपल्या चेंबरमध्ये बोलवावं. त्या ब्रिटिशीकालीन चेंबरमध्ये तुम्ही 20 आदिवासी कुटुंबांना बोलवावं. त्यांची तुमच्याविषयी तक्रार आहे. त्यांचं म्हणणं ऐका आणि त्यांच्या तक्रारीचं निवारण करा. म्हणजे विषय संपेल, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.

तुम्ही का वकिली करता?

या आदिवासींसाठी उल्का महाजन संघर्ष करत आहेत. त्यावर तुम्ही भूमिका का व्यक्त केली नाही? तुम्ही विधानसभेचे अध्यक्ष आहात. जमीन खरेदी हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण 20 आदिवासींचा आक्रोश हा मोठ्या समाजाचा प्रश्न आहे. उद्या एखाद्या आमदाराने विधानसभेत हा प्रश्न विचारण्याचा विचार केला तर ते त्यांचा प्रश्न विधानसभेत येऊ देणार नाहीत, असा दावा करतानाच या प्रकरणात चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभा अध्यक्षांची वकिली करत आहेत. हा विधानसभा अध्यक्षांच्या कुटुंबाचा प्रश्न आहे. तुम्ही कशी त्यांची वकिली करता? तुमची भूमिका आदिवासींच्या बाजूने हवी. तुम्ही सरकार आहात, असं ते म्हणाले.

कोर्टात जाण्याच्या धमक्या देऊ नका

कायदा सर्वांना समान आहे. त्यामुळे त्या 20 आदिवासींना बोलवा. ते निरक्षर आहेत. त्यांचे अंगठे घेतले गेले आहेत, असं सांगतानाच मला सांगू नका नार्वेकर. अजून मी काहीच उघड केलं नाही. कोर्टात जाण्याच्या धमक्या मला देऊ नका. आमचं अख्खं आयुष्य कोर्टात आणि पोलीस स्टेशनमध्ये गेलं आहे. आम्ही चळवळीतील कार्यकर्ते आहोत, असा इशाराही त्यांनी दिला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us