
मुंबईः महाराष्ट्रातील राजकीय संघर्ष चालू असतानाच आता अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) (Directorate of Enforcement) शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना नोटीस (Notice to MP Sanjay Raut) बजावण्यात आली आहे. संजय राऊत यांना प्रवीण राऊत आणि पत्रा चाळप्रकरणी नोटीस (Pravin Raut And Patra Chawl Land Scam Case)देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. खासदार संजय राऊत यांना ईडीची नोटीस आल्यानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होत असून आता खासदार राऊत यांच्या राजकीय वाटचालीबद्दल आणि त्यांच्या मालमत्तेचीही चर्चा होऊ लागली आहे.
राजकारणात आपल्या विविध वक्तव्याने वादळ उठवून देणाऱ्या संजय राऊत यांच्याबद्दल आता त्यांच्या मालेमत्तेविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
संजय राऊत यांना ईडीची नोटीस आल्यानंतर ते कोटीच्या मालमत्तेचे मालक आहेत, आणि त्यांना ईडीकडून कोणत्या प्रकरणात नोटीस बजावण्यात आली आहे याचीही उत्सुकता लोकांना लागून राहिली आहे.
नुकतेच शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केली होती. त्यावेळी त्यांनी प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती जाहीर केली होती. त्यावेळी संजय राऊत यांनी दिलेल्या मालमत्तेनुसार ते 21.14 कोटींच्या मालमत्तेचे मालक आहेत. त्यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, संजय राऊत यांच्याकडे 1,55,872 रुपये रोख आणि 1,93,55,809 रुपयांच्या बँकेत ठेवी आहेत. त्याचवेळी त्यांची पत्नी वर्षा यांच्याकडे 39,59,500 रुपये किंमतीचे 729.30 ग्रॅम सोने आणि 1.30 लाख रुपये किमतीचे 1.82 किलो चांदी असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय संजय राऊत यांच्याकडे एक कार आणि दोन रिव्हॉल्व्हरही आहेत.
या मालमत्तेबरोबरच राऊत यांच्याकडे अलिबागमध्येही शेतजमीन असल्याची माहिती त्यामध्ये आहे. त्यांच्या पत्नीने पालघरमध्ये 2014 मध्ये 0.73 एकर जमीन खरेदी केली असून आज या भूखंडाची किंमत 9 लाख रुपये आहे. त्याचवेळी राऊत यांच्याकडे 2.20 कोटींचे नॉन अॅग्रीकल्चर प्लॉट आहेत. राऊत यांच्यानंतर दादर, भांडूप आणि आरे मिल्क कॉलनीमध्येही भूखंड असल्याचे सांगण्यात आले आहे.
त्याचवेळी, त्यांच्याकडे 6.67 कोटी आणि त्यांच्या पत्नीची 5.05 कोटींची व्यावसायिक मालमत्ता आहे. याशिवाय त्यांच्यावर 29 गुन्हेही दाखल असल्याची माहिती त्यामध्ये देण्यात आली आहेत.
ज्या प्रकरणात संजय राऊत यांना नोटीस देण्यात आली आहे त्याबद्दल बोलायचे झाले तर ते प्रवीण राऊत आणि पत्रा चाळ जमीन प्रकरण आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, यापूर्वी ईडीने संजय राऊत यांच्या पत्नीची 2 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली होती. याशिवाय प्रवीण राऊत यांची 9 कोटींची मालमत्ता त्यावेळी जप्त करण्यात आली होती. तर पत्रा चाळ जमीन घोटाळाप्रकरणाची चौकशी करणार्या ईडीला फेब्रुवारीमध्ये माहिती समजली होती की, प्रवीण राऊत यांनी त्यांच्या पत्नीच्या खात्यातून वर्षाला 55 लाख रुपये दिले होते. संजय राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी हॉटेलमध्ये राहण्याचीही व्यवस्था आणि तिकिटे बुक करण्यात आली असल्याचे ईडीकडून स्पष्ट करण्यात आले होते.
पत्रा चाळ जमीन घोटाळा 1,034 कोटी रुपयांचा आहे. पत्रा चाळ मुंबईतील गोरेगावमध्ये असून तो म्हाडाचा भूखंड आहे. या प्रकरणात प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन या कंपनीने या जमिनीचा काही भाग खासगी बिल्डरांना विकल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रवीण राऊत यांनी पत्रा चाळमध्ये राहणाऱ्या लोकांची फसवणूक केल्याचा आरोपही ठेवण्यात आला आहे.
संजय राऊत यांच्या भूखंडावर काम मिळालेल्या कंपनीला 3000 फ्लॅट बांधायचे होते, त्यापैकी 672 फ्लॅट येथील भाडेकरूना द्यायचे होते. परंतु नियमानुसार काम न झाल्याने भूखंडाचे अनेक भाग इतर खासगी बिल्डरांना देण्यात आले. ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेत प्रवीण राऊत यांच्याकडे अलिबागमध्ये आठ भूखंड आहेतच त्याचबरोबर वर्षा राऊत यांचेही तिथे फ्लॅट असल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी प्रवीण राऊत यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.