
Sanjay Raut on MNS Shinde Shivsena Alliance : कल्याण-डोंबिवली महापालिकेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत मनसेने युती केली आहे. त्यावरून एकच वादळ उठलं आहे. कालपासून याप्रकरणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या गोटातून प्रतिक्रिया उमटत आहे. तर आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी या प्रकरणी चांगलीच झाडाझडती घेतली. शाह-कटशहवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. अस्थिरता असेल तिथे भाजपसोबत जाण्याचा विचार होईल पण शिंदेसेनेसोबत जाणार नाही असा पवित्रा त्यांनी जाहीर केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
नीतीमत्ता वाहून जाऊ नये
सकाळच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी शह-कटशहाच्या राजकारणात नीतीमत्ता ओंडक्यासारखी वाहून जाऊ नये असे मोठे विधान केले आहे. त्यामुळे मनसेचा शिंदेसेनेसोबतच घरोबा उद्धव सेनेला मान्य नसल्याचे समोर येत आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत जो प्रकार झाला तो स्थानिक पातळीवर घेतल्या गेल्याचे समजते. तर केडीएमसीतील प्रकार हा महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाची भूमिका नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. राज ठाकरेंनाही हा प्रकार मान्य नाही असे संजय राऊत म्हणाले. याविषयी राज ठाकरे यांच्याशी अंतर्गत चर्चा करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक नेत्यांना जर अशी युती करायची होती, तरीही त्यांनी शिंदेसेनेसोबत अशी युती करायला नको होती असे राऊत म्हणाले. शिंदेंच्या बाबतीत आमची ही भूमिका कडवट आणि कठोर आहे. तिथे भाजप आणि शिंदे हे एकत्र येऊन महापालिकेत सत्तेत येऊ शकतात.इतरांना त्यामध्ये घुसायचं कारण नव्हतं. हे माझं मत असल्याचे राऊत म्हणाले. त्यांनी हा निर्णय का घेतला हे समोर आले आहे. त्यामुळे यावर आता अंतर्गत चर्चा करू असे राऊतांनी स्पष्ट केले. KDMC मध्ये शिंदेंसोबत मनसेचा घरोब्याबाबत राज ठाकरेंनी फेरविचार करावा? का यावर हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे असे म्हणत राऊतांनी भाष्य करणं टाळलं.
तर भाजपसोबत निर्णय
तर उद्धव सेनेच्या नगरसेवकांनी सुद्धा केडीएमसीमध्ये शिंदेसेनेसोबत जाण्याचा प्रस्ताव दिला. मातोश्रीवर त्यांनी भेट घेतली याविषयी राऊतांना प्रश्न करण्यात आला. तेव्हा अशा प्रस्तावांना आम्ही केराची टोपली दाखवतो असे वक्तव्य त्यांनी केले. जिथे अत्यंत अस्थिरता आहे, तिथे आम्ही भाजपसोबत निर्णय घेऊ पण शिंदे सेनेसोबत कधी ही जाणार नाही असे मोठे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले. त्या त्याठिकाणी इतर काही पर्याय असतील तर त्यासंदर्भात पक्षप्रमुख निर्णय घेतली असे राऊत म्हणाले. पण परस्पर कुणी निर्णय घेणार नाही असा दावाही त्यांनी केला. आज महापालिका महापौर पदासाठी आरक्षण सोडत निघत आहे. त्या पार्श्वभूमीवर राऊतांच्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.