Sanjay Raut: कसले संकटमोचक? 100-150 कोटी…संजय राऊतांचा गिरीश महाजानांना खोचक टोला… महायुतीवर सर्वात मोठा आरोप काय?
Sanjay Raut on Vidhan Parishad Election: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार सुरू असल्याचा आरोप करत खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर निशाणा साधला. त्यांनी विधान परिषद आणि राज्यसभा नसलेली बरी असा संताप व्यक्त केला. महाजनांना त्यांनी खोचक टोला लगावला. काय म्हणाले संजय राऊत?

Sanjay Raut on Vidhan Parishad Election: आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. अनेक ठिकाणी बंडाळी उफाळून आली आहे. काही ठिकाणी बंडखोरांना शांत करण्यात महायुतीला यश आले आहे. या सर्व प्रकारावर उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी विधान परिषद आणि राज्यसभा हे सभागृहच नकोत असा पवित्रा घेतला आहे. त्यांनी या निवडणुकीत घोडेबाजार सुरू असल्याचा आरोप करत महायुतीवर निशाणा साधला आहे. तर भाजप नेते गिरीश महाजन यांना ही खोचक टोला लगावला.
ते कसले संकटमोचक?
ही कार्यकर्त्यांची निवडणूक राहिली नाही. तर अजिबात नाही. कसले आले संकटमोचक. एखाद्या माणसाला निवडून आणायचं आहे, 100-150 कोटी खर्च करत आहे. जो मतदारांना 10-20 लाख रुपये देणार आहे. मतदार हा दोघांकडूनही पैसे घेईल. पुढच्या पाच वर्षांची बेगमी करेल. याच्या पलिकडे या निवडणुकांना आता अर्थ राहिला नाही. एकेकाळी आचार्च अत्रे, ग. दी. माडगुळकर, ना. धो महानोर असे अनेक मोठे ताकदीचे, अभ्यासू माणसं सभागृहात जात होते. आता त्या सभागृहाचं डंपिंग ग्राऊंड झाले आहे. ज्या प्रकारे हे प्रकार सुरू आहेत, ते निकोप लोकशाहीचे लक्षण नाही, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला.
नाशिकमधील निवडणुकीवर भाष्य
नाशिकमध्ये आमचा उमेदवार नाही. त्यामुळे महायुतीमध्येच लढाई होणार आहे. ज्याचा भाव जास्त, त्याच्या शेअरचा भाव जास्त, तो निवडून येईल. मग संकटमोचक त्यात काही करू शकत नाही. नाशिकमध्ये आमचे जवळपास 60 मतदार असल्याचे कळलं. मी या संपूर्ण प्रक्रियेत नाही. नाशिकमध्ये कुणाला उमेदवारी द्यावी आणि कुणाला उभं करावं याविषयी शिवसेनेत कोणताही निर्णय झालेला नव्हता. ज्याची इच्छा असेल त्यानं लढावं ही भूमिका होती. स्वइच्छेने कुणी उमेदवारी अर्ज घेतला असेल तर हा त्यांचा प्रश्न होता, असे राऊत म्हणाले.
विधान परिषद, राज्यसभा नसलेली बरी
भाजपने दबावाचं राजकारण केलं. आपण जेव्हा एका विचारधारेतून दुसऱ्या विचारधारेत प्रवेश करतो, तेव्हा असे करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. त्यांना आपल्या प्रवाहात घेणाऱ्यांना सुद्धा लाज वाटली पाहिजे. प्राजक्त तनपुरे यांचे सर्व आयुष्य हे काँग्रेसच्या विचारधारेत गेले. असे अनेक लोक आहेत. उद्योगपती, त्यांची मुलं, ठेकेदारांची मुलं यांना तुम्ही विधान परिषदेवर पाठवता, असं काय केलं त्यांनी? असं कोणतं सामाजिक काम केले त्यांनी, असा रोकडा सवाल खासदार संजय राऊत यांनी विचारला. आमच्यासारखे अनेक लाखो लोकं विचारधारेशी जोडलेले आहेत. पण ज्यांच्याकडे पैसा आहे, संपत्ती आहे, असा लोकांना तुम्ही विधान परिषदेत आणत आहात. त्यामुळे विधान परिषद आणि राज्यसभा नसलेली बरी असं मला वाटतं. भाजपच्या काळात या संस्थांचं अध:पतन झाले आहे, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला.