भाजपसोबतच्या युतीवर संजय राऊत यांचं सर्वात मोठं विधान; दोन वाक्यातच असं काही सांगितलं की…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना माफ केलं असल्याचं म्हटलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्ही त्यांच्याकडे माफ करा अशी मागणी केली नाही.

भाजपसोबतच्या युतीवर संजय राऊत यांचं सर्वात मोठं विधान; दोन वाक्यातच असं काही सांगितलं की...
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 09, 2023 | 11:52 AM

नंदकिशोर गावडे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करून भाजपशी हातमिळवणी केली. शिवसेनेतील ही आजवरची सर्वात मोठी फूट मानली जात आहे. या फुटीनंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटालाच शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिलं. त्यामुळे ठाकरे गटाच्या संतापाचा पारा चढला आहे. भाजप नेत्यांकडूनही शिंदे गटाच्या बंडाला त्यांचीच फूस असल्याचं वारंवार सांगण्यात आलं आहे. त्यामुळे भाजप आणि ठाकरे गटामध्ये छत्तीसचा आकडा निर्माण झाला आहे. त्यामुळे भविष्यात ठाकरे गट आणि भाजप एकत्र येण्याची सुतराम शक्यता नाहीये. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही आज ठाकरे गट आणि भाजपची भविष्यात युती होणार नसल्याचं जाहीरपणे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि भाजपच्या भविष्यातील युतीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना युतीची शक्यता फेटाळून लावली आहे. भाजपसोबतचा मैत्रीचा हात आला तर स्वीकारणार नाही. अजिबात नाही. परखड सांगतो. राजकारणात टोकाचे मतभेद होत असतात. यापूर्वीही झालेत. पण तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेला पक्ष तोडता फोडता तसेच चोर आणि लफंग्याच्या हातावर ठेवता? कोण तुम्हाला माफ करेल? असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

तुम्हाला माफ करणार नाही

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना माफ केलं असल्याचं म्हटलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्ही त्यांच्याकडे माफ करा अशी मागणी केली नाही. आम्ही ठरवायचं आहे, त्यांना माफ करायचं की नाही. आम्ही ठरवणार. महाराष्ट्राचा प्रमुख पक्ष, मराठी हितासाठी, हिंदुत्ववादासाठी काम करणारी शिवसेना फोडली. केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करून आमचा पक्ष तोडला.

हा महाराष्ट्रावरील आघात आहे. त्यांनी ज्याप्रकारचा गुन्हा केला ते पाहता राज्यातील जनता वेदना विसरणार नाही. भाजपला माफ करणार नाही. तुम्ही काय माफीचं वाटप करत आहात का? तुम्ही महाराष्ट्राच्या काळजात घुसवलेला हा बाण आहे. लोकं तुम्हाला सहजासहजी माफ करणार नाहीत. शिवसेना तर नाहीच नाही, असं हल्लाबोल राऊत यांनी केला.

माझ्या पक्षाबाबतच बोलेल

दरम्यान, यावेळी संजय राऊत यांना अजितदादांच्या एका प्रश्नाबाबत छेडण्यात आलं. तेव्हा राऊत संतापले. त्यांनी अजितदादांच्या विधानावर भाष्य करण्यास नकार दिला. अजितदादा काय म्हणतात त्याबद्दल मी काही बोलणार नाही. माझ्या पक्षाबाबतच मी बोलेल, असं राऊत म्हणाले.

राऊत यांचं विधानसभा अध्यक्षांना पत्र

दरम्यान, संजय राऊत यांनी कालच विधानसभा अध्यक्षांना पत्र पाठवलं आहे. राऊत यांना हक्कभंगाची नोटीस मिळाली होती. त्याबाबत त्यांनी पत्रातून आपलं मत व्यक्त केलं आहे. मी चार दिवस मुंबईच्या बाहेर होतो. त्यामुळे मला नोटीस मिळाली नाही. आता नोटीस मिळाली आहे. मी विधिमंडळाचा अवमान केलेला नाही. मी फक्त एका गटापुरतं माझं विधान केलं होतं, असं राऊत यांनी या पत्रात म्हटलं आहे.