दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार? शरद पवारांच्या मनात काय? संजय राऊत थेट बोलले…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पूर्णविराम दिला आहे. शरद पवार भाजप-एनडीए सोबत जाणार नाहीत आणि आपली विचारधारा सोडणार नाहीत, असे राऊत यांनी ठामपणे सांगितले. अजित पवार गटातील काही जण या चर्चांना हवा देत आहेत, कारण ते तिथे खूश नाहीत. अमित शाहच राष्ट्रवादी आणि शिंदे गटाचे भवितव्य ठरवतात, असेही राऊत म्हणाले.

दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार? शरद पवारांच्या मनात काय? संजय राऊत थेट बोलले...
Sharad Pawar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 09, 2026 | 11:20 AM

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या गेल्या तीन दिवसांपासून चर्चा सुरू झाल्या आहेत. अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीच या चर्चेला हवा दिल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यातच पार्थ पवार यांनी 48 तासात दोनदा शरद पवार यांची भेट घेतल्याने सस्पेन्स अधिकच वाढला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार नाही. पवार एनडीए सोबत जाणार नाहीत. आपली इतक्या वर्षाची तपश्चर्या मातीत घालवणार नाही, असं थेट विधानच संजय राऊत यांनी केलं आहे. राऊत यांनी एकप्रकारे पवारांच्या मनातील भावनाच बोलून दाखवल्याची चर्चा रंगली आहे.

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी थेटच प्रतिक्रिया दिली. विलिनीकरणाची चर्चा कोण करतंय? शरद पवार बोलले का? सुप्रिया सुळे बोलल्या का? शशिकांत शिंदे बोलले का? जयंतराव पाटील बोलले का? यावेळी पहिल्यांदाच तिकडच्या बाजूचे लोक फार जोरजोरात बोलत आहेत. कारण ते तिकडे खूश नाहीत. बरेचसे लोकं तिकडे खूश नाही. ज्यांच्या डोक्यावर लालदिवे आहेत ते काही काळ खूश असतील. भाजपसोबत राहणं म्हणजे स्वाभिमान गहाण ठेवणं. लाचारी पत्करणं आहे. याबाबत तुम्ही हे मिंधे गटाला विचारू शकता. भाजप मित्र पक्षाला घरगड्या सारखा वापरतो आणि वागवतो. आम्ही योग्यवेळी स्वाभिमानासाठी बाहेर पडलो, असं संजय राऊत म्हणाले.

Loading...

अमित शाह दिशा ठरवतात

शरद पवार हे धर्मांध शक्तीसोबत जाणार नाहीत. देश विकणाऱ्या शक्तींसोबत जाणार नाहीत. त्यांची स्वत:ची विचारधारा आहे. ती भाजपची नाही. यशवंतराव चव्हाणानंतर पवारांनी शाहू, फुले, आंबेडकर विचारधारा पुढे नेली. अशावेळी कोणी म्हणत असतील पवार भाजपसोबत जातील तर ते मूर्ख आहेत. ते सुपारी घेऊन बोलत आहेत. जे लोकं पवारांना सोडून गेले. ते का गेले? अजितदादांचा गट नेतृत्वहीन झाला आहे. या पक्षाचे भवितव्य अमित शाह दिल्लीत बसून ठरवत आहेत. कोणती दिशा द्यायची हे अमित शाह ठरवत आहेत. राष्ट्रवादी आणि शिंदे गट यांचं भवितव्य हे अमित शाह ठरवत आहेत. काय होतंय ते मनोरंजन म्हणून पाहिलं पाहिजे. गांभीर्याने घ्यायची गरज नाही, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.

पवारांवर विश्वास

तटकरे काय म्हणतात त्याला त्यांच्या पक्षातही महत्त्व राहिलं नाही. म्हणून ते विलिनीकरणावर बोलत आहेत. कोण काय म्हणतंय हे महत्त्वाचं नाही. पवार काय म्हणतात ते पाहिलं पाहिजे. मी इतर कोणापेक्षा पवारांवर विश्वास ठेवतो, असं त्यांनी सांगितलं.

भाजपला काही काम नाही

सध्याच्या भाजपसोबत आमचा कोणताही वैचारिक संबंध नाही. ज्या मोदी आणि शाहांनी बाळासाहेबांचा पक्ष फोडून बिनबुडाच्या लोकांच्या हाती दिला, आम्ही स्वाभिमान गहाण ठेवून त्यांच्या दारात पदासाठी का जाऊ? शिवसेनेच्या बाबत असं काही होणार नाही. पवारही त्यांच्या जीवनाच्या या काळात इतक्या वर्षाची तपस्या मातीमोल करणार नाहीत, असं सांगतानाच भाजपला काही काम नसेल, काही अडचणी आल्या तर भाजप अशा प्रकारच्या अफवा सोडत असतो, अशी टीका त्यांनी केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us