पूर्णेकर प्रकरणात मिनाक्षी शिंदे, राजेंद्र शिंदेंना दिवाळीनंतर अटक? संजय राऊत यांच्या विधानाने खळबळ
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पूर्णेकर प्रकरणावरून खळबळजनक विधान केले आहे. दिवाळीनंतर मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांना ताब्यात घेतलं जाणार असल्याचा दावा त्यांनी केला. शिंदेंच्या दिवाळी कार्यक्रमाला एकनाथ शिंदे गटातील नेत्यांची गैरहजेरी, यामुळे मीनाक्षी शिंदे पक्षात एकट्या पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. राऊतांच्या या इशाऱ्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी दिवाळी पहाटेचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाचा एकही नेता फिरकला नाही. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. शिंदेसेनेत मिनाक्षी शिंदे एकट्या पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिवाळीनंतर पोलिसांना काही कृती करावी लागणार आहे. मिनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांना दिवाळीनंतर ताब्यात घ्यावेच लागणार आहे, असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. राऊत यांच्या या विधानाने खळबळ उडाली आहे.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं आहे. दिवाळी संपल्यानंतर पोलिसांना काही कृती करावी लागेल. त्याची ही तयारी आहे. दिवाळीनंतर माझ्या माहितीनुसार पोलिसांना पूर्णेकर प्रकरणातील खऱ्या सुपारीबाजांना अटक करावी लागेल. राजेंद्र शिंदे आणि मिनाक्षी शिंदेंना ताब्यात घ्यावेच लागेल, असं सांगतानाच या प्रकरणात त्यांचा उघड हात आहे. पुरावे दिले आहेत. पोलिसांनी पुरावे स्वीकारले नाही, कारवाई केली नाही, तर आम्ही हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात जाऊन पोलीस आयुक्तांवर कारवाई करण्यास भाग पाडू, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
मिनाक्षी शिंदे एकट्या पडल्या?
माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी ठाण्यात दिवाळी पहाटेचं आयोजन केलं होतं. यावेळी त्यांनी शिंदे गटातील नेत्यांना आमंत्रण दिलं होतं. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे नेते या कार्यक्रमाला फिरकलेच नाहीत. त्यामुळे मिनाक्षी शिंदे या पक्षात एकट्या पडल्याचं चित्र निर्माण झालं आहे. शिंदे गटाच्या नेत्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवण्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. तसेच दिवाळीनंतर मिनाक्षी शिंदे यांना अटक होणार असल्याची चर्चाही रंगली आहे.
वर्षावर मोर्चा काढा
दरम्यान, आज कोल्हापुरात गोकुळवर मोर्चा काढण्यात आला आहे. सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वात हा मोर्चा काढण्यात आला आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गोकुळचा मोर्चा मंत्रालयावर निघाला पाहिजे, वर्षावर निघाला पाहिजे, राजभवनावर निघाला पाहिजे. लोकांनी दिलेला कौल नाकारला जातो आणि पराभूतांच्या हातात सत्ता दिली जाते. हे लोकशाहीला मारक आहे. कोल्हापूरचा मोर्चा महत्त्वाचा आहेच. पण अशा प्रकारचा मोर्चा वर्षावर, राजभवनावर आणि मंत्रालयावरच नेला पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.
आम्हाला कसले नियम सांगता?
आम्हाला कसले नियम सांगता? महाडिक गटाने 13 जागा जिंकल्या असत्या तर काय तुम्ही हा निर्णय घेतला असता का? देवाभाऊंनी तात्त्विक सल्ले दिले असते. प्रवचनं दिली असती. पण सतेज पाटलांचं पॅनल जिंकल्यावर तुम्ही चार लोक भरता? ही लोकशाही आहे का? हे लोकशाहीचं वस्त्रहरण होत आहे. त्यामुळे मोर्चा वर्षावर आणि राजभवनावर निघाला पाहिजे. राज्यातील शेतकऱ्यांनी मुंबईत आलं पाहिजे. रामलिला मैदानावर देश उतरला, तसं गोकुळसाठी उतरलं पाहिजे. हा गोकुळचा विषय नाही. हा लोकशाची वाचवण्याचा प्रश्न आहे, असं त्यांनी सांगितलं.
