Gokul Sangharsh Morcha : आमची म्हैस गोकुळवर संचालक म्हणून घ्या; कोल्हापुरात संघर्षाची ठिणगी पेटली, ‘आघाडी’चा मोर्चा कुठून निघणार?
कोल्हापुरात गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी नेमलेल्या 4 शासन नियुक्त संचालकावरून वाद पेटला आहे. सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीने कोल्हापुरात मोर्चा काढला आहे.

कोल्हापुरात गोकुळ दूध संघावरील शासन नियुक्त निवडीविरोधात वातावरण तापलं आहे. गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी सतेज पाटलांच्या समविचारी आघाडी कोरम पूर्ण न करता आल्याने शासनाने चार संचालकांची नियुक्ती केली. परंतु शासनाचा हा निर्णय सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीला खटकला. त्यानंतर सरकारच्या निर्णयाविरोधात आंदोलकाची हाक देण्यात आली. त्यामुळे सतेज पाटील यांच्या नेतृत्वात आज सोमवारी कोल्हापुरात समविचारी आघाडीचा संघर्ष मोर्चा निघणार आहे. या मोर्चात म्हशी देखील पाहायला मिळणार आहे. तर आंदोलक पायतान हातात घेत मोर्चा काढणार आहेत.
आमची म्हैस संचालक पदावर घ्या, आंदोलकाची मागणी
कोल्हापुरात गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त संचालक निवडीविरोधात सतेज पाटील यांच्या नेतृत्वात दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात आता दूध देणाऱ्या म्हशीदेखील सहभागी झाल्याचे पाहायला मिळतेय. म्हशीच्या गळ्यात ‘मला पण गोकुळवर संचालक म्हणून घ्या की असा बॅनर लावण्यात आलाय. तर आणखी एका म्हशीच्या अंगावर ‘गोकूळ वाचवा’ असा संदेश लिहिलाय. बुकवर नेमण्यात आलेल्या चार संचालकांपैकी किती लोकांकडे गायी- म्हशी आहेत, असा सवाल म्हैस मालकाने केलाय. त्यामुळे आमची म्हैस पण म्हणते मला पण संचालक म्हणून गोकुळवर घ्या,असा सवाल एका आंदोलकाने केला.
आंदोलाकांची महायुतीच्या नेत्यांच्या विरोधात आगपाखड
दरम्यान, खासदार धनंजय महाडिक यांनी मोर्चाला गर्दी होईल का, याबाबत शंका उपस्थित केली होती. त्यानंतर राजू शेट्टी यांनी मोर्चा गर्दी होणार असल्याचे म्हणत त्यांचा दावा खोडून काढला. आता या आंदोलनाला मोठ्या संख्येने आंदोलक पोहोचल्याचे दिसत आहे. पोस्टर, पायतान अशा विविध माध्यमातून महायुतीच्या नेत्याच्या विरोधात मोर्चा काढला जात आहे. गोकुळ वाचवा, लोकशाही टिकवा, अशा आशयाचे बॅनर देखील पाहायला मिळत आहे. या मोर्चाच महिलांचा सहभाग पाहायला मिळत आहे. या मोर्चातून आंदोलक भाजप नेत्यांवर निशाणा साधताना दिसत आहे. समविचारी आघाडीचे नेते देखील आंदोलनस्थळी पोहोचले आहेत.
