‘हॉस्पिटल गलत जगह पे है…’ रुग्णालयाबाहेर फटाके फोडणाऱ्यांचं उत्तर ऐकून बॉलिवूड दिग्दर्शकाचा संताप
प्रसिद्ध दिग्दर्शक कुणाल कोहली यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट लिहित तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रुग्णालयासमोरच फटाके फोडणाऱ्यांना विनंती केली असता त्यांना मिळालेलं उत्तर संतापजनक असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

दिवाळी म्हटलं की रोषणाई, आनंद आणि फटाक्यांची आतषबाजी आलीच. मात्र, सण साजरा करताना इतरांना होणाऱ्या त्रासाकडेही लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे. विशेषतः रुग्णालयांच्या परिसरात मोठ्या आवाजाचे फटाके फोडल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा त्रास होऊ शकतो. असाच एक अनुभव बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक कुणाल कोहली यांना दिवाळीच्या रात्री आला. आईला आपत्कालीन उपचारांसाठी मुंबईतील खार इथल्या हिंदुजा रुग्णालयात घेऊन जात असताना रुग्णालयाच्या गेटबाहेर मोठ्या आवाजाचे फटाके फोडले जात होते. याबाबत त्यांनी संबंधितांना विनंती केली असता मिळालेल्या उत्तराने ते संतापले. आता या घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
कुणाल कोहली यांनी रविवारी रात्री सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत आपला अनुभव सांगितला. दिवाळीच्या रात्री आईला इमर्जन्सीसाठी खार इथल्या हिंदुजा रुग्णालयात घेऊन गेलो होतो. मात्र, रुग्णालयाच्या गेटबाहेर काही स्थानिक नागरिक मोठ्या आवाजाचे फटाके फोडत होते, असं त्यांनी सांगितलं. रुग्णालयात उपचारांसाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना या मोठ्या आवाजाचा त्रास होऊ शकतो, हे लक्षात घेऊन त्यांनी संबंधितांना विनंती केली. मोठे आवाज करणारे बॉम्ब फोडू नका, इतर फटाके फोडण्यास हरकत नाही, असं त्यांनी नम्रपणे सांगितलं.
कुणाल कोहली यांची पोस्ट-
Took my mom for an Emergency to Khar Hinduja hospital tonight, Diwali night. Sadly some residents were burning loud bombs just outside the hospital gate. I politely requested them to burn all crackers except loud bombs outside the hospital gates. A man told me ‘hospital galat jagah pe hai-hum yahan 40 saal se hain’ and he continued to burst loud bombs. @mybmc
— kunal kohli (@kunalkohli) November 8, 2026
मात्र, कुणाल कोहली यांच्या विनंतीला एका व्यक्तीने दिलेल्या उत्तराने त्यांना धक्काच बसला. ‘हॉस्पिटल गलत जगह पे है, हम यहां 40 साल से हैं’ म्हणजेच रुग्णालय चुकीच्या ठिकाणी आहे, आम्ही इथे 40 वर्षांपासून राहत आहोत, असं त्या व्यक्तीने म्हटल्याचा दावा कुणाल यांनी केला. एवढंच नाही तर त्यानंतरही मोठ्या आवाजाचे फटाके फोडणं सुरूच राहिल्याचं त्यांनी पोस्टमध्ये नमूद केलं. या पोस्टमध्ये त्यांनी मुंबई महापालिकेलाही टॅग केलं आहे.
कुणाल कोहली यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. सण साजरा करण्याचा आनंद इतरांच्या आरोग्याच्या आणि सुरक्षिततेच्या किंमतीवर नसावा, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. या घटनेमुळे दिवाळीतील फटाक्यांचा आवाज आणि रुग्णालयांबाहेरील ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
दरम्यान, रुग्णालये आणि नर्सिंग होम परिसर हा शांतता क्षेत्रात मोडतो. अशा ठिकाणी ध्वनिप्रदूषण करणाऱ्या कृतींवर निर्बंध आहेत. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे रुग्णांच्या उपचारांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि गंभीर आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना अशा आवाजाचा त्रास होण्याची शक्यता असते.
