पेपरफुटी प्रकरणात संजय राऊत यांचा नवा गौप्यस्फोट; भाजपवर काय केले आरोप?
संजय राऊत यांनी पेपरफुटी प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या टास्क फोर्सवर हल्ला चढवला आहे. गेल्या 10 वर्षांपासून राज्यात फडणवीस यांचे राज्य असतानाही पेपरफुटी थांबली नाही, असा आरोप त्यांनी केला. राऊत यांनी भाजपशी संबंधित व्यक्तीच पेपरफुटीत अडकल्याचा दावा करत, राज्य सरकारला टास्क फोर्सची गरज का पडली, असा सवाल केला.

राज्यातील पेपरफुटी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी टास्क फोर्स नेमण्यात आला आहे. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हल्ला चढवला आहे. गेल्या 10 वर्षापासून राज्यात फडणवीस यांचं राज्य आहे. मग तुम्हाला टास्क फोर्स नेमण्याची गरज का पडली? राज्यात पोलीस नाहीये का? एका यंत्रणेवर दुसरी यंत्रणा का लादली जात आहे? असा सवाल करतानाच पेपरफुटी प्रकरणात भाजपशी संबंधित लोकच अधिक असल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा आरोप केला आहे.
राज्य सरकारला टास्क फोर्स नेमण्याची गरज का आली? गेल्या 10 वर्षापासून फडणवीस यांचं एक छत्री राज्य आहे. तरीही राज्यात मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारे पेपर फुटीचे प्रकरणं होत आहे. नीट असो किंवा एमपीएससी असो या सर्व पेपर फुटीच्या रॅकेटमध्ये भाजपचे कार्यकर्ते अडकलेले आहेत. यूपीएससी प्रकरणात पुणे आणि लातूरातून जे आरोपी पकडले ते भाजपशी संबंधित आहेत. आता टास्क फोर्स नेमली आहे. काय करणार आहे ही टास्क फोर्स? ही टास्क फोर्स जिल्ह्या जिल्ह्यात फिरणार. जिल्ह्या जिल्ह्यात पोलीस नाही? जिल्ह्या जिल्ह्यात सरकारी यंत्रणा नाही? एका यंत्रणेवर दुसरी यंत्रणा नेमत आहात. यापूर्वी कोणत्याही टास्क फोर्स शिवाय लोकसेवा आयोगाची पेपर सेटिंग आणि भरती प्रक्रिया चालायची. तेव्हा काही घडलं नाही, असं संजय राऊत म्हणाले.
ही वेळ भाजपने आणली
अयोध्येतील दानपेटी ऑनलाईन दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यावरूनही राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला. अयोध्येत प्रभू रामाच्या मंदिरात दानपेटीत ऑनलाईन का दाखवली जाणार आहे? ही वेळ भाजपने आणली. त्यांच्या राज्यात लूट झाली. आता एअर मार्शलला आणून सीईओ बनवावं लागलं. पूर्वी पुजारी मंदिराची व्यवस्था पाहायचा. आता ए्अरमार्शलला बसवलं आहे. राम मंदिराला यांनी सोडलं नाही. ते मुलांना काय सोडणार? असा हल्ला राऊत यांनी चढवला.
आता ममता बॅनर्जींचं सरकार नाही ना?
पश्चिम बंगालमध्ये डीजे बंदी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात मात्र तसा निर्णय घेण्यात आलेला नाही. याकडेही राऊत यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. दोन्ही राज्यात भाजपचं सरकार आहे. ममता बॅनर्जींचं सरकार नाहीये ना? ममता बॅनर्जी यांनी हा निर्णय घेतला असता तर भाजपने त्याला कडाडून विरोध केला असता. हिंदूंच्या सणांना विरोध केला म्हणून आकांडतांडव केलं असतं, असा टोला त्यांनी लगावला.