मोदींचा शरद पवारांना फोन, संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, पंतप्रधानांनी कितीही…

पंतप्रधान मोदींनी शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला. यावर संजय राऊतांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. मोदी आजारपणातही राजकारण करत असून, संभ्रम निर्माण करत असल्याची टीका राऊत यांनी केली. केवळ सोयीच्या नेत्यांची चौकशी करून मोदी राजकीय फासे टाकत आहेत, मात्र पवार त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत, असे राऊत म्हणाले.

मोदींचा शरद पवारांना फोन, संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, पंतप्रधानांनी कितीही...
narendra modi
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 05, 2026 | 10:57 AM

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने ते पुण्याच्या रुबी रुग्णालयात उपचार घेत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना फोन करून प्रकृतीची विचारपूस केली. तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू. काळजी करू नका. आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही ठणठणीत बरे व्हा, असं मोदींनी शरद पवारांना म्हटलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. पवार एनडीएसोबत जाणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोदी आजारपणातही राजकारण करतात. संभ्रम निर्माण करण्याचं काम करतात, अशी टीका संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना केली आहे.

नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत. पण ते एक खोटारडे गृहस्थ आहेत. त्यांनी शरद पवारांना फोन केला. लालू यादवही आजारी आहेत. लालू यादव मोठे नेते आहेत. शरद पवारही मोठे नेते आहेत. लालू यादवांना का फोन करत नाही? असं असेल तर पंतप्रधानांनी देशातील सर्व प्रमुख नेत्यांची चौकशी केली पाहिजे. पण मोदीही सोयीच्या आजारपणाची चौकशी करतात. त्यात सुप्रिया सुळेंचा उल्लेख करून संभ्रम निर्माण करतात. आजारपणाच्या चौकशीतही राजकारण करतात, त्यांच्या विषयी काय बोलायचं? मोदींनी कितीही फासे टाकले तरी शरद पवार आणि त्यांचा पक्ष मोदींच्या भूलथापांना बळी पडणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.

Loading...

मोदी एप्रिलमध्ये जाणार

जगभरात सत्तांतराचे वारे वाहत आहे. त्यापार्श्वभूमीवर राऊत यांनी मोदी हे एप्रिलमध्ये पायउतार होणार असल्याचं म्हटलं आहे. मोदी एप्रिल-मेमध्ये जातील. मी सहा महिने आधीपासून हे म्हणतोय. देवेंद्र फडणवीस सुद्धा जाणार आहेत. मोदी आणि शाह यांच्या विरोधात त्यांचेच लोक उभे राहणार आहेत, असा दावा राऊत यांनी केला आहे.

मोदी आणि ट्रम्प यांच्यात साम्य

अमेरिकेच्या निवडणुकीवरही त्यांनी भाष्य केलं. ट्रम्प आणि मोदींमध्ये साम्य आहे. ट्रम्प, मोदी आणि नेतन्याहू हे त्रिकूट आहे. अमेरिका युद्धात का उतरला याचं उत्तर जनता शोधत आहे. जनतेने द्वेषाचे राजकारण नाकारलं आहे. सर्वधर्मियांचा विजय झाला आहे. टोकाची धर्मांधता कुठेच चालत नाही, अशी टीका त्यांनी केली.

यांना चरबी आलीय

गोकूळवर चार संचालक नेमण्यात आले आहे. त्यावरूनही त्यांनी टीका केली. सरकारला आलेली ही मस्ती आहे. बहुमत डावलून जे पराभूत झालेत त्यांच्या हातात गोकुळ देवून ते गुजरात लॅाबीला विकायचे आहे. यांना लोकशाहीची चाड नाही. लोकभावना दडपून स्वतःची सत्ता यावी म्हणून चार संचालक नेमणे याला चरबी म्हणतात. यांची चरबी वाढलीय. लोकशाही मार्गाने आलेले पॅनेल चालत नाही का? बहुमताचा अनादर करून पराभूत झालेल्यांना सत्तेवर आणलंय. लोक रस्त्यावर येतील. साडेपाच लाख शेतकऱ्यांचा कौल मानत नसतील तर काय? पराभव स्विकारावा लागेल, असं सांगतानाच गोकुळ वाचविण्यासाठी मविआने एकत्र यायला पाहिजे. फडणवीस यांना किंमत मोजावी लागेल. अमित शहांची झुंडशाही मोडून काढली पाहिजे, असंही ते म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us