ज्ञानेश कुमार यांना भारतरत्न पुरस्कार द्या; संजय राऊत यांनी डिवचले

पश्चिम बंगाल निवडणुकांवरून संजय राऊत यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपने ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण मागितल्यावर राऊतांनी खोचकपणे 'लोकशाहीची हत्या' केल्याबद्दल भारतरत्न देण्याची मागणी केली.

ज्ञानेश कुमार यांना भारतरत्न पुरस्कार द्या; संजय राऊत यांनी डिवचले
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 26, 2026 | 11:42 AM

पश्चिम बंगालमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्म भूषण पुरस्कार देण्याची मागणी केली आहे. ज्ञानेश कुमार यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुका निर्भय आणि शांततेच्या वातावरणात पार पाडल्या आहेत. ज्ञानेश कुमार यांच्यामुळेच हे शक्य झालं. त्यामुळे त्यांना पद्म पुरस्कार देऊन गौरवलं पाहिजे. ही भाजपची मागणी आहे, असं समिक भट्टाचार्य यांनी म्हटलं आहे. त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपला शालजोडीतले लगावले आहेत. पद्म भूषण कशाला? ज्ञानेश कुमार यांना भारतरत्न पुरस्कार द्या. मोदींना सांगून त्यांची नोबेल पुरस्कारासाठी शिफारस करा, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी हा टोला लगावला आहे.

ज्ञानेश कुमार यांना भारतरत्न दिला पाहिजे. देश खड्ड्यात घातल्याबद्दल, देशाची लोकशाही खड्ड्यात घातल्याबद्दल आणि देशाच्या लोकशाहीची हत्या केल्याबद्दल, कोट्यवधी मतदारांना संविधानाने दिलेला अधिकार हुकूमशाही पद्धतीने काढल्याबद्दल, मनमानी केल्याबद्दल ज्ञानेश कुमार यांना भारतरत्न दिला पाहिजे. भाजप जर लोकशाहीचा दुश्मन नंबर एक ज्ञानेश कुमारला पद्म भूषण द्या म्हणत असेल तर ज्याने ही मागणी केली, त्याचा मेंदू दिल्लीच्या नॅशनल म्यूझियममध्ये ठेवला पाहिजे. या देशात अशीही मागणी होऊ शकते, हे जगाला कळलं पाहिजे. ज्ञानेश कुमारला पद्म भूषण कशाला देता? भारतरत्नच द्या ना. अनेकांना दिला आहे, तसा त्यांनाही द्या. त्यांची नोबलसाठी शिफारस करा. मोदींना सांगा, असे फटकारेच संजय राऊत यांनी लगावले.

अमित शाह, ज्ञानेश कुमारचा राजीनामा घ्या

चिराग पासवान, उपेंद्र कुशावाह आणि चंद्राबाबू नायडू हे एनडीएचे घटक आहेत. त्यांनी पंतप्रधानांचा राजीनामा घ्यावा. नाही तर मोठं जनआंदोलन देशात होईल. सरकार दिल्लीतून बाहेर जाईल, असा इशारा देतानाच ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा ही सर्वात मोठी मागणी आहे. ज्ञानेश कुमार हा भाजपचा एजंट आहे. लोकशाहीचा हत्यारा आहे. हा व्यक्ती मुख्य निवडणूक आयुक्त बनून जे कांड करत आहे, त्याविरोधात जनतेच्या मनात रोष आहे. देशाच्या पंतप्रधानांनी दोन लोकांचा राजीनामा घ्यावा. अमित शाह आणि ज्ञानेश कुमार यांचा. अमित शाह यांच्या आदेशानेच ज्ञानेश कुमार काम करत आहे, असा घणाघाती हल्ला त्यांनी चढवला.

आघाडीची बैठक व्हावी

दरम्यान, ज्ञानेश कुमार यांच्या मनमानी विरोधात इंडिया आघाडीची बैठक घेण्याची मागणी ममता बॅनर्जी यांनी केली आहे. राऊत यांनी त्याला सहमती दर्शवली आहे. या मुद्द्यावर इंडिया आघाडीची बैठक व्हायला हवी. उद्धव ठाकरे यांचीही तशी इच्छा आहे. राहुल गांधींपर्यंत मेसेज गेला आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us