10 महिन्यात लोकलमध्ये झाले 7 मर्डर, प्रवाशांना अचानक काय झाले ? प्रवासी का उठले एकमेकांच्या जीवावर?
दरवर्षी अडीच हजार लोक गर्दीमुळे लोकलमधून पडतात आणि त्यातील पाचशे लोकांचा दुर्दैवी मृत्यू होत असतो. यासाठी पंधरा डब्याच्या लोकल अठरा डब्यांच्या करणे गरजेचे असल्याचे समीर झव्हेरी यांनी म्हटले आहे.

मुंबईची जीवनवाहिनी लोकल आता मुंबईकरांच्या जीवावर उठली आहे की काय असा प्रश्न सध्याच्या घटनांमुळे पडत आहे. गेल्या काही दिवसात उपनगरीय लोकलमध्ये एका प्रवाशाकडून दुसऱ्या प्रवाशा धारदार शस्राने ठार केल्याच्या घटनामध्ये वाढ होत आहे. लोकलमध्ये लोबंकळून प्रवास करताना पडल्याने दरवर्षी अडीच हजार प्रवासी जखमी होत असून त्यातील ५०० जणांचा मृत्यू होत आहे. दुसरीकडे आता लोकलमधील किरकोळ भांडणाची परिनिती आता थेट खुनी हल्ल्यात होत आहे. दैनंदिन प्रवास करणारे प्रवासी इतके खुनशी का झाले आहे असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे.
लोकलमधील बसण्याच्या जागेवरुन होणारी भांडणे किंवा मारामाऱ्या कधी-कधी जीवावर बेतत असतात. मात्र, त्यात कोणी चाकूने किंवा धारदार शस्राने कोणाला या किरकोळ भांडणात भोसकून ठार करत नसे. आता ऑक्टोबर ३१ पर्यंतच्या आकडेवारीनुसार पश्चिम रेल्वेवर पाच आणि मध्य रेल्वेवर दोन असे सात मर्डर गेल्या दहा महिन्यात घडले असल्याची लोहमार्ग पोलिसांची आकडेवारी आहे. तर तीन खूनाचे प्रयत्नाचे देखील गुन्हे जीआरपीने दाखल केले आहेत. त्यातील एक केस पश्चिम रेल्वेवर तर दोन मध्य रेल्वेवर खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे घडले आहेत.
नुकतीच अंधेरी रेल्वे स्थानाकात एका व्यक्तीशी भांडून लोकलमधून उतरताना त्या व्यक्तीकडे चालत्या लोकलच्या दारातून चाकू फेकल्याने ५२ वर्षांच्या भलत्याच प्रवाशाच्या छातीत तो घुसून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही पाहाताना हा व्यक्ती चाकू फेकताना दिसत आहे. या घटनेने आता सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करताना भिती वाटत आहे. सकाळ आणि सायंकाळी पिकअवरमध्ये लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्याने प्रवाशांचे धक्का लागणे किंवा दारातून चढू न देणे तसेच सीटवरुन भांडणे नेहमीच होत असतात. मात्र, त्याचे पर्यावसान अपवादानेच जीवघेण्या हल्ल्यात झाले आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते समीर झव्हेरी यांनी सांगितले की किरकोळ भांडणातून जीवघातक हल्ल्याच्या घटना यंदा जास्त घडल्या आहेत. आरडीएसओने १८ डब्याच्या लोकलच्या डिझाईनला परवानगी दिली आहे. हे डबे वाढले तर प्रवाशांना जागा होईल असे झव्हेरी यांनी सांगितले.