पाहुण्यांनी पाहुणाचार जरूर घ्यावा, पण अजीर्ण होईल इतका घेऊ नये; आयकरांच्या धाडीवरून पवारांची बोचरी टीका

| Updated on: Oct 13, 2021 | 5:48 PM

पाहुणे आले होते. तब्बल सहा दिवस राहिले. पाहुण्यांनी यावं. पाहुणचार घ्यावा. पण अजीर्ण होईल इतका पाहुणचार घेऊ नये, असा टोला शरद पवार यांनी लगावला. (sharad pawar attacks bjp over IT raids in family companies)

पाहुण्यांनी पाहुणाचार जरूर घ्यावा, पण अजीर्ण होईल इतका घेऊ नये; आयकरांच्या धाडीवरून पवारांची बोचरी टीका
sharad pawar
Follow us on

मुंबई: आयकर विभागाने पवार कुटुंबीयांवर टाकलेल्या धाडीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं. पाहुणे आले होते. तब्बल सहा दिवस राहिले. पाहुण्यांनी यावं. पाहुणचार घ्यावा. पण अजीर्ण होईल इतका पाहुणचार घेऊ नये, असा टोला शरद पवार यांनी लगावला.

शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आयकर विभागाच्या कारवाईवरून जोरदार हल्ला चढवला. पाहुणे हा शब्द वापरला हे चांगलं केलं. हा शब्द मी कॉईन केला होता. मी बोलेल पण त्यांची चौकशी झाल्यावर बोलेल. वस्तुस्थिती सांगेल. ती चौकशी सुरू आहे. केंद्रातील काही अधिकाऱ्यांकडून काही माहिती घेतली. पाहुणे येतात. अनेक ठिकाणी येतात. एक दिवस असतात, दोन दिवस असतात, तीन दिवस असतात,
आजचा सहावा दिवस आहे. पाहुणाचार घ्यावा, पण अजीर्ण होईल इतका पाहुणाचार असू नये, असं पवार म्हणाले.

घर न सोडण्याच्या सूचना होत्या

माझ्या घरातील मुलींची त्यांनी आठवण केली. या तिन्ही मुलींचा कारखाना नाही. एक पब्लिकेशनमध्ये आहे. एक डॉक्टर आहे. तिसरी गृहिणी आहे. त्यांचा या सर्वांशी संबंध नाही. ठिक आहे तिकडे गेले चौकशी केली. एक दीड दिवसात चौकशी केली. त्यांनाही जायची घाई होती. पण त्यांनाही सारखे फोन येत होते. थांबा म्हणून सांगितलं जात होतं. अजून घर सोडू नका. आमच्या मुलींनी विचारलं, दोन दिवस झाले… तीन दिवस झाले… तुमच्या घरचे वाट पाहत असतील. त्यांनी सांगितलं आम्हाला जायचंय, पण आम्हाला सूचना आहेत की आम्ही सांगितल्याशिवाय घर सोडायचं नाही. त्यामुळे पाच दिवस झाल्यावर काहीजणांनी घर सोडले. आज सहाव्या दिवशीही दोन तीन ठिकाणी पाहुणे आहेत, असं त्यांनी सांगितलं.

एका घरात 18 लोकं चौकशीला गेली

आतापर्यंत अशा एजन्सीनी अनेक ठिकाण चौकशी केल्या. पण त्या सहा दिवस केल्या हे कधी ऐकलं नाही. कदाचित काही नवीन धोरणं स्वीकारली असतील तर त्याबाबत तक्रार करण्याची आज ही वेळ नाही. योग्यवेळी त्याचा विचार करू. सहा दिवस मिडल क्लास फॅमिलीमध्ये पाहुणे राहिले. आपली घरे छोटी असतात. दोन बेडरूम किंवा तीन बेडरूमचा हॉल असतो. कोल्हापुरात जास्त लोकं नव्हते. नवरा-बायको राहतात तिथे 18 लोकं गेली. घरात बसायला, बाकीची साधनं वापरायला जागा… यावर भाष्य करण्याची गरज नाही. असं कधी पाहिलं नव्हतं, असं घडलं नव्हतं. असो सत्तेचा गैरवापर पाहिला त्याचं वास्तव चित्रं समोर आलं, असही ते म्हणाले.

पाचवेळा एकाच घरात छापा मारण्याचा विक्रम

केंद्र सरकार काही यंत्रणांचा गैरवापर करत आहे. सीबीाय इन्कम टॅक्स, ईडी असेल एनसीबी या सर्व एजन्सीचा वापर राजकीय दृष्टीने केला जात आहे. त्यात काही उदाहरण द्यायचंच तर महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री. अनिल देशमुखांवर त्यावेळच्या पोलीस आयुक्तांनी आरोप केले होते. मला येऊन भेटले होते. त्यांनी आरोप केले. त्यातून जे वातावरण झालं त्यामुळे देशमुखांना राजीनामा दिला. ज्यांनी आरोप केला ते कुठे आहे ते माहीत नाही. जबाबदार अधिकारी जबाबदार माणसावर बेछुटपणे आरोप करतो हे पूर्वी कधी घडलं नव्हतं. देशमुखांनी बाजूला व्हायची भूमिका घेतली. आता आरोप करणाऱ्यावर आरोपांची मालिका सुरू झाली आहे. देशमुख बाजूला झाले आणि हे गृहस्थ गायब झाले आहेत. देशमुखांची चौकशी सुरू आहे. काल त्यांच्या घरी पाचव्यांदा छापा मारला. त्याच घरात पाचवेळा जाऊन छापा मारण्याचा विक्रम केला हे मान्य केलं पाहिजे. पाच पाचवेळा एखाद्या व्यक्तीच्या घरी जाणं कितपत योग्य आहे याचा विचार करण्याची वेळ आली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

यावेळी त्यांनी लखमीपूर घटनेवरही भाष्य केलं. काही प्रकार देशात घडले. उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांवर हल्ला झाला. लखीमपूरच्या संदर्भात सरळसरळ माहिती आली. मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. शेतकऱ्यांच्या जमावावर काही लोक गाडीतून येतात आणि त्यांना चिरडतात. त्यात तीन ते चार लोकांची हत्या होते. त्यात एक पत्रकारही त्यात होता. असा प्रकार कधी घडला नव्हता. असा प्रकार घडल्यानंतर त्या शेतकऱ्यांपैकी काही लोकांनी सांगितलं केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचे चिरंजीव होते. पण ते नाकारले गेले. त्यावर कारवाई करावी अशी मागणी झाली. पण यूपी सरकारने त्याला प्रतिसाद दिला नाही. सहा सात दिवसानंतर सर्वोच्च न्यायालायने प्रतिक्रिया दि्लयानंतर गृहराज्य मंत्र्याच्या मुलाला अटक होते. मुलाचा संबंध नसल्याचं हेच गृहराज्यमंत्री सांगत होते. त्यांच्या चिरंजीवाला त्यांच्या पक्षाचं सरकारलाच अटक करावी लागली. कारण त्याच्या बद्दलचे पुरावे सापडले. त्यामुळे केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

 

संबंधित बातम्या:

तपास यंत्रणेकडून देशमुखांच्या घरी पाचवेळा छापा मारण्याचा विक्रम, शरद पवारांचा घणाघाती हल्ला

पाच वर्ष सत्तेत असल्याचं स्मरण राहणं कधीही चांगलं, वेदना किती खोल हेही दिसतं; पवारांचे फडणवीसांना खोचक टोले

फडणवीसांकडून मावळ गोळीबाराची आठवण, आता पवारांनी मावळातील वस्तुस्थितीच माडंली!

(sharad pawar attacks bjp over IT raids in family companies)