शरद पवार यांची गुगली, केंद्र सरकारकडे 70 हजार कोटींच्या चौकशीची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर सविस्तर प्रतिक्रिया दिली. यावेळी शरद पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारण्यात आला.

शरद पवार यांची गुगली, केंद्र सरकारकडे 70 हजार कोटींच्या चौकशीची मागणी
sharad pawar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 30, 2023 | 7:10 PM

मुंबई | 30 ऑगस्ट 2023 : उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत सहभागी होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमात काँग्रेसवर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती. यावेळी त्यांनी शरद पवार यांचा उल्लेख केला होता. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पार्टीवर 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते. त्यानंतर लगचे काही दिवसांनी अजित पवार सत्तेत सहभागी झाले होते. नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आरोपांबद्दल आज पत्रकारांनी शरद पवारांना प्रश्न विचारला. नरेंद्र मोदींनी केलेल्या 70 हजार कोटींच्या आरोपांवर काय सांगाल? असं पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर शरद पवार यांनी भूमिका मांडली.

“माझा देशाच्या पंतप्रधानांना आग्रह आहे, ते देशाचे पंतप्रधान आहेत. जिथे सत्तेचा गैरवापर झाला अशी माहिती त्यांच्याकडे असेल तिथे त्यांनी सखोल चौकशी करावी आणि वस्तुस्थिती समाजासमोर ठेवावी. नुसता आरोप करण्यात अर्थ नाही. तुमच्या हातात सत्ता आहे. त्याची चौकशी करा आणि संपूर्ण देशाला वस्तुस्थिती सांगावी”, असं शरद पवार म्हणाले.

शरद पवार यांचा अजित पवार गटावर निशाणा

दरम्यान, शरद पवार इंडिया आघाडीत सहभागी आहेत. तर त्यांच्या पक्षाचा एक गट सत्तेत सहभागी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. नेमकं शरद पवार यांच्यासोबत जायचं की अजित पवार यांना साथ द्यायची? असा संभ्रमात कार्यकर्ते आहेत. याबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारला असता, “काही संभ्रम नाही. त्या लोकांना त्यांची जागा राज्यातील मतदान दाखवतील”, अशा शब्दांत शरद पवार यांनी अजित पवार यांच्या गटावर निशाणा साधला.

इंडिया आघाडीची उद्यापासून बैठक

इंडिया आघाडीची उद्यापासून दोन दिवसीय बैठक पार पडणार आहे. इंडिया आघाडीची पुढची रणनीती या बैठकांमध्ये ठरणार आहे. इंडिया आघाडीचा एक संयोजक असणार की 11 सदस्यांची समिती असेल? याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच या बैठकीत लोगो विषयी चर्चा होण्याची शक्यता आहे.

इंडिया आघाडीची ही तिसरी बैठक आहे. विशेष म्हणजे ही बैठक मुंबईत आहे. त्यामुळे या बैठकीला महाराष्ट्रासाठी जास्त महत्त्व प्राप्त झालंय. ही बैठक सुरु होण्याच्या एक दिवसआधी मुंबईत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी शरद पवार यांनी विविध मुद्द्यांवर भूमिका मांडली.