शरद पवारांना सुनेत्रा पवार भेटल्याच नाहीत, तीन वेळा वेळ घेतला, पण… तर्कवितर्कांना उधाण

शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयातून घरी परतले. सुनेत्रा पवार यांनी तीन वेळा वेळ घेऊनही त्यांची भेट घेतली नाही. प्रफुल्ल पटेल यांनी पवारांशी दीड तास चर्चा केली. सुनील तटकरे यांच्या राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या विधानामुळे सुनेत्रा पवारांनी भेट टाळली का, याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

शरद पवारांना सुनेत्रा पवार भेटल्याच नाहीत, तीन वेळा वेळ घेतला, पण... तर्कवितर्कांना उधाण
Sunetra Pawar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 07, 2026 | 12:31 PM

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना अखेर ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. दोन दिवसाच्या उपचारानंतर पवार घरी गेले आहेत. या दोन दिवसात अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. काही नेत्यांनी फोनवरूनच त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. एवढेच नव्हे तर अजितदादा गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पवारांची भेट घेऊन त्यांच्याशी दीड तास चर्चा केली. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सुद्धा शरद पवार यांना भेटायला येणार होत्या. त्यांनी पवारांची तीनदा वेळ घेतली. पण शेवटपर्यंत त्या आल्याच नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तसेच अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

शरद पवार यांना गेल्या आठवड्यात पुण्याच्या रुबी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिथे दोन दिवस उपचार केल्यानंतर डिस्चार्ज मिळाला होता. त्यानंतर पवार रुग्णालयातून थेट मुंबईला सिल्व्हर ओक या निवासस्थानी आले होते. पण संध्याकाळी त्यांची तब्येत बिघडल्याने परत त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पवारांची प्रकृती बिघडल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. तर प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, संजय राऊत, जितेंद्र आव्हाड, सुशील कुमार शिंदे आणि प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी रुग्णलयात जाऊन पवारांची भेट घेतली होती.

Loading...

10 तारीख आणि दीड तास चर्चा

दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. पटेल यांनी पवारांची भेट घेऊन तब्बल दीड तास त्यांच्याशी चर्चा केली. दीड तास चर्चा झाल्यानंतर 10 तारखेनंतर भेटू असं शरद पवार यांनी पवारांना सांगितलं. त्यामुळे राज्याच्या राजकारणात काय घडणार? अशी चर्चा रंगली आहे. पटेल यांच्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सुद्धा शरद पवार यांना भेटायला ब्रीच कँडीत जाणार होत्या. सुनेत्रा पवारांनी तीन वेळा पवारांची वेळ घेतली. पण अखेरपर्यंत त्या पवारांना भेटल्या नाहीत. आजही त्यांनी पवारांची भेट घेतली नाही. आता पवारांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे.

तटकरेंच्या विधानानंतर…

दरम्यान, काल अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर भाष्य केलं होतं. अजितदादांनी विलिनीकरणासाठी बैठका घेतल्या होत्या. मला त्याची कल्पनाा दिली होती, असं तटकरे यांनी म्हटलं. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला. तटकरे यांनी नेमका टायमिंग साधून हे विधान केलं होतं. तटकरे यांनी हे विधान केल्यानेच सुनेत्रा पवार यांनी पवारांच्या भेटीला जाणं टाळलं का? अशी चर्चा आता रंगली आहे. दरम्यान, पार्थ पवार आणि जय पवार यांनी शरद पवार यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us