Sharad Pawar: बड्या राजकीय घडामोडींदरम्यान राष्ट्रवादी पक्षाची उद्या बैठक, रोहित पवार उपस्थित राहणार?
Sharad Pawar NCP Meeting: राष्ट्रवादीसह राज्यात बड्या घडामोडी घडत असताना उद्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी बैठक होत आहे. या बैठकीला रोहित पवार उपस्थिती असतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. तर या बैठकीनंतर काय राजकीय घडामोड घडते याकडेही राज्याचे लक्ष लागेल आहे.

Sharad Pawar NCP Meeting: राष्ट्रवादी शरद पवार पार्टीच्या नेत्यांची उद्या गुरुवारी बैठक होत आहे. गेल्या महिनाभरापासून राजकारणाच्या केंद्रस्थानी पवारांचा पक्ष आलेला आहे. दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण आणि एनडीएला पाठिंबा या प्रमुख मुद्यांवर राष्ट्रवादीची भूमिका महत्त्वाची मानली जाते. विलिनीकरणाचा मुद्दा मागे पडल्याचे सातत्याने समोर येत आहे. त्याचवेळी पवारांची राष्ट्रवादी एनडीएसोबत जाणार असल्याचाही दावा करण्यात येत आहे. महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर राष्ट्रवादीची काय भूमिका असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सगळ्यांचे लक्ष आता उद्याच्या बैठकीकडे लागले आहे.
वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये सुळे घेणार बैठक
सुप्रिया सुळे यांनी 26 नोव्हेंबर रोजी बैठक बोलवली आहे. राज्यातील जिल्हाध्यक्ष तसंच इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी मोर्चा यात सहभागी होणे अथवा नाही यावरून मतभेद यावर पडसाद उमटण्याची शक्यता आहे. वाय बी चव्हाण सेंटर येथे खासदार सुळे या ही बैठक घेतील. या बैठकीला राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित असतील .
रोहित पवार उपस्थित राहतील?
उद्याची बैठक ही राज्यातील जिल्हाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांची आहे. पण शेतकरी मोर्चावरून सध्या राष्ट्रवादीत धुसफूस असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार, आमदार रोहित पवार हे हिवाळी अधिवेशनावर ट्रॅक्टर मोर्चा नेणार आहे. त्यासाठी शेगाव ते नागपूर असा शेतकरी मोर्चा काढणार आहेत. उद्याच्या बैठकीत याविषयी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय भूमिका घेते हे महत्त्वाचे ठरणार आहे. रोहित पवार पक्षातील ज्येष्ठांना विचारात न घेता आंदोलनं आणि दिशा ठरवत असल्याचा आरोप होत होता. तर आज शेतकरी मोर्चाच्या पोस्टरवर शरद पवार यांचा फोटो असल्याचे दिसून आले.
रोहित पवार यांची पदाधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठक
तर रोहित पवार हे नागपूर दौऱ्यावर असताना त्यांनी विदर्भातील काही पदाधिकाऱ्यांची गोपनीय बैठक नागपूरमध्ये घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. पक्षातील वरिष्ठांची नाराजी कशी दूर करायची आणि ४ तारखेपासून निघणाऱ्या मोर्चावर उद्याच्या पक्षाच्या बैठकीत पक्षाच्या नेत्यांनी कसं कनव्हिन्स करायचं? याबाबत बैठक झाल्याचे समजते. या बैठकीत विदर्भातील काही महत्त्वाचे आणि मोजकेच नेते उपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे. तर याप्रकरणी आज खासदार सुप्रिया सुळे यांनी चपखल प्रतिक्रिया दिली. गुप्त बैठक काय असते? असा खोचक सवाल त्यांनी विचारत अशा बैठकीचे दावे फेटाळले.