Sharad Pawar NCP : रोहिणी खडसे यांच्याजागी शरद पवार राष्ट्रवादी पक्ष नव्या महिला अध्यक्षाची निवड करणार, अखेर नाव ठरलं
Sharad Pawar NCP Women Wing President: शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षांचं नाव निश्चित झालं आहे. रोहिणी खडसे यांचा 3 वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर नवीन महिला अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. कोण आहेत नवीन महिला प्रदेशाध्यक्ष?

अक्षय मंकणी, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी: शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षात महिला विंगमध्ये मोठा बदल होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष पद विदर्भाकडे जाणार आहे. नागपूर विभागातून महिला अध्यक्ष निवडला जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. खानदेशमधून रोहिणी खडसे यांनी महिला अध्यक्ष म्हणून गेल्या तीन वर्षात सरस कामगिरी केली आहे. त्यांना या पदावर तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानंतर आता त्यांच्या जागी नवीन महिला अध्यक्ष नियुक्त करण्यात येणार आहे.
डॉ. अंजली साळवे नवीन महिला अध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महिला अध्यक्ष पद नागपूर विभागात देण्यात येणार आहे. महिला अध्यक्ष पदी डॉ. अंजली साळवे यांची लवकरच नियुक्ती होणार आहे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हस्ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रोहिणी खडसे यांनी 3 वर्ष कालावधी पूर्ण केल्यानंतर आता साळवे यांचाकडे जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. खडसे यांना आता कोणती जबाबदारी देण्यात येते याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
पक्षाची सडेतोड भूमिका मांडण्यात आघाडीवर
अंजली साळवे या पक्षाची सडेतोड भूमिका मांडण्यात आघाडीवर दिसून आल्या आहेत. यापूर्वी राज्य महिला आयोगावरील अध्यक्ष आणि सदस्य यांच्या नेमणुकीवरून त्यांनी जोरदार हल्लाबोल चढवला होता. महिलांसाठी काम करणाऱ्या आणि महिलाविषयीक कायद्यांची जाण असणार्या महिलांनाच या पदावर नियुक्त करण्याची मागणी त्यांनी केली होती. केवळ महिलांच्या पुनर्वसनासाठी या पदाचा वापर करण्यात येऊ नये असे म्हटले होते. तर इतर अनेक प्रश्नांवर त्यांनी सडेतोड भूमिका मांडली आहे.
प्रदेश उपाध्यक्षपदी बांदल
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी उद्योजक लक्ष्मण बांदल यांची नियुक्ती करण्यात आली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. बांदल यांनी यापूर्वी हवेली तालुक्यातील वडाचीवाडीचे सरपंच म्हणून काम पाहिले आहे. ते राष्ट्रवादीचे सक्रीय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. पक्षाचे काम नेटाने पुढे नेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.