महाविकास आघाडीत नाराजीची ठिणगी, मविआतील अनपेक्षित बातमी, डॅमेज कंट्रोल होणार?

| Updated on: May 17, 2023 | 6:45 PM

महाविकास आघाडीत सारं काही आलबेल नाही, असंच चित्र दिसतंय. कारण ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीत काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महाविकास आघाडीत नाराजीची ठिणगी, मविआतील अनपेक्षित बातमी, डॅमेज कंट्रोल होणार?
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात मोठ्या घडामोडी घडणार आहेत. या घडामोडींना आतापासूनच सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांच्या नुकतीच महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला महाविकास आघाडीचे सर्व दिग्गज नेते होते. या बैठकीत लोकसभा निवडणुकतीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची चर्चा आहे. राज्यात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांमध्ये 16-16-16 चा फॉर्म्युला ठरल्याची प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून देण्यात आल्याची चर्चा आहे. याच मुद्द्यावर ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या बैठकीत न ठरलेले मुद्देही मुलाखतीत मांडल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे. भास्कर जाधव यांच्या या आरोपांवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपण त्यांच्याशी बोलणार असल्याचं म्हटलं.

भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले?

“काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘लोकसत्ता’ला यांची मुलाखत मी वाचली. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांनीदेखील मीडियाला दिलेली मुलाखत शब्दश: पाहिली. या सगळ्या दृष्टीने समोर येवून तुमच्या दृष्टीने ठरलेलं धोरण हे सांगत असताना, त्यांच्या स्वतंत्र मुलाखत मात्र वेगळं काहीतरी दर्शवत आहेत, असं माझं वेगळं निरीक्षण आहे. म्हणून त्या संदर्भात मी आमच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करणार आहे”, असं भास्कर जाधव म्हणाले.

हे सुद्धा वाचा

जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

भास्कर जाधव यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. “कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. त्यादिवशी सांगितलेलं, आजही सांगतो. बैठकीमधील चर्चेत कोणतही सूत्र ठरलेलं नाही. त्यामुळे त्याबाबत सांगता येणार नाही. भास्कर जाधव का नाराज झाले? याबाबत त्यांना फोन करुन चर्चा करु. आमची कोणत्याही मतदारसंघाबाबत चर्चा झाली नाही किंवा जे आहेत तेच असतील, अशी कोणतीही चर्चा झाली नाही”, असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलं.

महाविकास आघाडी एकत्र राहणार?

भास्कर जाधव यांनी नाराजी व्यक्त केली असली तरीही तीनही पक्ष आगामी निवडणुकांमध्ये एकत्र राहण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी तीनही पक्ष एकत्र राहण्याची शक्यता आहे. पण तरीही आगामी काळात काय घडामोडी घडतात, याचा अंदाज आताच बांधणं शक्य नाही. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईत रणनीती आखत असल्याची चर्चा आहे. ठाकरे गट दक्षिण मुबंई लोकसभा मतदारसंघ हा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना निवडणूक लढवण्यासाठी देणार असल्याची चर्चा आहे.