
Shivaji Park Dusshera Melava : शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव सेना आणि शिंदे सेनेत दसरा मेळाव्यावरून गेल्या दोन वर्षात चुरस पाहायला मिळाला. शिवाजी पार्कवर कुणी मेळावा घ्यावा यावरून राडा झाला. राजकीय टोलेबाजी पाहायला मिळाली. शिंदे सेना आणि उद्धव सेनेने या दोन्ही वेळा शक्तीप्रदर्शनाची संधी सोडली नाही. बाळासाहेबांचा वैचारिक वारसा आपल्याकडेच आहे असा दावा दोघांकडूनही करण्यात आला. तर पल्लेदार, धडाकेबाज भाषणाची मेजवाणी मराठी जणांना मिळाली. शिवसेनेत उभी फुट पडल्यापासून दसरा मेळाव्यात शब्दांना धार आली आहे. उद्धव सेना शिंदे सेनेवर तुटून पडल्याचे दोन्ही वेळा दिसून आले. पणा यंदा चमत्कार झाला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. त्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे हजर असतील, अशी अटकळ बांधण्यात येत आहे. आता उद्धव सेनेने दसरा मेळाव्याचा दुसरा टिझर प्रसिद्ध केला आहे.
ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा दुसरा टिझर प्रसिद्ध
परंपरा महाराष्ट्राची, मैदान शिवतीर्थाच, आवाज शिवसेनेचा, नेतृत्व ठाकरेंचं, हुंकार शिवसैनिकांचा या आशयाखाली दुसरा मेळाव्याचा दुसरा टिझर प्रसिद्ध झाला आहे. यंदा राज ठाकरे यांच्याशी सूर जुळल्याने आणि हे दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याने मनसे आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे. शिवाजी पार्कात दसरा मेळावा होणार आहे. शिवसेनेकडून भव्य शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे. यंदा गर्दीचे रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे. दसऱ्या मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.
मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. यंदा अतिवृष्टीने आणि महापूराने या भागात मोठे नुकसान झालं आहे. शेतकऱ्यावर पावसाचा जुलूम सुरूच आहे. पावसाच्या रझाकारीमुळे पीक हातचं गेलं आहे. अनेक जनावरं वाहून गेली आहे. तर शेताला तळ्याचं स्वरुप आलं आहे. महापूराने अनेक गावांना वेढा घातला आहे. पावसाचे सावट असल्याने या भागातून दसरा मेळाव्याला जाणाऱ्यांसमोर संकट उभं ठाकलं आहे. दसऱ्या मेळाव्यात ठाकरे या सर्व प्रश्नांवर सरकारवर हल्लाबोल केल्याशिवाय राहणार नाहीत.
राज ठाकरे येणार?
यंदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मराठीच्या मुद्दावरून 5 जुलै 2025 रोजी एकत्र आले. लहान मुलांना हिंदी सक्तीचा महायुतीचा एक निर्णय झाला आणि त्याला विरोध करण्यासाठी दोन्ही बंधू एकत्र आले. त्यानंतर त्यांच्यात चर्चेच्या आता अनेक फेऱ्या झाल्या आहेत. विविध कारणांनी दोघेही एकत्र आले आणि त्यांच्यात चर्चा सुद्धा झाली. आता दसरा मेळाव्याला राज ठाकरे यांना उद्धव सेनेने निमंत्रण दिले की नाही आणि ते येणार की नाही याविषयीची चर्चा होत आहे. याविषयी अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.