‘जमात-ए-इस्लामी’च्या कार्यक्रमात संजय राऊत CAA विरोधात बोलणार

| Updated on: Jan 03, 2020 | 12:49 PM

संजय राऊतांशिवाय मुंबई उच्च न्यायालयाचे माजी जस्टिस बीजी कोळसे पाटील हेसुद्धा चर्चेत सहभागी होणार आहेत

जमात-ए-इस्लामीच्या कार्यक्रमात संजय राऊत CAA विरोधात बोलणार
Follow us on

मुंबई : सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) यांच्याविरोधात बहुतांश मुस्लिम संघटना देशभरात आंदोलन करत आहेत. जमात-ए-इस्लामी हिंद (JIH) संघटनेने सीएए आणि एनआरसी विरोधात मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमात शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut at Jamaat-e-Islami) सहभागी होणार आहेत. जमात-ए-इस्लामी हिंद मुंबई, मराठी पत्रकार संघ आणि असोसिएशन ऑफ प्रोटेक्शन ऑफ सिविल राइट्स (एपीसीआर) यांनी उद्या (शनिवारी) हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

‘सामना’चे संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचं निमंत्रण स्वीकारल्याची माहिती जमात-ए-इस्लामी हिंदच्या मुंबई अध्यक्षांनी दिली. राऊतांशिवाय मुंबई उच्च न्यायालयाचे माजी जस्टिस बीजी कोळसे पाटील, ज्येष्ठ वकील मिहीर देसाई आणि युसूफ मुछाला हेसुद्धा चर्चेत सहभागी होणार असल्याचं सांगितलं.

शिवसेनेने लोकसभेत सुधारित नागरिकत्व विधेयकाला पाठिंबा दिला होता, मात्र राज्यसभेत विधेयकावर मतदानावेळी खासदारांनी वॉकआऊट केलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात एनआरसी लागू करणार नाही, तर सीएएबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर भूमिका घेऊ असं सांगितलं होतं.

संजय राऊतही सीएए आणि एनआरसीविरोधात सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करताना दिसतात. ‘जमात-ए-इस्लामी’च्या मैदानात राऊतांची तोफ कशी धडाडणार (Sanjay Raut at Jamaat-e-Islami), हे पाहणं उत्सुकतेचं आहे.