
राज्यात आज सर्वत्र दसरा मेळाव्याचा सण साजरा केला जात आहे. या विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर मुंबईत शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाचा असे दोन दसरा मेळावा आयोजित करण्यात आले आहेत. या मेळाव्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील दादर, वेस्टर्न एक्स्प्रेस-वे, ईस्टर्न एक्स्प्रेस-वे सह अनेक प्रमुख रस्त्यांवर दोन्ही गटांकडून भव्य बॅनरबाजी करण्यात आली आहे. तसेच सर्वत्र झेंडे लावत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. यामुळे संपूर्ण मुंबई भगवामय झाली आहे.
दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील दादर, वेस्टर्न एक्स्प्रेस-वे, ईस्टर्न एक्स्प्रेस-वे सह अनेक प्रमुख रस्त्यांवर बॅनर लावण्यात आले आहेत. विशेषतः दादरमधील टी. टी. सर्कल परिसरात दोन्ही गटांकडून बॅनरबाजी करण्यात आल्याने बॅनर वॉर पाहायला मिळत आहे. या बॅनर वॉरमुळे दोन्ही गटांनी मेळाव्याआधीच कार्यकर्त्यांमधील उत्साह शिगेला पोहोचवला आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने ठाकरे गटाने दादर, शिवाजी पार्क, प्रभादेवी या परिसरात बॅनरबाजी केली आहे. महाराष्ट्र आपला आहे आणि इथे आवाजसुद्धा आपलाच असले, विचार ठाकरेंचा, आवाज महाराष्ट्राचा अशा विविध आशयाची बॅनरबाजी पाहायला मिळत आहे.
तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील दसरा मेळावा पार पडत आहे. यावेळी दादर टी टी, खार वेस्टर्न एक्स्प्रेस-वे सह महत्त्वाच्या रस्त्यांवर बॅनरबाजी पाहायला मिळत आहे. यामुळे सर्वच रस्ते भगवामय झाले आहेत. शिंदे गटाच्या बॅनवर भगवे विचार, भगवं रक्त, आम्ही विचारांचे वारसदार असा आशय पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाकडून यंदाच्या दसरा मेळाव्यानिमित्त जोरदार शक्तीप्रदर्शन केले जात आहे.
शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी स्टेजवरील मुख्य बॅनरवर महत्त्वाच्या नेत्यांचे फोटो लावण्यात आले आहेत. यात छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर आनंद दिघे, बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे फोटो आहेत. तसेच दोन्ही गटांनी बॅनरबाजीच्या माध्यमातून आपली ताकद दाखवून दिली आहे. आता या दोन्ही गटाच्या दसरा मेळाव्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये होत आहे. खुल्या मैदानावरील भव्य मेळावा टाळून, त्यावरील खर्च मराठवाड्यातील पूरग्रस्त भागांमध्ये वळवण्याचा पक्षाचा मानस आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागातील पदाधिकाऱ्यांना मेळाव्याला न येण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. गोरेगावच्या नेस्को मैदानात मेळाव्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. २५ हजारांहून अधिक शिवसैनिकांसाठी आसनव्यवस्था असून, स्टेजवर ५० मान्यवरांना बसण्यासाठी जागा करण्यात आली आहे.