
नफ्यासाठी माणूस किती खालच्या थराला जाऊ शकतो याचा एक संतापजनक प्रकार मुंबईच्या मालाड परिसरात उघडकीस आला आहे. एका फळ विक्रेत्याने चक्क उंदीर मारण्याचे औषध Ratol फळांना लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या आर्थिक फायद्यासाठी हजारो निष्पाप नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या विक्रेत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे संपूर्ण मुंबईत संतापाची लाट उसळली आहे.
मालाडमधील एका गजबजलेल्या भागात हा परप्रांतीय विक्रेता आपला फळांची गाडी लावायचा. रात्रीच्या वेळी गोदामात किंवा गाड्यावर उंदीर फळे कुरतडतात, ज्यामुळे आर्थिक नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी या विक्रेत्याने चक्क सफरचंद आणि डाळिंब यांसारख्या महागड्या फळांच्या सालीला Ratol हे उंदीर मारण्याचे औषध लावायचा. यानंतर काही जागरूक नागरिकांनी या विक्रेत्याला फळांना पिवळसर-काळपट क्रीम लावताना रंगेहाथ पकडले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्याला दम भरल्यानंतर त्याने उंदीर फळे खाऊ नयेत म्हणून मी हे करतोय, अशी धक्कादायक कबुली दिली.
या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत त्या फळ विक्रेत्याचा संपूर्ण प्रताप समोर आला आहे. या घटनेमुळे मुंबईतील स्ट्रीट फूड आणि उघड्यावर विकल्या जाणाऱ्या फळांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. याप्रकरणी स्थानिक रहिवाशांनी या विक्रेत्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच स्थानिकांनी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) या संपूर्ण भागातील फळांची तपासणी करण्याची मागणी केली आहे.
‘Ratol’ मध्ये यलो फॉस्फरस (Yellow Phosphorus) नावाचे घातक रसायन असते. हे रसायन मानवी शरीरासाठी मृत्यूचा सापळा ठरू शकते. हे विष पोटात गेल्यास रक्ताभिसरण प्रक्रियेत मिसळून यकृत (Liver) आणि मूत्रपिंड (Kidney) निकामी करू शकते. हे विषारी क्रीम फळांच्या सालीमध्ये झिरपते. त्यामुळे फळे गरम पाण्याने धुतली तरी त्यातील विषाचा अंश पूर्णपणे नष्ट होत नाही. लहान मुले अनेकदा फळे न सोलता किंवा अर्धवट धुवून खातात, अशा वेळी हे विष त्यांच्यासाठी तत्काळ प्राणघातक ठरू शकते. या घटनेनंतर आता नागरिकांनी बाजारातून फळे आणल्यानंतर ती किमान २० मिनिटे कोमट पाण्यात मीठ टाकून भिजत ठेवावीत आणि शक्य असल्यास साली काढूनच फळांचे सेवन करावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
पाहा व्हिडीओ