मोठ्या हालचाली? सुनेत्रा पवार थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, वर्षावर चर्चा काय?

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. ही भेट विलिनीकरणाबद्दल होती की विकासकामांबाबत, यावर तर्कवितर्क सुरू आहेत. सुनील तटकरे यांच्या संदिग्ध विधानांमुळे चर्चांना आणखी बळ मिळाले, तर सुप्रिया सुळे यांनी मात्र विलिनीकरणाच्या चर्चा निराधार असल्याचे म्हटले आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात गोंधळ वाढला आहे.

मोठ्या हालचाली? सुनेत्रा पवार थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, वर्षावर चर्चा काय?
sunetra pawar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 14, 2026 | 11:29 AM

गेल्या 15 दिवसापासून राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. अजितदादा गटाच्या नेत्यांकडून विलिनीकरणावर वारंवार भाष्य केलं जात आहे. विशेष म्हणजे सत्तेत असतानाही अजितदादा गटाकडून त्यावर भाष्य केलं जात असल्याने चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच आम्हाला विचारल्याशिवाय विलिनीकरण होणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यामुळे विलिनीकरण होणार असल्याचे संकेत मिळत होते. या सर्व घडामोडी घडत असतानाच राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय नेत्या सुनेत्रा पवार या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्या आहेत. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेल्या आहेत. भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, राज्यात गेल्या काही दिवसांपासून विलिनीकरणाच्या चर्चा सुरू आहेत. त्याचवेळी सुनेत्रा पवार या मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याने त्याचा राजकीय अर्थ काढला जात आहे. या भेटीत विलिनीकरणारवर चर्चा होणार की विकास कामांबाबत चर्चा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या भेटीनंतर त्याबाबतची माहिती समोर येणार असण्याची शक्यता आहे.

Loading...

तटकरे भेटले…

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी काल पत्रकार परिषद घेऊन विलिनीकरणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं होतं. अजितदादा जिवंत असते तर 12 फेब्रुवारी रोजीच विलिनीकरण झालं असतं. पण आता सध्या विलिनीकरणाची कोणतीच चर्चा नाहीये, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं होतं. तसेच कुठे काय बोलायचं हे मला कळतं. त्यामुळे मी योग्यवेळी योग्य गोष्टी बोलणार आहे, असंही तटकरे यांनी स्पष्ट केलं. तटकरे यांनी संदिग्ध प्रतिक्रिया दिल्याने विलिनीकरणावर अजूनही चर्चा होत आहे.

सुप्रिया सुळेंचा दावा काय?

शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम दिला. सध्या विलिनीकरणाची कोणतीच चर्चा नाही. आम्हाला समोरून कोणताही प्रस्ताव आला नाही. आमच्याकडून कोणतीही चर्चा नाही. त्यामुळे या विषयावर आता मी बोलणार नाही. माझ्यासाठी हा विषय संपला आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच प्रफुल्ल पटेल आणि मी संसदेच्या बैठकीत सहभागी होत असतो. याचा अर्थ तिथे विलिनीकरणाची चर्चा झाली असा होत नाही. आमच्यात काल कोणतीही बैठक झाली नाही. सर्व बातम्या निराधार आहेत, असा दावाही सुप्रिया सुळे यांनी केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us