
संभाजीनगरातून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर अंबादास दानवे नाराज असल्याची चर्चा होती. मात्र, अंबादास दानवेंनी चंद्रकांत खैरेंची भेट घेतल्यानंतर या नाराजीनाट्यावर पडदा पडलाय. अंबादास दानवेंनी चंद्रकांत खैरेंची भेट घेऊन त्यांचा सत्कार करत नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम दिलाय.
चंद्रकांत खैरेंना उमेदवारी मिळाल्यानंतर अंबादास दानवेंनी अनेकदा नाराजी व्यक्त करून दाखवली होती. श्रीनिवास पाटलांचा निर्णयाचा दाखला देत त्यांनी अप्रत्यक्षरित्या चंद्रकांत खैरेंना टोला देखील लगावला होता. मात्र, खैरेंच्या भेटीनंतर आता अंबादास दानवेंचे सूर बदलले आहेत. उमेदवारी घोषित झाल्यानंतर चंद्रकांत खैरेंनी प्रचाराचा नारळ फोडला असून जोरदार प्रचार सुरु केलाय. मात्र, दुसरीकडे महायुतीकडून खैरेंच्याविरोधात कोण मैदानात उतरणार हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये.
ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरेंना उमेदवारी घोषित करण्यात आलीय. तर एमआयएमकडून इम्तियाज जलील यांची उमेदवारी निश्चित आहे. मात्र, महायुतीत उमेदवार देण्यावरून अजूनही संभ्रम आहे. महायुतीकडून भागवत कराड आणि संदीपान भुमरेंना संधी मिळणार अशी चर्चा होती. मात्र, आता संदीपान भुमरेंचा मुलगा विलास भुमरेंचं नाव पुढे येतंय. तर विनोट पाटील यांचंही नाव महायुतीकडून चर्चेत आहे.
संभाजीनगरच्या जागेवरून भाजप आणि शिंदे गटात ओढाताण सुरुय. दरम्यान शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी संभाजीनगरची जागा भाजपचीच असल्याचं म्हटलंय. संभाजीनगरमधील ठाकरे गटातील अंतर्गत नाराजी दूर झालीय. मात्र, दुसरीकडे अजूनही महायुतीचा उमेदवार ठरत नाहीये. त्यामुळे महायुतीकडून चंद्रकांत खैरेंविरोधात कोण मैदानात उतरणार हे पाहावं लागणारय.