ठाण्यातील फ्लेमिंगो अभयारण्याची नवी अधिसूचना लवकरच; मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील विकास कामांचा मार्ग होणार मोकळा!

| Updated on: Oct 10, 2021 | 4:52 PM

लवकरच जाहीर होणाऱ्या नव्या अधिसूचनेमुळे, ठाणे येथील फ्लेमिंगो अभयारण्याच्या इको सेन्सेटिव्ह झोनच्या बाहेरील विकासकामे रखडणार नाहीत. (Thane Creek Flamingo Sanctuary new notification will release soon)

ठाण्यातील फ्लेमिंगो अभयारण्याची नवी अधिसूचना लवकरच; मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील विकास कामांचा मार्ग होणार मोकळा!
Thane Creek Flamingo Sanctuary
Follow us on

मुंबई: लवकरच जाहीर होणाऱ्या नव्या अधिसूचनेमुळे, ठाणे येथील फ्लेमिंगो अभयारण्याच्या इको सेन्सेटिव्ह झोनच्या बाहेरील विकासकामे रखडणार नाहीत, असे सूतोवाच करत नवी अधिसूचना लवकरच जारी केली जाईल, अशी ग्वाही केंद्रीय पर्यावरणमंत्री भुपेंद्र यादव यांनी दिली आहे. दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी या विषयासंदर्भात केंद्रीय मंत्र्यांची नुकतीच भेट घेऊन निवेदन सादर केले होते. या भेटी दरम्यान नव्या अधिसूचनेविषयी मंत्री महोदयांनी प्रतिक्रिया दिली. या नव्या अधिसूचनेमुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील रखडलेल्या विकासकामांना दिलासा मिळेल.

ठाणे खाडीच्या किनाऱ्यावरील भूखंड फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून आरक्षित आहे. देशभरातील अभयारण्ये आणि वन्यजीव संरक्षित क्षेत्रांच्या भोवतीच्या इको सेन्सेटिव्ह झोनबाबत केंद्रीय पर्यावरण विभागाकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेमुळे ठाणे येथील फ्लेमिंगो अभयारण्याच्या बाहेरील बांधकामांपुढेही मोठी समस्या निर्माण झाली होती. मुंबई, नवी मुंबई, ठाणे या परिसरातील नव्या-जुन्या विकासकामांना खीळ बसण्याची शंका व्यक्त केली जात होती. या अधिसूचनेबाबत राज्य सरकारने सुधारित आराखडा केंद्रीय पर्यावरण विभागाला पाठविला होता. या आराखड्यातील सूचनांनुसार योग्य ते बदल करून नवी अधिसूचना लवकरच जारी केली जाणार आहे.

संभ्रम मिटणार

इको सेन्सेटिव्ह झोनबाबत काढण्यात आलेल्या अधिसूचनेमुळे संभ्रमाचे वातावरण तयार झाले होते. यासाठीच केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून या गंभीर विषयाबाबत त्वरित नव्याने अधिसूचना काढण्याची विनंती केली. ही विनंती मान्य करत राज्य सरकारने पाठविलेल्या सूचनांचा अंतर्भाव करून लवकरच नवी अधिसूचना जाहीर करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्र्यांनी दिले आहे. यामुळे ठाणे, नवी मुंबई, मुंबई परिसरातील विकासकामांना दिलासा मिळाला आहे, असं खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितलं.

भांडूप येथे निसर्ग पर्यटन क्षेत्र

दरम्यान, महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानच्या नियामक मंडळाची चौथी बैठक नुकतीच पार पडली. कांदळवन प्रतिष्ठानतर्फे भांडुप पंपिंग स्टेशन नजीकचा ठाणे खाडीचा भाग निसर्ग पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्यात येत आहे. येथे माहिती फलक आणि दिशा दर्शक लावण्याचे काम सुरु आहे. निसर्ग प्रेमी आणि पक्षी निरीक्षकांचे हे आकर्षणाचे ठिकाण आहे. याठिकाणी पर्यटकांना जैवविविधतेचे महत्व आणि त्याअनुषंगिक माहिती पुरवण्यासाठी हे माहिती आणि दिशा फलक उपयुक्त ठरणार आहेत.

कांदळवन प्रतिष्ठानने सागरी व किनारी जैवविविधतेच्या संवर्धन कार्यात लक्षणीय काम करणाऱ्या व्यक्तींना कांदळवन प्रतिष्ठान पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याची, कोस्टवाईज उत्सवाच्या आयोजनाची माहिती देण्यात आली. याशिवाय कांदळवन प्रतिष्ठानसमवेत सुरु असलेल्या काही संशोधन प्रकल्पांना मंजुरी, अनुदानित प्रकल्पांना मुदतवाढ यासारखे निर्णयही नुकत्या झालेल्या बैठकीत घेण्यात आले.

 

संबंधित बातम्या:

शेतकऱ्यांना चिरडले, प्रियंका गांधींना रोखले, उद्याच्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये सहभागी व्हा; अशोक चव्हाण यांचं आवाहन

राष्ट्रवादीत सर्व रडे, तपास यंत्रणांची कारवाई होताच रडू लागतात; निलेश राणेंचा घणाघाती हल्ला

पहिल्यांदाच रेल्वेच्या एसी कोचमधून चॉकलेट आणि नूडल्सची डिलिव्हरी
(Thane Creek Flamingo Sanctuary new notification will release soon)