शाळेची उपहारगृह आता तुकाराम मुंढे यांच्या रडारावर… मध्यान्ह भोजन योजनेवरही करडी नजर… थेट इशारा
Tukaram Mundhe on School Canteen: तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवायांमुळे राज्यातील भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाचा धाक सगळीकडे दिसत आहेत. त्यात आता शाळेच्या मध्यान्ह भोजन योजनेसह उपहारगृह चालकांसाठीही मोठा इशारा देण्यात आला आहे.

Tukaram Mundhe on Mid Day Meals: आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाचा कारभार हाती घेताच या खात्याची ताकद दिसली. अन्न पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले. दूध भेसळांविरोधात, मिष्ठान्न आणि मिठाई तयार करणाऱ्यांचे पितळ उघडे पडले. राज्यभरात या खात्याने धडाधड धाडी घातल्या. त्यानंतर राज्याच्या दूध उत्पादनाचा आकडा थेट 25 टक्क्यांनी घसरला. अनेक बडी नावे भेसळीत समोर आली. हॉटेल चालकांचे धाबे दणाणले आहे. त्याचवेळी आता शाळांच्या उपाहारगृहांवर तुकाराम मुंढे यांची नजर वळली आहे. मध्यान्ह भोजन योजनाही रडारवर आली आहे. या योजनेतील भ्रष्टाचार यापूर्वी अनेकदा उघडकीस आला आहे. मध्यान्ह भोजन योजनेत अनेकदा विद्यार्थ्यांच्या जेवणात आळ्या सापडल्या, मेलेली माल आढळली आहे. या सर्व प्रकरणं पाहता आता विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना सोडले जाणार नसल्याचे समोर आले आहे. काय दिला अन्न आणि औषध प्रशासनाने इशारा?
मध्यान्ह भोजन योजना रडारवर
मध्यान्ह भोजन व शाळांमधील उपाहारगृहांच्या तपासणीसाठी अन्न औषध प्रशासन सरसावले आहे आता मुंबईतील खासगी शाळांमधील उपाहारगृहे तसेच मध्यान्ह भोजन पुरविणारे किचन शेड यांच्यावर एफडीएची करडी नजर असणार आहे. विभागाने मुख्याध्यापक, बचत गट, शिक्षणाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. मुंबईत विविध ठिकाणी शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक आणि बचत गट चालकांसोबत शुक्रवारी एक महत्त्वाची बैठक पार पडली.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ नको
अन्न सुरक्षा मानके अधिनियम २०२० ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने ही गतिमान कार्यवाही सुरू केली आहे. शालेय स्तरावर अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि विद्यार्थ्यांना सकस व संतुलित आहार मिळणे अत्यंत आवश्यक आहे. याचे पालन संबंधितांनी केले नाही, तर कठोर कारवाई करण्याचा इशारा या बैठकीत अन्न औषध प्रशासन विभागाचे साहाय्यक आयुक्त पी. आर. सिंगरवाड यांनी दिला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतही मोहीम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
स्टिंगवर बंदी
गेल्या आठवड्यात मंत्री नरहरी झिरवळ यांनी शाळेच्या 500 मीटर परीसरात स्टिंग पेयावर बंदी घातली. या परिसरात त्याच्या विक्रीला आळा घालण्यात आला. आमदार विक्रम पाचपुते यांनी या शीतपेयाविषयी मोठा प्रश्न उपस्थित केला होता. स्टिंग एक स्वस्त एनर्जी ड्रिंक आहे. त्याच्या लेबलवरच लहान मुलांच्या आरोग्यासाठी हे पेय धोकादायक असल्याचे म्हटले आहे. तरीही सर्रास या स्टिंगचा शाळा परिसरात विक्री होत असल्याचा प्रश्न पाचपुते यांनी उपस्थित केला होता. या एनर्जी ड्रिंकमध्ये कॅफेनचे अतिप्रमाण विद्यार्थ्यांसाठी घातक असल्याचे त्यांनी समोर आणले. त्यानंतर सरकारने शाळांच्या 500 मीटर परिसरात स्टिंग विक्रीस बंदी घातली आहे. तर अनेक शहरात अजूनही शाळा परिसरात अशा पेयांची विक्री होत असल्याचे ‘स्टिंग’मधून समोर आलेले आहे. त्यांच्यावर धडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.