नायर रुग्णालयातून चोरी झालेलं पाच दिवसांचं बाळ सापडलं

| Updated on: Jun 14, 2019 | 9:50 AM

नायर रुग्णालयातून चोरी झालेलं पाच दिवसांच्या नवजात बाळाचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. चोरी झाल्याच्या अवघ्या सहा तासांत आग्रीपाडा पोलिसांनी या बाळाचा शोध लावला आहे.

नायर रुग्णालयातून चोरी झालेलं पाच दिवसांचं बाळ सापडलं
Follow us on

मुंबई : नायर रुग्णालयातून चोरी झालेलं पाच दिवसांच्या नवजात बाळाचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. चोरी झाल्याच्या अवघ्या सहा तासांत आग्रीपाडा पोलिसांनी या बाळाचा शोध लावला आहे. नायर रुग्णालयातून गुरुवारी (14 जून) सायंकाळी साडे पाचच्या सुमारास एका अज्ञात महिलेने या बाळाला पळवलं होतं. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आणि अवघ्या सहा तासांत हे बाळ शोधून त्याला त्याच्या पालकांकडे सोपवलं.

मुंबईतील नायर रुग्णालयायतील वॉर्ड क्रमांक सातमध्ये ही घटना घडली होती. शितल साळवी असं या बाळाच्या मातेचं नाव आहे. दहिसर येथे राहणाऱ्या शितल यांनी पाच दिवसांपूर्वी नायर रुग्णालयात एका बाळाला जन्म दिला. त्यांची प्रसुती सिझेरिअन पद्धतीने झाली होती, त्यामुळे त्यांना रुग्णालयातच ठेवण्यात आलं होतं. गुरुवारी सांयंकाळी जेव्हा शितल या झोपलेल्या होत्या, तेव्हा एक अज्ञात महिला या वॉर्डात आली. तिने हळूच बाळाला उचललं आणि कुणाला कळायच्या आत ती बाळाला घेऊन फरार झाली.

ही महिला बाळाला घेऊन जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या प्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात 363 अंतर्गत म्हणजेच अपहरणाचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. पोलिसांना रात्री उशिरा सांताक्रूजच्या एका रुग्णालयात हे बाळ असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी बाळाच्या वडिलांना बोलावून बाळाची ओळख पटवली आणि बाळाला सुखरुप त्याच्या आई-वडिलांकडे सोपवलं.

बाळ पळवणाऱ्या महिलेचीही ओळख पटल्याचं सांगितलं जात आहे. कारण संबंधित महिला सकाळपासूनच हॉस्पिटलमध्ये वावरत होती. तिने बाळ पळवलं ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये चित्रित झालं आहे. त्या वॉर्डची जबाबदारी असलेल्या सुरक्षा रक्षकांवर कारवाई करण्याची कारवाई सध्या सुरु असल्याची माहिती आहे.

एकीकडे बाळ सापडल्याने कुटुंब आनंदी आहे, तर दुसरीकडे रुग्णालय प्रशासनाने निष्काळजीपणा दाखवल्याने ही घटना घडल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. रुग्णालयात अनेक सुरक्षा रक्षक आहेत, वॉर्डात नर्स, डॉक्टर असूनही बाळ चोरी कसं झालं, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तर एवढ्या मोठ्या रुग्णालयातून बाळ चोरीला गेल्याने रुग्णालयात एकच खळबळ उडाली होती. शिवाय रुग्णांची चिंता देखील वाढली आहे.

सध्या बाळाचा शोध लागला आहे. मात्र, या प्रकरणामुळे  नायर रुण्गालय पुन्हा एकदा वादात अडकलं आहे. गेल्या महिन्यात याच रुग्णल्यातील डॉक्टर पायल तड़वीने सिनियर डॉक्टरांच्या छळाला कटांळून आत्महत्या केली होती.