Maharashatra News Live : रस्त्याचं काम पूर्ण न झाल्यास निलंबन करेन, शिंदेंचा अधिकाऱ्यांना दम

Maharashtra News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashatra News Live : रस्त्याचं काम पूर्ण न झाल्यास निलंबन करेन, शिंदेंचा अधिकाऱ्यांना दम
| Edited By: | Updated on: Sep 26, 2025 | 8:11 PM

परतीच्या पावसाच्या मोगलाईने राज्यात धुमाकूळ घातला आहे. अतिवृष्टीने मराठवाड्यासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वेठीस धरलं आहे. लाखो हेक्टरवरील खरीप पीक वाहून गेलंय तर जमीनही खरडून गेली आहे. मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ बांधावर आलंय. पण नुकसान भरपाईची मदत तुटपूंजी असल्याचा आरोप होत आहे. उद्धव ठाकरे यांनी काल मराठवाड्यात ठिकठिकाणी नुकसानग्रस्तांची भेट घेतली. आजही राज्यातील अनेक भागात कोसळधार पडण्याची शक्यता आहे.यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 26 Sep 2025 07:58 PM (IST)

    जालना जिल्ह्यात मंत्री उदय सामंतांकडून पीक नुकसानीची पहाणी

    जालना जिल्ह्यात आज मंत्री उदय सामंत यांनी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीची पहाणी केली, तसेच त्यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं आमची जबाबदारी आहे, असं यावेळी बोलताना मंत्री सामंत यांनी म्हटलं आहे.

  • 26 Sep 2025 07:47 PM (IST)

    नाशिकच्या देवळालीत दहशत माजविणाऱ्या कोयता गँगची पोलिसांनी काढली धिंड

    नाशिकच्या देवळालीत दहशत माजविणाऱ्या कोयता गँगची पोलिसांनी काढली धिंड

    कोयत्याचा धाक दाखवून मटन विक्रेत्याला मारहाण करत पैशाची केली होती लूट

    कोयत्याचा धाक दाखवून लूट करत असल्याचा स्वतःच काढला होता व्हिडिओ

    व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांची कारवाई

    जिथे लुटलं तिथेच पोलिसांनी काढली धिंड, शिकवला धडा

  • 26 Sep 2025 07:21 PM (IST)

    नांदेड जिल्ह्यात शनिवारी पावसाचा ऑरेंज अलर्ट

    नांदेड जिल्ह्यात उद्या हवामान विभागाच्या वतीने पावसाचा ऑरेंज अलर्ट

    खबरदारी म्हणून नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर

    नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आदेश

    नांदेड जिल्ह्यातील काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा

  • 26 Sep 2025 07:12 PM (IST)

    आज शिवसेना भवनात हळदीकुंकू समारंभाचं आयोजन

    आज शिवसेना भवन येथे हळदीकुंकू समारंभाचं आयोजन

    शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या वतीने आयोजन

    हळदीकुंकू समारंभाला रश्मी ठाकरे यांची विशेष उपस्थिती

    मोठ्या प्रमाणात महिला होणार सहभागी

  • 26 Sep 2025 06:53 PM (IST)

    वर्ध्यातील प्रवाशांसाठी लागोपाठ दुसरी अमृत भारत एक्स्प्रेस सुरु होणार

    वर्ध्यातील प्रवाशांसाठी लागोपाठ दुसरी अमृत भारत एक्स्प्रेस सुरु होणार आहे. 27 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या हस्ते या गाडीचा शुभारंभ होणार आहे. फडणवीसांनी मोदी आणि रेल्वेमंत्र्यांचे आभार मानले.

  • 26 Sep 2025 06:46 PM (IST)

    कोथरुड गोळीबार प्रकरणी घायवळ टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई

    कोथरुड गोळीबार प्रकरणी घायवळ टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. निलेश घायवळच्या अटकेसाठी पुणे पोलिसांकडून लूक आऊट नोटीस जारी केली आहे. निलेश घायवळ लंडनमध्ये गेल्याची माहिती मिळत आहे.

  • 26 Sep 2025 06:35 PM (IST)

    बीडमध्ये गोट्या गित्तेवर पुन्हा मकोका लावला

    परळीतील सहदेव सातभाई यांनी मारहाणप्रकरणी फिर्याद दिली होती. काही दिवसांपूर्वी गोट्या गित्तेसह पाच जणांवरील मकोका हटवण्यात आला होता. बीड पोलिसांनी मकोका कारवाई करण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता. डीजीनी मकोका लावण्याची परवानगी दिली आहे.

  • 26 Sep 2025 06:26 PM (IST)

    सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश भूषण गवई नाशिकमध्ये दाखल

    सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश भूषण गवई नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.  स्वागतासाठी नाशिक बार असोसिएशनचे वकील , वकील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.  पोलीस आयुक्त , नाशिक जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश यांचीही उपस्थिती होती.  उद्या नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाच्या सात मजली इमारतीचे भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

  • 26 Sep 2025 06:19 PM (IST)

    रस्त्याचं काम पूर्ण न झाल्यास निलंबन करेन, शिंदेंचा अधिकाऱ्यांना दम

    ठाणे जिल्ह्याच्या नियोजन बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दम दिला. रस्त्याचं काम पूर्ण होत नसेल तर निलंबित करेन, असा सज्जड दम एकनाथ शिंदे यांनी दिला.

  • 26 Sep 2025 06:04 PM (IST)

    बरेली निदर्शनांबाबत कठोर कारवाई केली जाईल: मंत्री राठोड

    उत्तर प्रदेशातील बरेली येथे झालेल्या “आय लव्ह मोहम्मद” निदर्शनांबाबत उत्तर प्रदेशचे मंत्री जेपीएस राठोड म्हणाले, “यामागील लोकांवर कठोर कारवाई केली जाईल. राज्यातील वातावरण बिघडवू कोणालाही परवानगी दिली जाणार नाही.”

  • 26 Sep 2025 05:50 PM (IST)

    नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी वसईत दुर्दैवी घटना घडली

    नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी वसईत दुर्दैवी घटना घडली आहे. गरबा खेळताना 45 वर्षीय महिलेचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

  • 26 Sep 2025 05:40 PM (IST)

    चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 42 हजार रुपयांवर पोहोचले

    गेल्या 24 तासात चांदीच्या दरात तब्बल 3 हजार 500 रुपयांनी वाढ झाली आहे. चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 42 हजार रुपयांवर पोहोचले आहेत.

  • 26 Sep 2025 05:25 PM (IST)

    रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात लाकडी होड्या सोडत आंदोलन

    पंढरपूरातील विठ्ठल मंदिराकडे जाणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने भाविक व नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याने महर्षी वाल्मीक संघ आक्रमक झाला आहे. खड्ड्यात थेट लाकडी होड्या सोडत महर्षी वाल्मीक संघाने आंदोलन सुरु केले आहे.

  • 26 Sep 2025 05:14 PM (IST)

    अमरावतीमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात

    अमरावती शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. 28 तारखेपर्यंत विदर्भासह अमरावती जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

  • 26 Sep 2025 04:53 PM (IST)

    डोंबिवली: काँग्रेस पदाधिकाऱ्याला साडी नेसवल्याप्रकरणी भाजपच्या 15 जणांविरोधात गुन्हा दाखल

    डोंबिवलीत काँग्रेस पदाधिकारी मामा पगारे यांना साडी नेसवण्यात आली होती. याप्रकरणी आता भाजपच्या १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता पुन्हा डोंबिवलीत काँग्रेस विरुद्ध भाजप आमनेसामने आले आहेत.

  • 26 Sep 2025 04:42 PM (IST)

    धाराशिव: जिल्हाधिकाऱ्यांच्या डान्सच्या व्हिडिओनंतर शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक

    तुळजापूरच्या सांस्कृतिक महोत्सवात जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजा आणि निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी डान्स केला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, धाराशिव मध्ये शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी सारखे संकट आले असताना जिल्हाधिकाऱ्यांनी डान्स करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणे असं या शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.

  • 26 Sep 2025 04:27 PM (IST)

    अमरावती: माजी आमदार वीरेंद्र जगताप यांचा नांदगाव तहसील कार्यालयावर मोर्चा

     

    अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान झाल्याने अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर मध्ये काँग्रेसचे माजी वीरेंद्र जगताप आमदार आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज नांदगाव तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढत राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि शेतकऱ्यांना सरसकट 50 हजार रुपये अनुदान देण्याची मागणी केली.

  • 26 Sep 2025 04:12 PM (IST)

    मीरा रोड: ज्येष्ठ नागरिकाने रुळावर उडी घेत संपवलं जीवन

    मिरा रोड रेल्वे स्टेशनवर आज दुपारी 1 वाजता एका जेष्ठ नागरिकाने विरार वरून चर्चगेट कडे जाणाऱ्या रेल्वे गाडीसमोर फ्लॅट फॉर्म नंबर 4 वरील पटरिवर उडी मारून आत्महत्या केली. घटनास्थळी रेल्वे पोलीस तात्काळ दाखल झाले आणि पुढील तपास करत आहेत. या मृत व्यक्तीची ओळख स्पष्ट झालेली नाही.

  • 26 Sep 2025 03:52 PM (IST)

    नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याबाबत केंद्राची भूमिका काय? फडणवीस म्हणाले…

    नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव द्यावं, ही मागणी गेल्या अनेक वर्षांची आहे.या मागणीसाठी भूमिपूत्र आगरी समाजाकडून आतापर्यंत अनेकदा आंदोलनं करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यातील पूरस्थिती आणि इतर विषयांवर चर्चा केल्यानंतर माध्यमांसह संवाद साधला. फडणवीस यांनी या दरम्यान नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याबाबत केंद्र सरकारची भूमिका काय आहे हे स्पष्ट केलं. नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याबाबत केंद्र सरकारही सकारात्मक असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

  • 26 Sep 2025 03:44 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र दौरा, तारीखही ठरली, मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

    पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या काही दिवसात महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यात पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या पार्श्वभूमीवर भरीव मदतीसाठी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना राज्य सरकारच्यावतीने निवेदन दिलं. यावर मोदींनी मदतीचं आश्वासन दिल्याचं फडणवीस यांनी म्हटलं. मात्र पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मोदींचा दौरा होणार नसल्याचंही फडणवीस यांनी नमूद केलं. पंतप्रधान ऑक्टोबर महिन्यातील 8 आणि 9 तारखेला महाराष्ट्र दौऱ्यावर असणार असं फडणवीस यांनी सांगितलं.

  • 26 Sep 2025 03:37 PM (IST)

    पंतप्रधान मोदींकडून पूरग्रस्त भागासाठी मदतीचं आश्वासन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पूरस्थितीबाबत निवदेन दिलं आहे. मोदींना राज्यातील पूरस्थितीची कल्पना दिली आहे. एनडीआरएफच्या मदतीने भरीव निधीची मागणी केली आहे. यावर मोदींनी मदतीचं आश्वासन दिलंय”, अशी माहिती देवंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांसह झालेल्या चर्चेनंतर माध्यमांसह बोलताना दिली.

  • 26 Sep 2025 03:13 PM (IST)

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एक तास चर्चा

    राज्यातील पूरस्थितीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीदौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एक तास चर्चा झाल्याचं समोर आलं आहे. राज्य सरकारकडून केंद्र सरकारला आर्थिक मदतीसाठी निवदेन देण्यात आलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची तासभरापेक्षा अधिक वेळ पंतप्रधानांसह चर्चा झाल्याचं म्हटलं जात आहे. अशात आता केंद्र सरकारकडून राज्यासाठी किती पॅकेज जाहीर केलं जातं, याकडे लक्ष असणार आहे.

  • 26 Sep 2025 03:08 PM (IST)

    ठाण्यातील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला सुरुवात

    ठाण्यातील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत आहे. या बैठकीला खासदार श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के आणि बाळ्या मामा उपस्थित आहे.

    तसेच मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, बालाजी किणीकर, किसन कथोरे, कुमार एलानी ,राजेश मोरे आणि इतर आमदार उपस्थित आहेत. मात्र अजून जितेंद्र आव्हाड आलेले नाहीत. तसेच वनमंत्री गणेश नाईक देखील आलेले नाहीत.

  • 26 Sep 2025 02:53 PM (IST)

    बुलढाणा : ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचा डीपीडीसीमध्ये घुसण्याचा प्रयत्न

    शिवसेनाचा कार्यकर्त्याने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर चढण्याचा प्रयत्न केला. ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50 हजार रुपये मदत देण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले आहे.

  • 26 Sep 2025 02:42 PM (IST)

    जालनात धनगर समाजाच्या उपोषण स्थळी मंत्री उदय सामंत यांची भेट

    जालना येथे सुरू असलेल्या धनगर समाजाच्या उपोषण स्थळी मंत्री उदय सामंत यांनी भेट दिली आहे.उपोषणकर्ते दीपक बोराडे यांच्याशी सामंत यांनी चर्चा केली आहे.दीपक बोराडे यांच्या आमरण उपोषणाला आजचा 10 दिवस आहे.

  • 26 Sep 2025 02:31 PM (IST)

    माजी खासदार राजन विचारे सह कुटुंब टेंभी नाक्यावरील दुर्गेश्वरीच्या दर्शनाला…

    दरवर्षीप्रमाणे यंदाही पंचमीच्या दिवशी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे हे टेंभीनाका येथील देवीच्या पूजेसाठी उपस्थित आहेत. भक्तिभावाने देवीची पूजा अर्चा विचारे परिवाराकडून केली जात आहे

  • 26 Sep 2025 02:18 PM (IST)

    न भुतो न भविष्यती अशी राज्यात परीस्थिती – राधाकृष्ण विखे पाटील

    न भुतो न भविष्यती अशी राज्यात परीस्थिती असून राज्यात आलेल्या आपत्तीत शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे,

    म्हणून सर्व परीस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेतला जाईल असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

     

  • 26 Sep 2025 02:06 PM (IST)

    आरोपींची पुणे पोलीसांनी धिंड काढली

    पुण्यात सध्या घरफोडी, वाहन तोडफोडीच्या घटना घडत आहेत.हडपसर पोलिसांनी अशा एका घटनेतील आरोपींना पुण्यातील हडपसर गुडघ्यावर बसवून धिंड काढली आहे.

  • 26 Sep 2025 01:57 PM (IST)

    पुणे पोलिसांनी आरोपीला नावाप्रमाणे गुडघ्यावर आणलं

    पुण्यात सध्या घरफोडी, वाहन तोडफोडीच्या घटना घडत आहेत. अशा एका घटनेतील आरोपींना पोलिसांनी अगदी नावाप्रमाणे “गुडघ्यावर” आणलं. पुण्यातील हडपसर परिसरात काही दिवसांपूर्वी घरफोडीचा प्रकार झाला होता तसेच काही मोक्का अंतर्गत कारवाई केलेल्या गुन्हेगारांनी सुद्धा हैदोस घातला होता अशा गुन्हेगारांना पकडून पोलिसांनी त्यांची “वरात” काढली. पुण्यातील हडपसर भागात ठिकाणी या आरोपींनी दहशत निर्माण होईल असे कृत्य केले तिथून या आरोपींचा गुडघ्यावर बसवून त्यांची धिंड हडपसर पोलिसांनी काढली.

  • 26 Sep 2025 01:54 PM (IST)

    शिक्षक निवडणूक, भाजपाची आढावा बैठक

    आगामी शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत भाजपाची आढावा बैठक सुरू. अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित.पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. त्या अनुषंगाने भाजपची आढावा बैठक पार पडत आहे. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूल मंत्री तथा अमरावती जिल्हा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पाच जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी हजर.

  • 26 Sep 2025 01:48 PM (IST)

    मोटर सायकल-डंपरचा अपघात, एकाच कुटुंबातले तीन जण ठार

    मुक्ताईनगरच्या पूर्णाड फाट्यावर मोटर सायकल डंपरचा अपघात. अपघातात एकाच कुटुंबातले तीन जण ठार तर एक गंभीर. डंपरने अपघातात तीन जणांना चिरडले. एकाच कुटुंबातले तीन जण ठार तर एक गंभीर जखमी आहे. पती-पत्नी मुलगी घटनेत ठार. संसार उध्वस्त.घटनेने नागरिकात तीव्र संताप. काही काळ तणावाचं वातावरण.

  • 26 Sep 2025 01:28 PM (IST)

    सतीश उर्फ खोक्या भोसलेला जामीन मंजूर

    सतीश उर्फ खोक्या भोसले याने एका तरुणाला बॅटने मारहाण केलेल्या प्रकरणात न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला.बुलढाणा जिल्ह्यातील कैलास वाघ याला बॅटने मारहाण केल्याचा प्रकार सोशल माध्यमावर व्हायरल व्हिडिओतून समोर आला होता. चकलांबा पोलिस ठाण्यात या प्रकरणी खोक्या विरोधात गुन्हा दाखल होता. दरम्यान आता बीड जिल्हा सत्र न्यायालयाने खोक्याला चार महिन्यानंतर जामीन मंजूर केला.

  • 26 Sep 2025 01:13 PM (IST)

    पुण्यात काँग्रेसला धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसचा फायदा

    पुण्यात काँग्रेसला धक्का. रोहन सुरवसे यांचा कार्यकर्त्यांसह अजित दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. काँग्रेसच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा देऊन रोहन सुरवसे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आज पक्ष प्रवेश केला. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार उपस्थित होते .

  • 26 Sep 2025 12:54 PM (IST)

    बीड येथील पत्रकार ढाका यांच्या मुलाच्या खून प्रकरणात मुख्य आरोपीला अटक

    बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात काल रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पत्रकार देवेंद्रसिंग ढाका यांच्या यश ढाका या 20 वर्षीय मुलाच्या छातीत धारदार शस्त्राने वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात आरोपी सुरज आप्पासाहेब काटे याला बीडच्या शिवाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

  • 26 Sep 2025 12:38 PM (IST)

    मुक्ताईनगरच्या पूर्णाड फाट्यावर डंपर मोटरसायकलचा भीषण अपघात, 3 ठार

    मुक्ताईनगर जळगाव –  मुक्ताईनगरच्या पूर्णाड फाट्यावर डंपर मोटरसायकलचा भीषण अपघात, 3 जण जागीच ठार झाले. तर  8 वर्षाची मुलगी गंभीर जखमी आहे.  घटनेच्या ठिकाणी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली असून नागरिक संतप्त झाले आहेत. संतप्त जमावाने डंपर पेटवलं, तातडीने कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे.

  • 26 Sep 2025 12:21 PM (IST)

    अमरावातीत शेतकरी मोर्चादरम्यान काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, रवींद्र चव्हाण यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

    अमरावतीमध्ये आज काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला होता. याचदरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा ताफा शहरातून जात असताना काँग्रेसचे कार्यकर्ते अचानक आक्रमक झाले. तीव्र संताप व्यक्त करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी रवींद्र चव्हाण यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर, आंदोलकांनी भाजपचे खासदार अनिल बोंडे यांच्या वाहनावर सोयाबीनचे झाड फेकून आपला रोष व्यक्त केला, ज्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजप सरकारला धारेवर धरण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी हा आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून आले.

  • 26 Sep 2025 12:12 PM (IST)

    यवतमाळमध्ये शेतकरीपुत्र आक्रमक; नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग रोखला

    यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या अतिपावसामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग पूर्णपणे मेटाकुटीस आला आहे. याच नुकसानीची दखल घेत तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि झालेल्या नुकसानीपोटी हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी, या मुख्य मागणीसाठी यवतमाळमध्ये शेतकरी आणि त्यांचे पुत्र आता रस्त्यावर उतरले आहेत. यवतमाळ तालुक्यातील मंगरूळ साखर कारखान्याजवळ या आक्रमक शेतकरीपुत्रांनी एकत्र येत नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. आंदोलकांनी केलेल्या या रास्ता रोकोमुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला असून, जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत माघार न घेण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

  • 26 Sep 2025 12:06 PM (IST)

    ओल्या दुष्काळासाठी आंदोलन; पण सरकारी कामात अडथळा, अमरावतीत ठाकरे गटाचे 25 कार्यकर्ते गोत्यात

    अमरावतीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक झालेल्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर आणि कार्यकर्त्यांवर आता कायदेशीर कारवाईची टांगती तलवार आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि एक रुपयाचा पीक विमा तातडीने सुरू करण्याची मागणी करत ठाकरे गटाने तीव्र आंदोलन केले होते. मात्र, याच आंदोलनादरम्यान ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख पराग गुडधे आणि त्यांच्या सुमारे २५ कार्यकर्त्यांविरुद्ध गाडगे नगर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा कृषी अधीक्षक राहुल सातपुते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आंदोलकांनी सोयाबीन आणि कपाशीचे झाड कार्यालयात आणून ते कृषी अधीक्षकांच्या अंगावर फेकले होते. यामुळे त्यांच्याविरुद्ध दंगा भडकवणे (Riot) आणि सरकारी कामात अडथळा निर्माण करणे यांसारखे गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

  • 26 Sep 2025 11:52 AM (IST)

    आता आपल्यालाच पांघरुन घालायचे, अजित पवारांचे विधान

    मला आता जास्त वेळ राज्यात द्यावा लागणार आहे, फिरावं लागणार आहे. तुमच्यावर महत्त्वाची जाबदाबदरी असणार आहे, ती नीट पार पाडा.  मागचा अजित पवार आणि आत्ताच अजित पवार लय मोठा फरक आहे माझ्याकडे यायला संकोच करू नका, असे आवाहन अजित पवार यांनी केले. जसं वय वाढतं तसं फरक होतो वय वाढलं की मॅच्युरिटी येते. आपण आधी काही केलं तर आपल्याला पांघरून घालायला साहेब असायचे आता आपल्यालाच पांघरून घालायचा आहे, असेही अजित पवार म्हणाले.

  • 26 Sep 2025 11:40 AM (IST)

    प्रदीप शर्मा यांनी घेतली राज ठाकरेंची भेट, अभिजीत पानसेही उपस्थित

    एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. मनसे नेते अभिजीत पानसे हे प्रदीप शर्मांच्या जीवनावर आधारित चित्रपट करणार आहेत. त्याच निमित्ताने ही भेट झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • 26 Sep 2025 11:32 AM (IST)

    सप्टेंबरमधील नुकसानीसाठी एक रुपयाही नाही – कैलास पाटील

    आमदार कैलास पाटील यांनी धाराशिव जिल्ह्यात पूरस्थिती असताना जिल्हाधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या बेजबाबदार वर्तनावर टीका केली. पंचनामे अपूर्ण असताना अधिकाऱ्यांचे वर्तन चुकीचे आहे. त्यांनी अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. शासनाने ऑगस्टच्या नुकसानीसाठी मदत दिली, पण सप्टेंबरमधील नुकसानीसाठी एक रुपयाही अजून दिला नाही, असे कैलास पाटील म्हणाले

  • 26 Sep 2025 11:19 AM (IST)

    बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या, अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणा कंटाळून उचलले टोकाचे पाऊल

    सोलापूर: अतिवृष्टीमुळे झालेले पिकांचे नुकसान आणि वाढत्या कर्जबाजारीपणाला कंटाळून बार्शी तालुक्यात २४ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये, बार्शी तालुक्यातील दहिटणे गावातील शेतकरी लक्ष्मण काशिनाथ गवसाने यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. तसेच, तालुक्यातील कारी गावातील शेतकरी शरद भागवत गंभीर यांनीदेखील कर्ज आणि नुकसानीमुळे आलेल्या नैराश्यातून गळफास घेऊन टोकाचे पाऊल उचलले.

     

  • 26 Sep 2025 11:14 AM (IST)

    मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जाऊन नुसते येऊ नये, केंद्राकडून ठोस मदत मिळवावी, काँग्रेस नेत्याची मागणी

    कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावरून केंद्राकडे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी भरीव मदतीची मागणी केली आहे. अतिवृष्टीमुळे राज्यातील अंदाजे ५० लाख हेक्टर जमीन खरडून गेली असून, पिके पूर्णपणे वाया गेली आहेत. त्यामुळे, मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जाऊन नुसते येऊ नये, तर केंद्राकडून ठोस मदत मिळवावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. “केंद्रापुढे लोटांगण घाला पण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी पुढे या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत किती किंमत आहे, हे केंद्राच्या मदतीवरून आम्हाला कळेल,” असे वडेट्टीवार म्हणाले. त्यांनी पंजाब सरकारने दिलेल्या ५० हजार रुपये प्रति हेक्टर मदतीप्रमाणेच महाराष्ट्र सरकारनेही शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी केली, तसेच ‘लाडक्या बहिणी’चे कारण सांगून शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडण्याचे आवाहन केले.

  • 26 Sep 2025 10:57 AM (IST)

    अंधेरीतील लोखंडवाला येथे न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन

    कबुतरांमुळे होणाऱ्या आजाराच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने त्यांना दाणे टाकण्यास बंदी घातली आहे…तरीही लोखंडवालाच्या बॅकरोडवर कबुतरांना उघडपणे दाणे टाकले जात आहे आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. जवळपास राहणारे लोक दररोज येथे कबुतरांना खायला घालतात, तरीही कोणतीही कारवाई केली जात नाही.

  • 26 Sep 2025 10:45 AM (IST)

    धाराशिव जिल्हा संकटात असताना जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार मात्र नाच गाण्यात व्यस्त

    24 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील नागरिक संकटात असतानाच तुळजापुरातील एका कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी केला डान्स… जिल्ह्यातील लाखो हेक्टरवरील पिके धोक्यात शेतकरी अडचणीत असताना जिल्हाधिकाऱ्यांचे मात्र बेजबाबदार वर्तन… जिल्हाधिकाऱ्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार वायरल… शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असताना जिल्हाधिकारी डान्स करत असल्याने नेटकऱ्यांकडून जिल्हाधिकारी जोरदार ट्रोल…

  • 26 Sep 2025 10:35 AM (IST)

    27 ते 29 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्याना रेड अलर्ट

    नांदेड, लातूर, पुणे, धाराशिव, चंद्रपूर, यवतमाळ, अहिल्यानगर, हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा, बीड, परभणी, मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आदी जिल्ह्यांना रेड अलर्ट… गरज असल्यासच नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे सरकारचे आवाहन…

  • 26 Sep 2025 10:26 AM (IST)

    पंजाबमध्ये शेतकऱ्यांना 50 हजार हेक्टरी मदत – संजय राऊत

    पंजाबमध्ये शेतकऱ्यांना 50 हजार हेक्टरी मदत… पुन्हा कर्जमाफी झाली नाही तर, जगणं कठीण होईल, शेतकरी म्हणाले… पैशांचं सोंग आणता येत नाही, असं डीसीएम म्हणतात… PM केअर फंडातून शेतकऱ्यांनी कर्जमुक्त करा… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

  • 26 Sep 2025 10:01 AM (IST)

    वराई तालुक्यातील म्हाळसपिंपळगाव येथील पुलावर पाणी

    शाळेतील विद्यार्थ्यांना पाण्यातून शाळेत जाण्यासाठी काढावी लागतेय वाट. म्हाळसपिंपळगाव येथील अनेक विद्यार्थी गंगावाडी येथे दररोज शाळेत जातात. सध्या बीड जिल्ह्यात अतिवृष्टीने पूरस्थिती निर्माण झाली असल्याने अनेक नद्यांना पाणी आहे.

  • 26 Sep 2025 09:29 AM (IST)

    जिल्हाधिकाऱ्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल

    धाराशिव जिल्हा संकटात असताना जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार मात्र नाच गाण्यात व्यस्त. 24 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील नागरिक संकटात असतानाच तुळजापुरातील एका कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी केला डान्स

     

     

  • 26 Sep 2025 09:23 AM (IST)

    सरकारने शेतकऱ्यांची मदत करावी-जयंत पाटील

    पावसामुळे मोठे नुकसान शेतकऱ्यांचे झाले असून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, असे जयंत पाटील यांनी नुकताच म्हटले.

  • 26 Sep 2025 09:07 AM (IST)

    धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी मध्ये, दोन लाख 26 हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान

    धाराशिव जिल्ह्यामध्ये मागील दोन चार दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील दोन लाख 26 हजार 706 हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे. तर 363 गावातील एक लाख 98 हजार 375 शेतकरी या अतिवृष्टीमध्ये बाधित झाले आहेत. 207 जनावरांचा देखील या पूर परिस्थितीमध्ये मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलीय.

  • 26 Sep 2025 09:00 AM (IST)

    जिल्ह्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीत तुळजाभवानी मंदिर संस्थांनी मदत करावी

    धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तुळजाभवानी मंदिर संस्थाने मदत करावी यापूर्वी जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती आल्यावर तुळजाभवानी मंदिर संस्थाने पुढाकार घेतला होता तसाच आताही जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी पाहता अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत त्यांना मंदिर संस्थांनी मदत करावी अशा मागणीचे निवेदन माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी धाराशिव चे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांना दिले आहे

  • 26 Sep 2025 08:55 AM (IST)

    150 जणांची 20-25 कोटींची फसवणूक

    शेअर मार्केट मधून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून दीडशेहून अधिक नागरिकांची वीस ते पंचवीस कोटींची फसवणूक करण्यात आली. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून जवळपास दीडशे हून अधिक नागरिकांची फसवणूक करून त्यांच्याकडून जवळपास 20 ते 25 कोटी रुपये उकळल्याचा प्रकार पिंपरी चिंचवड शहरातील सायबर पोलिसांनी उघडकीस आणला आहे.

  • 26 Sep 2025 08:43 AM (IST)

    बॅटरी चोरांचा धुमाकूळ

    पिंपरी चिंचवड शहरातील चिखली मध्ये बॅटरी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.रातोरात तब्बल 10 चारचाकी गाड्यांच्या बॅटरींची चोरी करण्यात आली आहे.त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. या भागामध्ये पोलिसांची रात्र गस्त करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत. रातोरात दहा बॅटरी चोरीला गेल्यामुळे वाहन चालकांच मोठ आर्थिक नुकसान झाल आहे. मध्यरात्री एकच्या नंतर या सर्व बॅटरी चोऱ्या झाल्या आहेत.

  • 26 Sep 2025 08:34 AM (IST)

    कल्याण स्कायवॉक गोरखधंद्यांचा अड्डा

    फेरीवाल्यांपासून वेश्याव्यवसायापर्यंत सर्वांचाच कब्जा असल्याने प्रवाशी हैराण झाले आहेत. एकीकडे स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा कब्जाने प्रवासाचे पादचाऱ्यांना चालणं मुश्किल झालं आहे. तर दिवसाढवळ्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलां, भिकारी, तृतीयपंथी, गर्दुल्ले याचा वावर दिसत आहे. महिला प्रवाशी असुरक्षित झाल्या आहेत.

  • 26 Sep 2025 08:23 AM (IST)

    पिंपरी-चिंचवडमध्ये ५ लाख मतदार वाढले

    महापालिकेच्या निवडणुकीकरिता प्रारूप प्रभाग रचना अंतिम मान्यतेसाठी राज्य शासनाला सादर केली आहे. महापालिका निवडणुकीसाठी २०१७ मध्ये ११ लाख ९२ हजार ८९ मतदारसंख्या होती.आठ वर्षात ५ लाख १६ हजार ६९८ मतदार वाढले आहेत. शहरातील लोकसंख्येत झालेली वाढ आणि नवमतदारांमुळे मतदारसंख्येत भर पडल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.

  • 26 Sep 2025 08:13 AM (IST)

    पुण्यात विषाणूजन्य आजारात वाढ

    शहरात गेल्या काही दिवसांपासून विषाणूजन्य आजारांचा जोर वाढलेला दिसून येत आहे.तज्ञांचे निरीक्षण,रुग्णांमध्ये ताप, सर्दी, खोकला थकव्याचे लक्षणं दिसत आहेत. ताप, सर्दी, खोकला अंगदुखी आणि थकवा अशी लक्षणे मोठ्या प्रमाणात रुग्णांमध्ये दिसत आहेत. पावसाळी वातावरणामुळे हवेत आद्रता वाढल्याने उन्हाचा अभाव यामुळे विषाणूंचा प्रादुर्भाव होण्यास पोषक परिस्थिती निर्माण झाले आहे. त्यामुळे दवाखाने व रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढलेली आहे

  • 26 Sep 2025 08:10 AM (IST)

    उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर

    आज सकाळीपासून अजित पवार पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये अधिकाऱ्यांची बैठक घेत आहेत. सर्किट हाऊसमधील बैठक संपल्यानंतर अजित पवार पक्ष कार्यालयात जातील.