
TV9च्या कॉनक्लेव्हमधून फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदावरुन बोचरी टीका केली. शरद पवारांच्या डोक्यात 2-3 चेहरे आहेत, त्यात उद्धव ठाकरेंचा चेहरा नाही, असं फडणवीस म्हणाले. त्यावरुन सामनाच्या संपादकीय म्हणून फडणवीसांनी शाब्दिक बाण सोडण्यात आलेत.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं एकत्र येऊन कोणत्याही एका चेहऱ्यास पसंती द्यायची आणि शिवसेनेनं समर्थन करायचे असा खुला हिशेब उद्धव ठाकरे यांनी सांगितला. तरीही फडणवीस हे महाविकास आघाडीचा चेहरा उद्धव ठाकरे नसतील अशी बासुंदी उधळत आहेत. पण स्वत:च्या महायुती वगैरे बाबत मात्र ते सांगतात की,मुख्यमंत्रिपदाचा चेहरा विधानसभा निवडणुकीनंतरच ठरवू. विधानसभा निवडणूक मिंध्यांच्याच नेतृत्वाखाली लढणार परंतू नंतर मुख्यमंत्री कोण होणार हे सांगू शकत नाही. यांच्याच बुडाखालची स्थिती ही असताना हे महाशय दुसऱ्यांचे बूड का खाजवत बसले आहेत.
आमदारांच्या संख्याबळाच्या आधारावर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवू नका, असं उद्धव ठाकरे म्हणालेत. त्यातून अंतर्गत पाडापाडी होणार, असं सांगताना ठाकरेंनी भाजपसोबतच्या युतीवर बोट ठेवलं होतं. आता, सामनातून संजय राऊतांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंवरच टीका केलीय. शिवसेनेचे आमदार कसे होतील हीच गोपीनाथ मुंडेंची कार्यशैली होती, असा आरोप सामानातून करण्यात आला.
संख्याबळाच्या आधारे नेता निवडणे हे धोक्याचे ठरते. याच संख्याबळाच्या प्रकरणात भाजपने 3 निवडणुकींमध्ये शिवसेनेचे उमेदवार पाडले ही वस्तुस्थिती आहे. त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांचे राजकारण हे शिवसेना आमदारांचा आकडा कमी कसा होईल यास खतपाणी घालणारे होते. फडणवीसांनी तेच केले व आता महायुतीत तोच पाडापाडीचा खेळ होणार हे निश्चित आहे. महाराष्ट्रात दिवंगत प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंना भाजप-शिवसेना युतीचे शिल्पकार समजले जातात. मात्र, मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेच्याच जागा कमी करण्याचं काम मुंडेंनी केल्याचा सनसनाटी आरोप करुन राऊतांनी खळबळ उडवली.