पंतप्रधानपदासाठी महाराष्ट्रातील दोन नेत्यांची नावे चर्चेत? संजय राऊत यांचा मोठा दावा

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अमित शाह पंतप्रधान होणार नसल्याचा दावा केला आहे. संघाच्या यादीत शाह नाहीत, तर महाराष्ट्रातून दोन आणि मध्यप्रदेशातून एक असे तीन नेते पंतप्रधानपदाच्या चर्चेत आहेत. समान नागरी कायदा, राम मंदिर, कलम 370 या मुद्द्यांवरून राऊतांनी शाह यांच्या धोरणांवर टीका करत, त्यांचे प्रयत्न केवळ स्वार्थी राजकारणासाठी असल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधानपदासाठी महाराष्ट्रातील दोन नेत्यांची नावे चर्चेत? संजय राऊत यांचा मोठा दावा
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 14, 2026 | 10:58 AM

नरेंद्र मोदी यांच्यानंतर तीन नेते पंतप्रधानपदाच्या चर्चेत आहेत. त्यातील दोन नेते महाराष्ट्रातील आहेत. एकजण मध्यप्रदेशातील आहे. हे तिन्ही नेते संघाच्या मनातील आहे. संघाच्या यादीत अमित शाह यांचं नाव नाहीये. पण अमित शाह बळेबळेच पुढे पुढे करत आहेत. संघाचा अजेंडा राबवण्याची मलाच किती काळजी आहे, हे अमित शाह दाखवत आहेत. पण कितीही काहीही झालं तरी अमित शाह हे पंतप्रधान होणार नाहीत, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

समान नागरी कायदा लागू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याबाबत संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता त्यांनी शाह यांच्यावर जोरदार टीका केली. समान नागरी कायदा लागू करण्यासाठी अनेक ठिकाणी घटनेत बदल करावे लागेल. गोवा आणि ईशान्येचेही अनेक राज्य आहेत. 21 राज्यात समान नागरी कायदा आणणं हा त्यांचा अजेंडा आहे. देशात एक संविधान असावं. एक तिरंगा असावा, एक कायदा असावा. यात दुमत नाही. कोणीही त्याला विरोध केलेला नाही. पण याचा वापर केवळ स्वार्थी राजकारणासाठी आणि निवडणुकांसाठी करता तेव्हा आक्षेप आहे, असं संजय राऊत म्हणाले.

अमित शाहांची धडपड सुरू

अमित शाह यांना देशाचे पंतप्रधान व्हायची घाई झाली आहे. म्हणून ते सारखे मुंबईत येतात. पण पंतप्रधानपदासाठी संघाच्या मनातील व्यक्ती वेगळी आहे. ती व्यक्ती अमित शाहा नाही. संघाचा अजेंडा राबवण्यात मी किती निष्ठावान आहे हे दाखवण्याचा प्रयत्न अमित शाह करतात. संघाच्या मनातील दोन व्यक्ती महाराष्ट्रातली आहेत. एक मध्य प्रदेशातील आहे. यात अमित शाह कुठेच नाही. तरीही त्यांची धडपड सुरू असेल तर त्यांना लखलाभ ठरो. आमच्यासाठी अमित शाहांनी मराठी माणसाचं नुकसान केलं. मराठी माणसांची एकजूट तोडली. बाळासाहेबांच्या संघटनेवर कुऱ्हाड चालवली आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल आमच्या मनात ममत्व नाही, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.

अमित शाहांना जबरी हाव

अमित शाहांना हाव आहे. जबरी महत्त्वकांक्षा आहे. राम मंदिराचा अजेंडा काही शाहांनी पूर्ण केला नाही. राम मंदिराच्या लढ्यात कारसेवक आणि शिवसेना होती. तेव्हा कुठे होते अमित शाह? कुठे होते मोदी? बाळासाहेब ठाकरे आणि आम्ही राम मंदिर आंदोलनात आरोपी आहोत. राम मंदिरासाठी शिवसैनिक, कारसेवक आणि साधू संतांनी बलिदान दिलं होतं. त्याचं श्रेय सत्तेवरच्या लोकांनी घेऊ नये, असंही ते म्हणाले.

तर खरा मर्द समजू

370 कलम हटवण्यापेक्षा पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर ताब्यात घेऊन अखंड हिंदुस्थान करा. संघाचा मुख्य अजेंडाच तो आहे.. 370 कलम हटवणं फार सोपं आहे. संसदेत बहुमत होतं. विधेयक आणलं आणि ते मंजूर केलं. पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर घेणं हा संघाचा मुख्य अजेंडा आहे. ते पूर्ण करा. ते केलं तर तुम्हाला खरा मर्द समजू. असा मर्द माणूस 10 हजार वर्षात झाला नाही, असं म्हणू, असा टोलाही त्यांनी लगावला.

मोदींच्या मानगुटीवर

अमित शाहांनी सेवा संकल्प अभियान सुरू करू द्या किंवा मोदींच्या सत्तेवर बसण्याचा सोहळा साजरा करू द्या. अमित शाह कधीच पंतप्रधान होणार नाहीत. होणारच नाही. शाह देशालाच नको आहेत. आता जबरदस्तीने बसले आहेत. मोदींच्या मानगुटीवर जबरदस्तीने बसले आहेत. काय कारणं आहेत माहीत नाही. काय नाजूक कारणं आहेत माहीत नाही. पण संधी मिळेल तेव्हाच मोदीच त्यांना दूर करतील, असंही ते म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us