मान्सूनपूर्व पावसाने लग्नात विघ्न, एकाचा वीज पडून, तर दुसऱ्याचा झाड कोसळून मृत्यू

| Updated on: Jun 04, 2023 | 4:46 PM

शेवटचे मंगलाष्टक सुरू असताना पावसाने अचानक हजेरी लावली. मंडप उडून गेला. त्यामुळे वऱ्हाडी मंडळींसह नवरी नवरदेवलाही पावसात भिजावे लागले.

मान्सूनपूर्व पावसाने लग्नात विघ्न, एकाचा वीज पडून, तर दुसऱ्याचा झाड कोसळून मृत्यू
Follow us on

मुंबई : राज्यात आज बहुतेक सर्वत्र मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. वाशिम जिल्ह्यात आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास रिसोड, मालेगाव, मानोरा तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे रुई येथे सुरू असलेल्या लग्न सोहळ्यात शेवटचे मंगलाष्टक सुरू असताना पावसाने अचानक हजेरी लावली. मंडप उडून गेला. त्यामुळे वऱ्हाडी मंडळींसह नवरी नवरदेवलाही पावसात भिजावे लागले. नंतर एका हॉलमध्ये वऱ्हाडी मंडळीला जेवू घातले गेले.

मान्सूनपूर्व पाऊस हा वादळी वाऱ्यासह कोसळत असल्याने सवड गावाजवळ रिसोड – वाशिम महामार्गावर एक झाड उन्मळून पडला. त्यामुळे वाशिम-रिसोड महामार्ग काही काळ बंद पडला होता. रिसोड तालुक्यातील भर जहागीर येथे वीज कोसळून 35 वर्षीय शेतकरी संदीप दत्ता काळदाते यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

यवतमाळात उकाड्यापासून दिलासा

रविवारी मान्सूनपूर्व पावसाने यवतमाळ शहरासह जिल्ह्यात हजेरी लावली. जोरदार वादळ वाऱ्यासह पाऊस बरसल्याने उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला. यवतमाळ, उमरखेड, घाटंजी आर्णी, महागाव इथेही पावसाने हजेरी पाऊस बरसल्याने गारवा निर्माण झाला.

हे सुद्धा वाचा

केळी उत्पादकांचे सहा कोटींचे नुकसान

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात दुपारच्या वेळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसामुळे मोठं नुकसान झालंय. वादळामुळे रहदारीच्या मार्गासह अन्य भागात झाडे कोसळून पडली. यामुळे वाहतूक बंद झालीय. मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने थैमान घातले. या मुसळधार पावसाने यावल चोपडा मार्गावर तसेच किनगाव डांभुर्णी, यावल फैजपूर या मार्गावर मोठमोठी झाडे कोसळली.

सुमारे दोन तास या मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला. युद्ध पातळीवर ही झाडे या मार्गावरून बाजूला करण्यात आले. फैजपूर, न्हावी, आमोदा, डोंगर कठोरा, वाघझिरा, नायगाव गावांसह तालुक्यातील इतर ठिकाणी गारपिटीचा तडाखा बसला. मोठ्या प्रमाणावर केळी पिकांचे नुकसान झालंय. सुमारे एक हजार हेक्टरवरील क्षेत्र बाधीत झालं. यात केळी उत्पादकांचे सुमारे सहा ते सात कोटीचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

जालन्यातील बदनापूरमध्ये अचानक वादळी वारा आणि पाऊस झाला. यावेळी या वादळी वाऱ्यामुळे नागरपंचायतीच्या कार्यालयावर लावण्यात आलेला बोर्ड खाली पडला. यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी खाली उभ्या असलेल्या दुचाकींचे नुकसान झाले.

झाड पडून एकाचा मृत्यू

नंदूरबार जिल्ह्यातील तळोदा चिनोदा रस्त्यावर वादळात गाडीवर झाड पडल्याने एकाचा मृत्यू झाला. तर, दोन जण जखमी झाले. दुपारी अचानक आलेल्या वादळात रस्त्यावरून जाणाऱ्या कारवर झाड पडल्याने दुर्घटना घडली. वादळी वाऱ्यामुळे तळोदा तालुका आणि परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान
झाले.

रस्त्यावर गुडघाभर पाणी

पुणे : पुण्यातील हडपसर भागात पावसानं नागरिकांचे हाल झाले. रस्त्यावर गुडघ्याइतकं पाणी साचलं. रस्त्यावरील पाण्यातून वाट काढताना नागरिकांचे हाल झाले. हडपसर भागात गेल्या 1 तासापासून पावसाची हजेरी पाहायला मिळाली.