Uddhav Thackeray : दिल्लीत बैठकांचे सत्र, राहुल गांधी-उद्धव ठाकरे यांच्यात काय खलबतं? महाराष्ट्रात राजकीय भूकंप?

Uddhav Thackeray-Rahul Gandhi : 'महाराष्ट्राविना देशाचा गाडा ना चाले' असं म्हटलं जायचं. गेल्या दोन आठवड्यातील घाडमोडींमध्ये महाराष्ट्राचा राजकीय गाडा दिल्लीतील घडामोडींमधून दिसून आला. शिंदे सेनाच नाही तर उद्धव सेना सुद्धा दिल्लीत धडकली. बैठकांचे सत्र झाले. काय घडणार आहे राज्यात?

Uddhav Thackeray : दिल्लीत बैठकांचे सत्र, राहुल गांधी-उद्धव ठाकरे यांच्यात काय खलबतं? महाराष्ट्रात राजकीय भूकंप?
राहुल गांधी, उद्धव ठाकरे
| Updated on: Aug 08, 2025 | 2:54 PM

महाराष्ट्राच्या राजकीय बाण्याची चर्चा नेहमीच होते. दिल्लीच्या डोळ्यात डोळे घालून पाहण्याची ताकद महाराष्ट्रात असल्याचे नेहमी सांगितले जाते. गेल्या दोन आठवड्यात महाराष्ट्राचीच चर्चा दिल्लीच्या राजकारणात सुरू आहे. शिंदे सेना आणि उद्धव सेना दिल्लीत डेरेदाखल झाली होती. त्यातच महाविकास आघाडीच्या अनुषंगाने बड्या घडामोडी दिल्लीत पाहायला मिळाल्या. राहुल गांधी यांनी डिनर डिप्लोमसीतून संवाद अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र या संवादाचा केंद्रबिंदू होता. बैठकांचे सत्र, भेटीगाठीच्या माध्यमातून राजकीय खलबतं घडली. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात 35 मिनिटं स्वतंत्र चर्चा झाली. त्यातून राज्यात राजकीय भूकंप घडण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

दोन्ही नेत्यात 35 मिनिटं बैठक

दिल्लीत उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात 35 मिनिटे बैठक झाली. दोघांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी ही स्वतंत्र बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीला सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी पण उपस्थित होत्या. दिल्लीत महाराष्ट्रातील राजकारणाविषयी हालचाली वाढल्या आहेत. उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल राहुल गांधी यांच्या निवासस्थानी त्यांची सहकुटुंब भेट घेतली.

राहुल गांधी यांनी दुपारी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर INDIA आघाडीची बैठक झाली. यावेळी आघाडीतील जवळपास सर्वच घटक पक्षांचा त्यात समावेश होता. राहुल गांधी यांनी मत चोरीविषयी येथे पण माहिती दिली. यानंतर मग राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली. 35 मिनिटे ही चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

राज ठाकरे यांच्याशी युतीविषयी चर्चा

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात मनोमिलन झाले आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची अटकळ बांधल्या जात आहे. अजून दोघांनी याविषयीची अधिकृत घोषणा केली नाही. राहुल गांधी यांच्याशी 35 मिनिटांच्या चर्चेत हा विषय पण समोर आल्याचे कळते. त्यात राज ठाकरे यांचा पक्षासोबत आघाडीची वार्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. अजून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीविषयी महाविकास आघाडीचे ही धोरण समोर आलेले नाही. पण दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची समजते. त्यामुळे येत्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात मोठे उलटफेर दिसण्याची शक्यता आहे.