Thackeray Brother Alliance : जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी अधिकृत युतीची घोषणा केली आहे. मुंबईचा महापौर मराठीच होणार, असा निर्धार दोन्ही नेत्यांनी आजच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

Thackeray Brother Alliance : जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा
Thackeray Brother Alliance
| Updated on: Dec 24, 2025 | 12:59 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन दशकांपासून ज्या क्षणाची प्रतीक्षा तमाम मराठी माणूस आणि शिवसैनिक करत होता, तो क्षण अखेर उजाडला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज एका संयुक्त पत्रकार परिषदेत मुंबई महापालिका निवडणुकांसाठी अधिकृत युतीची घोषणा केली. महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि मराठी माणसाचा अधिकार वाचवण्यासाठी आम्ही सर्व मतभेद विसरून एकत्र आलो आहोत, असे मत दोन्ही नेत्यांनी ठामपणे मांडले.

मुंबईसह सर्व महापालिकांवर भगवा फडकणे आता निश्चित

या कार्यक्रमाची प्रस्तावना करताना खासदार संजय राऊत भावूक झाले. आजचा दिवस सुवर्णअक्षरांनी लिहिला जाईल. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश ज्याप्रमाणे महाराष्ट्रात आला, तसाच आज मराठी ऐक्याचा हा मंगल कलश उद्धव आणि राज यांच्या रूपाने आला आहे. महाराष्ट्राला केवळ ठाकरेच नेतृत्व देऊ शकतात आणि आजच्या या युतीमुळे मुंबईसह सर्व महापालिकांवर भगवा फडकणे आता निश्चित आहे, असे संजय राऊत म्हणाले.

मराठी माणसाने आता एकत्र येण्याची वेळ आली

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी भाजपच्या नरेटिव्हवर जोरदार टीका केली. आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे आणि वडील बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईसाठी रक्त सांडले आहे. आज दिल्लीतील सत्ताधीशांच्या डोळ्यांत मुंबई खुपत आहे. आम्ही कर्तव्य म्हणून एकत्र आलो आहोत आणि आता हे नाते तुटणार नाही. जे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे स्वप्न पाहत आहेत, त्यांचा राजकारणातून खात्मा केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. भाजप म्हणतेय कटेंगे तो बटेंगे, पण मी सांगतो – चुकाल तर संपाल. मराठी माणसाने आता एकत्र येण्याची वेळ आली आहे, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.

मुंबईचा महापौर हा मराठीच असेल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या युतीमागची वैचारिक भूमिका स्पष्ट केली. मी पूर्वीच एका मुलाखतीत म्हटले होते की, कोणत्याही वादापेक्षा किंवा भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. तीच या युतीची ठिणगी होती. सध्या राज्यात राजकीय पक्ष पळवणाऱ्या टोळ्या फिरत आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्राला स्थिरतेची गरज आहे. ही युती केवळ निवडणुकीपुरती नसून महाराष्ट्राच्या हितासाठी आहे. मुंबईची युती ही पहिली पायरी आहे. मुंबईचा महापौर हा मराठीच असेल आणि तो आमचाच युतीचाच असेल, असे राज ठाकरेंनी ठणकावून सांगितले.

विरोधकांसमोर मोठे आव्हान

दरम्यान या घोषणेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. विशेषतः मुंबई, ठाणे आणि नाशिक यांसारख्या शहरांतील महानगरपालिका निवडणुकांमध्ये या युतीचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. ठाकरे बंधूंच्या या एकत्र येण्यामुळे विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.