BREAKING : एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठीच; उद्धव ठाकरेंची सर्वात मोठी घोषणा
तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले. यावेळी उद्धव ठाकरेंनी एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठीच अशी मोठी घोषणा केली

महाराष्ट्र सरकारने त्रिभाषा सूत्रातील हिंदी भाषेच्या सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर आज मुंबईत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विजयी मेळावा पार पडला. तब्बल २० वर्षांनी हे दोन्ही बंधू एका व्यासपीठावर एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठीच अशी महत्त्वपूर्ण घोषणा केली. यामुळे आता मनसे आणि शिवसेना एकत्र येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
या विजयी मेळाव्याच्या सुरुवातीला राज ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यानंतर बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाचे कौतुक केले. “राज आणि माझी भेट व्यासपीठावर झाली. पंचायत अशी, त्यांनी मला सन्माननीय उद्धव ठाकरे म्हटलं. साहजिकच आहे, त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलं आहे,” असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात “सन्माननीय राज ठाकरे आणि जमलेल्या माझ्या तमाम मराठी हिंदू माता भगिनींनो” अशी केली.
उद्धव ठाकरे यांनी मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष भाषणापेक्षा त्यांच्या एकत्र दिसण्यावर असल्याचे नमूद केले. माझ्या भाषणाची काही गरज आहे, असं वाटत नाही. आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यावर सर्वांचं लक्ष भाषणाकडे आहे. पण भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं याकडे सर्वांचं लक्ष आहे,” असेही ते म्हणाले.
एकत्र आलो, एकत्र राहण्यासाठी
राजकीय वर्तुळातून त्यांच्या एकत्र येण्यावर सुरू असलेल्या चर्चांनाही उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले. “आमच्या दोघातील अंतरपाट होता तो अनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची तुमच्याकडून अपेक्षा नाही. एकत्र आलो. एकत्र राहण्यासाठी,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
आज मला कल्पना आहे. अनेक बुवा महाराज बिझी आहेत. कोण लिंब कापतंय, कोण टाचण्या मारतं. कोण गावी जाऊन अंगारे धुपारे करत आहेत. त्या सर्वांना सांगतो. या भोंदूपणा विरोधात माझ्या आजोबांनी लढा दिला होता. त्यांचे वारसदार म्हणून आम्ही उभे ठाकलो आहोत, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.