Uddhav Thackeray Raj Thackeray Meet : उद्धव ठाकरे शिवतीर्थावर, राज ठाकरेंच्या भेटीमागची 5 महत्त्वाची कारणं काय?

ठाकरे बंधूंच्या अचानक झालेल्या भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेता ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

Uddhav Thackeray Raj Thackeray Meet : उद्धव ठाकरे शिवतीर्थावर, राज ठाकरेंच्या भेटीमागची 5 महत्त्वाची कारणं काय?
uddhav thackeray raj thackeray
| Updated on: Sep 10, 2025 | 1:21 PM

Uddhav Thackeray Raj Thackeray Meet : मुंबईसह राज्यातील महापालिकाआणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. येत्या दिवाळीनंतर महापालिका निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच आता महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी सुरु आहेत. मराठीच्या मुद्द्यावरुन एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंनी पुन्हा एकदा एकमेकांची भेट घेतली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सर्वसर्वा उद्धव ठाकरे यांनी आज अचानक मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर ही भेट झाली. ही भेट अचानक नसून पूर्वनियोजित असल्याचे सांगितले जाते. आता या भेटीमागील काही महत्त्वाची कारणं समोर आली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे बंधूंची ही भेट अचानक नसून पूर्वनियोजित बैठक होती असे बोललं जात आहे. जवळपास दोन दिवसांपूर्वीच आजची बैठक ठरली होती. आगामी महापालिका निवडणुका आणि स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्वाची असून त्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा होणार असल्याचे बोललं जात आहे. या महत्त्वपूर्ण राजकीय भेटीसाठी उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत त्यांचे विश्वासू सहकारी आणि शिवसेना (उबाठा) पक्षातील प्रमुख नेते संजय राऊत, अनिल परब उपस्थित आहेत. या नेत्यांच्या उपस्थितीमुळे ही भेट केवळ कौटुंबिक नसून राजकीय असल्याचे बोललं जात आहे. या भेटीदरम्यान, राज ठाकरेंचे कोणते नेते उपस्थित होते, याबद्दल अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही, ही भेट केवळ कौटुंबिक नसून राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

या भेटीमागील पाच प्रमुख कारणे

1. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका

मुंबईसह राज्यातील अनेक महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुका लवकरच अपेक्षित आहेत. या निवडणुकांमध्ये भाजप-शिंदे गटाला टक्कर देण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता आहे. विशेषतः मुंबई महापालिकेसारख्या महत्त्वाच्या निवडणुकीत मनसेची साथ मिळाल्यास शिवसेना ठाकरे पक्षाची ताकद वाढू शकते. त्यामुळे या निवडणुकीत युती करण्याबद्दल चर्चा सुरु असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

2. ठाकरे गटाची ताकद वाढवणे

शिवसेना पक्ष दुभंगल्यानंतर उद्धव ठाकरेंना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत राज ठाकरेंची साथ मिळाल्यास त्यांना राजकीय आणि संघटनात्मक बळ मिळू शकते. यामुळे ठाकरे गट अधिक मजबूत होईल. तसेच यामुळे भाजप-शिंदे गटाला अधिक प्रभावीपणे तोंड देता येऊ शकेल.

3. दसरा मेळाव्याचे आमंत्रण

गेल्या काही वर्षांपासून मनसे शिवसेना वेगवेगळी लढत असल्याने मराठी मतांचे विभाजन होत आहे. जर महापालिका निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आणि लढले तर त्याचा फायदा दोन्ही पक्षांना होऊ शकतो. तसेच यामुळे शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्येही एक वेगळा उत्साह पाहायला मिळेल. तसेच आगामी दसरा मेळाव्याचे आमंत्रण देण्यासाठीही उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचल्याचे बोललं जात आहे.

4. भाजप-शिंदे गटाला शह देणे

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप आणि शिंदे गटाची युती मजबूत स्थितीत आहे. या युतीला प्रभावीपणे आव्हान देण्यासाठी विरोधी पक्षांना एकत्र येण्याची गरज आहे. ठाकरे बंधूंची संभाव्य युती ही भाजप-शिंदे गटाला एक मोठा राजकीय धक्का ठरू शकते. यामुळे, भविष्यातील निवडणुकांमध्ये सत्तेचे समीकरण बदलण्याची शक्यता आहे.

5. वैयक्तिक आणि राजकीय संबंध सुधारणे

गेल्या काही वर्षांपासून ठाकरे बंधूंमध्ये राजकीय मतभेद असले, तरी त्यांचे कौटुंबिक संबंध चांगले आहेत. काही दिवसांपूर्वी गणेशोत्सवादरम्यान ठाकरे कुटुंब एकत्र आले होते. त्यापूर्वी उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंनी मातोश्रीवर जाऊन शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर आत होत असलेली ही बैठक त्याच सुधारलेल्या संबंधांना राजकीय स्वरूप देणारी असू शकते. हे दोघ एकत्र येऊन महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे ब्रँडची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोललं जात आहे.