
आज मुंबईत विक्रोळी येथे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. लवकरच महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. मुंबईत पालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर आज विक्रोळीत घडला तसा प्रकार अजून काही ठिकाणी होऊ शकतो. कारण उद्धव सेना आणि शिंदे सेना यांची ताकद प्रामुख्याने मुंबई-ठाणे पट्ट्यात आहे. विक्रोळीमध्ये श्रेय वादावरून ठाकरे आणि शिंदे यांची शिवसेना आमने-सामने आल्या.
विक्रोळीतील महात्मा फुले रुग्णालयावरून आमदार सुनील राऊत आणि एकनाथ शिंदे गटाच्या युवासेनेत संघर्ष निर्माण झाला. विक्रोळीतील महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयाच्या पुनर्बांधणीवरून राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील राऊत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या युवा सेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते.2014 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालय बंद पडलं. स्थानिक नागरिकांनी आंदोलन केल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी 500 बेडचं नवीन रुग्णालय बांधण्याचे आदेश दिले होते.
शिंदे गटाची युवा सेना आक्रमक
त्यानंतर गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी रुग्णालयाचे काम सुरू आहे. आठवड्याभरापूर्वी स्थानिक आमदार सुनील राऊत यांनी येथे येऊन पाहणी केली. त्यानंतर शिंदे गटाची युवा सेना आक्रमक झाली. आज शिंदे गटाच्या युवा सेनेने कन्नमवार नगर परिसरात आंदोलन केलं. सुनील राऊत यांचे फोटो लावले. ‘काम शून्य पण श्रेयाचे साम्राज्य’ अशा आशयाचे बॅनर शहरभर लावून आंदोलन केलं. आंदोलकांनी काळे कपडे परिधान केले. त्याच बरोबर एकनाथ शिंदे यांचे ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’ असे पोस्टर हाती धरले होते.
मुंबई महापालिका निवडणूक महत्वाची
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा प्रयत्न आहे. तेच काहाही करुन मुंबई महापालिका जिंकायचीच असा चंग उद्धव ठाकरे यांनी बांधलाय. काहीही करुन दोन्ही पक्षाच्या भविष्याच्या दृष्टीने मुंबई महापालिका निवडणूक अत्यंत महत्वाची आहे.