काँग्रेसमध्ये अभूतपूर्व हालचाली, वर्षा गायकवाड कुणाचाच फोन घेईनात, नेमकं चाललंय तरी काय?

| Updated on: Apr 10, 2024 | 3:32 PM

मुंबई काँग्रेसमधील हालचाली आता कुठपर्यंत जाणार? हा प्रश्न आता महत्त्वाचा आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान अवघ्या 9 दिवसांवर आहे. असं असताना काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडी काहीतरी वेगळे संकेत देत आहेत? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. विशेष म्हणजे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड या नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. वर्षा गायकवाड या कुणाचाही फोन घेत नाहीयत. त्यामुळे काय घडतंय? याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

काँग्रेसमध्ये अभूतपूर्व हालचाली, वर्षा गायकवाड कुणाचाच फोन घेईनात, नेमकं चाललंय तरी काय?
नाना पटोले आणि वर्षा गायकवाड
Follow us on

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये घडणाऱ्या घडामोडी कोणत्या दिशेला जाणार? याचा अंदाज आज बांधणं खूप कठीण आहे. पण ज्या घडामोडी घडत आहेत त्या काँग्रेस पक्षाच्या हिताच्या अजिबात नाहीत, असेच संकेत मिळताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. पहिल्या टप्प्यातलं मतदान 9 दिवसांवर येऊन ठेपलं आहे. असं असलं तरी महाविकास आघाडीतली धुसफूस कमी होताना दिसत नाही. विशेष म्हणजे याच धुसफुसीचा काँग्रेस पक्षावर फार मोठा परिणाम पडताना दिसतोय. कारण मुंबई काँग्रेसमधील एकामागेएक दिग्गज नेते सत्ताधारी पक्षांमध्ये सहभागी झाले आहेत. यानंतर आता मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड या कुणाचाच फोन घेत नसल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत त्यांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी गेले, पण वर्षा गायकवाड यांनी भेट दिली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे काँग्रेसमधला हा कलह काही वेगळे संकेत तर देत नाही ना? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

मुंबई काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य सुरु असल्याचं वृत्त समोर येत आहेत. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड गैरहजर राहिल्यामुळे मुंबई काँग्रेसची आजची बैठक रद्द करण्यात आली आहे. वर्षा गायकवाड फोनही घेत नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. वर्षा गायकवाड या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे वर्षा गायकवाड कोअर समिटी सदस्यांचेही फोन घेत नसल्याची माहिती समोर येत आहे.

नाराजी नेमकी का?

मुंबईतील दक्षिण मध्यची जागा ही काँग्रेसच्या वाट्याला आली नसल्यामुळे मुंबई काँग्रेसमधील पदाधिकारी नाराज आहेत. त्यांची संपूर्ण एकत्रित बैठक ही वर्षा गायकवाड यांच्यासोबत नियोजित होती. पण वर्षा गायकवाड या बैठकीला आल्या नसल्यामुळे ही बैठक मुंबई काँग्रेसकडून रद्द करण्यात आली आहे. मुंबई काँग्रेसमधील काही पदाधिकाऱ्यांकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

वर्षा गायकवाड यांचा पुढचा निर्णय काय?

वर्षा गायकवाड या आपल्या निवासस्थानी आहेत. तर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत हे देखील वर्षा गायकवाड यांच्या भेटीसाठी त्यांच्या चेंबूर येथील निवासस्थानी गेले असताना, त्यांचीदेखील भेट वर्षा गायकवाड यांनी घेतलेली नाही. त्यामुळे वर्षा गायकवाड यांचा पुढचा निर्णय काय असणार? त्यांच्या नाराजीबाबत त्या काही भूमिका मांडणार का? हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महाविकास आघाडीत काँग्रेसची सातत्याने अवहेलना केली जाते, असा सूर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. मुंबईत जागांचं प्रमाण बरोबरीने व्हायला हवं होतं, अशी देखील मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांची होती. ठाकरे गटाने मुंबईत 4 जागा घेतल्या, तसेच परस्पर उमेदवार जाहीर केले, त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी आहे.

वर्षा गायकवाड यांच्याकडून पक्षश्रेष्ठींकडे पटोलेंची तक्रार

ठाकरे गट आपल्यावर दबाव टाकत आहे, अशी काही कार्यकर्त्यांची भावना आहे. याचमुळे वर्षा गायकवाडही नाराज आहेत. वर्षा गायकवाड काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांच्यावर नाराज आहेत. वर्षा गायकवाड यांनी नाना पटोले यांच्याबाबतची नाराजी पक्षश्रेष्ठींकडे बोलून दाखवल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. नाना पटोले जागावाटपाच्या वेळी पक्षाची बाजू आग्रहीपणे मांडू शकले नाहीत, अशी भूमिका वर्षा गायकवाड यांनी पक्षश्रेष्ठींकडे मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.